Monday, 2 March 2020

खरंच कोणी बांधला ताजमहाल? - भाग २


संभाजी महाराज चाळीस भाकरी खायचे आणि त्यांची तलवार साठ किलोची होती अशी एक पोस्ट काही दिवसापूर्वी वाचनात आली. युद्धात गोफण फिरवावी तशी तलवार फिरवावी लागते. आणि कितीही बलदंड, शक्तिमान माणूस असला तरी
साठ किलोची तलवार इतक्या सहजपणे फिरवणे अगदीच अशक्य आहे. त्यामुळे आपल्या राज्याचे उद्दात्तीकरण करणे हाच हेतू अशा लेखनामागे जास्त असतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

परंतु असे काही लिहिले कि ते व्यक्तिमत्व ज्या जातीचे होते ती जात अंगावर येते. त्यामुळेच आजकाल वास्तव दाखविण्याचे आणि लिहिण्याचे धाडस कोणीही लेखक करत नाही. तो जनतेला काय आवडेल याचाच विचार जास्त करतो. मान्य एखाद्या राजाची इतिहासातले वास्तव समाजासमोर मांडायचे म्हणून एखाद्या राजाचे वैगुण्य समाजासमोर आणू नयेत. परंतु त्या व्यक्तित्वाचे उदात्तीकरण करण्यासाठी खोटा इतिहास सांगितला जाणार नाही याची काळजी लेखकांनी आणि इतिहासकारांनी घ्यायलाच हवी ना.

लोकशाही असलेल्या देशातल्या मंत्रालयातील फाईल जाळता येतात. गायब करता येतात. मग ज्यावेळी संपूर्ण कारभारच राजा आणि त्याच्या मंत्रिमंडळाच्या ताब्यात असायचा त्यावेळी पूर्वीचे पुरावे नष्ट करणे आणि त्यावर आपली मोहर उमटविणे फार अवघड नव्हते. मुघल राजवटी विध्वंसक होत्या, क्रूर होत्या हे मुस्लिम बखरकारांनी सुद्धा लिहून ठेवले आहे.  हिंदू वगळता अन्य सर्व धर्म मागील हजार दोन हजार वर्षात जन्माला आलेले असल्यामुळे साम, दाम, दंड, भेद अशा कोणत्याही मार्गाने धर्मप्रसार करणे त्यांच्यासाठी गरजेचे होते. मुस्लिम सम्राटांनी हिंदू जनतेचा छळ करून त्यांना मुस्लिम धर्म स्विकारण्यास भाग पाडले. तर ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी गरिबांना पैशाचे अमिश दाखवून धर्मप्रसार केला हे सर्वज्ञात आहे.

एखादी गोष्ट समाजात इतकी प्रभावीपणे रुजवली जाते कि ते सत्य वाटू लागते. आणि मग हे बनावट सत्य पुसून टाकायला अनेक शतके आणि सहस्त्रके वाट पाहावी लागते. अयोध्येत राममंदिर होते. परंतु १५२७ साली बाबराने मशीद बांधली असे इतिहास सांगतो.  बाबराने राममंदिर पडून तेथे मशीद बांधली हे त्याचा कार्यकाळ लिहून ठेवणाऱ्या मंडळींनी लपवून ठेवले असेल. त्यापूर्वी त्या जागेवर राम मंदिर होते हे वास्तव गाडून टाकण्यात आले असेल. त्या जागेची, वास्तूची राममंदिर हि ओळख पुसण्यात आली असेल. आणि आज त्या जागेवर अधिकार सांगण्यासाठी हिंदूंना १९९२ सालापर्यंत वाट पहावी लागली. हिं तीस वर्षे कोर्टाचे उंबरठे झिजवावे लागले.  राममंदिराच्या जागी उभी करण्यात आलेली बाबरी मशीद पाडली. तरीही आज सर्वच माध्यमात वादग्रस्त बाबरी मशीद असाच त्या जागेचा उल्लेख होतो. आज सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरही त्या जागेचा अयोध्येतील राममंदिर असा उल्लेख होत नाही. हे आजचे सर्व संदर्भ आणखी तीन चारशे वर्षांनी चाळले तर त्यातून त्यावेळचा एखादा इतिहासाचा अभ्यासक, "१९९२ साली दंगलखोर हिंदूंनी आयोध्येतली बाबरी मशीद हि वास्तू जमीनदोस्त केली आणि त्या जागेवर राममंदिर उभारले." असा अर्थ काढेल. कारण पंधराव्या सोळाव्या शतकातील ऐतिहासिक पुराव्यापर्यंत पोहचण्याची पायवाट तेव्हा अधिक पुसट झालेली असेल.

३ भागातील भाग २ 

विजय शेंडगे, पुणे   

No comments:

Post a Comment