Saturday 26 January 2019

#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत

modi, rahul,
आम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या प्रदीप भिडे सारखा माणूस आम्हाला आमच्या मोबाईलच्या स्क्रिनवर दिसला. नेमकं काय झालं असेल याचा विचार करत आम्ही डोळे विस्फारून मोबाईलच्या स्क्रीनकडे पहात होतो. तेवढ्यात
स्क्रीनवरील माणूस एकदम आम्हाला , " हाय. " म्हणाला “ आणि पुढे सांगू लागला " सरकारने आम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पाठवलं आहे. आता तुमच्या मोबाईलवर आणि लॅपटॉवर होणाऱ्या सगळ्या हालचालींवर आम्ही लक्ष ठेवणार आहोत." तो तसं म्हणाला आणि आम्हाला सतत आमच्यावर पहारा ठेवणाऱ्या सौचा चेहरा आठवला. सौची आठवण येताच बुडत्याला काडीचा आधार वाटण्याऐवजी ओझं वाटावं तसं आम्हाला वाटलं. आणि आम्ही पटकन मोबाईल बंद केला.

मेल पहाव्यात म्हणून लॅपटॉप चालू केला. तर तिथेही तोच प्रदीप भिडेंसारखा माणूस. त्यानेही आम्हाला ,'हाय ' केलं. त्याचा हेतू सांगितला. आम्हाला या गोष्टीचा उलगडा काही होत नव्हता. आमच्या घरात भुताटकी शिरली असावी या संशयाने आम्ही लॅपटॉप बंद केला. मनातल्या मनात रामरक्षा म्हणू लागलो. थोडंसं बरं वाटलं. तेव्हा आम्ही डोळे मिटून चाचपडत टेबलावरच वर्तमानपत्र उघडलं. डोळे किलकिलें करून पाहिलं. वर्तमानपत्राच्या पानावर काही तो प्रदीप भिडेंसारखा माणूस दिसला नाही. चला म्हणजे घरात भुताटकी शिरलेली नाहीतर. या विचाराने आमचा जीव भांड्यात पडला. आम्ही ५६ इंच छाती फुगवून वर्तमान पत्र वाचू लागलो. पहिल्या पानावरचा, ' सरकार करणार तुमच्या मोबाईल आणि संगणकात घुसखोरी.' हा मथळा वाचला. तेव्हा ५६ इंच पुढे आलेली आमची छाती ५८ इंच आत गेली.

चार सहा दिवस आम्ही मोबाईल आणि लॅपटॉप हातात घ्यायचा नाही असा दृढ निश्चय केला. पण आमची भीष्म प्रतिज्ञा फारच अल्पजीवी ठरली. थोड्याच वेळात थरथरत्या हाताने आम्ही पुन्हा मोबाईल चालू केला. स्क्रीन चालू होताच लगेच, " हाय, मेरे आका " असं म्हणत तो सरकारी दूत स्क्रिनवर हजर झाला व पुढे म्हणाला, " चिंता करू नका हुजूर. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. हे जाळं देशातल्या बड्या धेंडांसाठी आहे. तुम्ही बेफिकीर रहा."

पण आता हा आमचे सगळे खाजगी चॅटिंग पाहणार. आमचे आमच्या सेक्रेटरीशी होणारं आमचं गुलाबी संभाषण ऐकणार. या चिंतेने आमची भीती काही कमी होईना. तेव्हा तो सरकारी दूत फोनच्या स्क्रीनवरून आमच्या मनात कधी पोहचला ते आम्हाला कळलेच नाही. पण आमच्या मनातले ओळखून तो म्हणाला, " तसली काही चिंता करू नका हुजूर. तसले काही आम्ही सरकारला सांगणार नाही. "



“ त्या सरकारला सांगितलं तरी चालेल बाबा पण ( किचनकडे बोट दाखवत ) या सरकारला नको सांगुस तसलं काही.” असं आम्ही अगदी बापुडा चेहरा करून म्हणालो. तेव्हा गालातल्या गालात हसत तो सरकारी दूत स्क्रीनवरून नाहीसा झाला. पण मोबाईलमध्ये सुरु असलेली त्याची लुडबुड आम्हाला जाणवत होती.

No comments:

Post a Comment