Tuesday 15 January 2019

पोलीस, पासपोर्ट आणि कविता ( police, passport and poem )


( सर्वात आधी माझ्या सर्व कवी मित्रांना, रसिक वाचकांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. )

आपल्याविषयी कधी बोलायचं नाही असा माझा शिरस्ता आहे. कारण मी कोण ? एक यकिंचित माणूस. कधीतरी राख होऊन या पंचप्राणांत पुन्हा विलीन होणार. त्यामुळे मी जेव्हा अशी पोस्ट लिहितो तेव्हा ती केवळ कवितेचं मोठेपण कथन करण्यासाठी असते. अनेकजण खूप फुटकळ लिहितात असं मी म्हणतो तेव्हा
ते सर्व माझ्याशी फटकून राहतात. पण जे निव्वळ रसिकवाचक म्हणून माझ्या पोस्टकडे पाहतात ते मात्र मी काही लिहिलं तरी माझ्या पोस्टकडे कधीच पाठ फिरवत नाहीत.अनेकांचे फोन येतात. अर्थात फोन आला कि लगेच त्याविषयी लिहिण्याची मला मुळीच गरज वाटत नाही. पण आठ दिवसापूर्वी किशोर माने या मित्राचा फोन आला. पोलीस दलात असणारे हे गृहस्थ. मुंबईत पोस्टिंग. आमचा प्रत्यक्ष परिचय नाही. म्हणाले, " सर, तुमच्या कविता खूप आवडतात. तुमची प्रत्येक कविता म्हणजे आमच्या जीवनाचं चित्रण वाटते आम्हाला. काहीवेळा तर डोळ्यात पाणी उभं राहतं. त्यातही तुम्ही कविता थांबवून जे मिशन मोदी सुरु केलंत तेही उत्तम. त्याही पोस्ट खूप आवडतात. मी लाईक कॉमेंट देत नसलो तरी तुमची प्रत्येक पोस्ट मनापासून वाचत असतो." असे फोन येतात तेव्हा रसिकांना अजूनही कवितेची ओढ आहे हि बाब मनाला सुखावून जाते.

हे सर्व लिहायला आणखी एक कारण घडलं. परवा माझ्या पासपोर्टसाठीचं पोलीस व्हेरिफिकेशन होतं. पोलीस स्टेशनमधून Text मेसेज आला. तो मी पाहिलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन केला. पण आदल्या दिवशीच्या कार्यक्रमात फोन सायलेंट केला होता. तो तसाच सायलेंटवर होता. साहजिकच त्यांचा फोन आल्याचे मला कळलेच नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचा फोन आला. तेव्हा मी घेतला. धावतपळत पोलीस स्टेशनला गेलो. माझ्या वर्तणुकीमुळे त्यांच्या मनात थोडा संशय निर्माण झाला असावा. ते थोडेसे तापलेलेच होते. माझ्याशी बोलताना भाषेत आणि आवाजात कडकपणा होता. अनेक उलटसुलट सवाल झाले आणि शेवटी काय करता ? या प्रश्नावर गाडी आली. सांगितलं शेती पाहतो आणि लिहितो थोडं बहुत.

भालेराव आणि गायकवाड अशी त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं. लिहितो म्हटल्यावर त्यांचा आवाज सौम्य झाला, " काय लिहिता ?"

" कविता लिहितो. कथा लिहितो. थोड्याच दिवसात कादंबरी लिहायला घ्यायचा विचार आहे. वर्तमानपत्रांसाठीही लेखन करतो अधूनमधून." मी अत्यंत गरीब होऊन बोलत होतो.     .

" अरे वा, छानच. मग आम्हाला ऐकवा कि काहीतरी. " मी अचंबित. पोलीस अधिकारी आणि कविता ! माझ्या जीवात जीव आला. म्हटलं," तुम्ही लिहिता का ? "

तर म्हणाले नाही, " पण तुम्ही कसे लिहिताय ते पहायचे आहे. " माझ्यासमोर कोणीतरी मोठे समीक्षक बसल्याचा भास झाला मला. आणि ते अगदी खरे आहे. मी रसिकालाच सर्वोत्तम समिक्षक मानतो.

मी मनाची तयारी केली. आणि पोलिसस्टेशन मध्ये बसून पोलीस अधिकाऱ्यांना कविता ऐकवली. ' नको असला बाप '  या कवितेच्या संदर्भातील गद्य लेखन आणि ती कविता झाली. ते दोघेही अगदी कानात प्राण आणून कविता ऐकत होते. मला हुरूप आला. मग मी ' माणसं अशी का वागत नाहीत ? ' हि कविता ऐकवली. एखादी प्रेम कविता ऐकवायची म्हणून " होईन मी ' हि कविता झाली. ते ऐकत होते आणि मी ऐकवत होतो. पण जसं कुठे थांबावं हे कळतं तोच खरा वक्ता आणि तसंच समोरचा ऐकतो आहे म्हटल्यावर किती कविता ऐकवायच्या हे कळतं तोच खरा कवी.

त्यांना कविता खूप आवडल्या. गायकवाडसाहेबांनी त्यांचा व्हाट्सअप नंबर मला दिला. आणि म्हणाले, " नको असला बाप हि संपूर्ण पोस्ट मला व्हाट्सअप करा. " भालेरावसाहेबांचाही तोच आग्रह होता तेही फोन नंबर देण्यासाठी पुढे सरसावले.त्यावर," मला आली कि मी पाठवतो तुम्हाला. " असं गायकवाड साहेबांनी भालेराव साहेबांना सांगितलं. त्यांच्या सोसायटीत माझे एक दोन कार्यक्रम आयोजित करण्याचं वचन दिलं. आणि मला निरोप दिला.

पुढल्या आठ दिवसात पत्नीच्या पासपोर्टसाठीचं व्हेरिफिकेशन होत. मी फोन केला. म्हणालो, "साहेब घरीच या.चहापाणी होईल. आणि निवांत गप्पाही होतील. "

पण ते दोघेही आपल्या कामाच्या बाबतीत दक्ष असावेत. काम सोडून गावभर फिरणारे नसावेत. त्यांनी नम्र नकार दिला. म्हणाले, " पत्नीला घेऊन इथेच या. घरी सुट्टीच्या दिवशी येऊ."

मी पत्नीला घेऊन पोलीस स्टेशनला पोहचलो. त्यांनी आवश्यक ती सगळी कागदपत्रे पाहीली. परंतु मी काही मल्ल्या अथवा निरव मोदी नव्हे अशी त्यांची खात्री पटली होती. पाच मिनिटात त्यांनी सगळं उरकलं. कविता ऐकविण्याची फर्माईश झाली. काव्य क्षेत्रात, समाजात, राजकारणात सगळीकडे ज्याचे त्याचे कंपू  दिसतात. कधी ते नात्यांचे असतात. कधी ते मित्रांचे असतात. कधी ते शेजाऱ्यापाजाऱ्यांचे, कधी जातीजातीचे असतात. त्या संदर्भात नव्याने लिहिलेली -

प्रत्येकाचा असतो परीघ
प्रत्येकाची असते रेघ
प्रत्येकाच्या डोक्यावरती
आपापलाच असतो मेघ.

हि कविता ऐकवली. आणि आपला असा कोणताही परीघ नाही. आपली अशी ठराविक लांबीची कोणतीही रेघ नाही. त्यात नवनवीन रसिकांची भर पडते आहे या समाधानात बाहेर पडलो. 

No comments:

Post a Comment