Tuesday, 24 March 2020

ब्रुटस.... यु टू.... ? नव्हे....कोरोनाने चायना आणि त्या पाठोपाठ इटलीत घातलेला हैदोस पाहिला. प्रचंड बुद्धिमत्ता, संसाधनांची मुबलक प्रमाणात उपलब्धता, भारताच्या तिप्पट भौमितिक आकार, त्यामुळे लोकसंख्येची कमी घनता आणि नागरिकांची सहकार्य करण्याची मानसिकता  एवढं असूनही
आज चार महिन्यानंतर सुद्धा चायना सावरू शकला नाही. आणि आमच्याकडे तर काही नाठाळ जनता सहकार्य सुद्धा करत नाही. जी मंडळी सहकार्य करतात त्यांनाही त्याचा सोहळा झाला पाहिजे असे वाटते. त्यामुळेच

कर्फ्यू लागू असतानाही  अनेकजण रस्त्यावर फिरत होते, व्हिडीओ काढत होते, ते व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत होते आणि आपण केवढा मोठा तीर मारला आहे असा अविर्भाव आणत होते. ज्यांनी सहकार्य केले सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अगदी घराचा उंबरठा ओलांडला नाही त्या सगळ्यांची अवस्था सापळ्यातून बाहेर पडलेल्या उंदरांसारखी झाली. मोदींनी आपापल्या घरात बसून टाळ्या अथवा घंटा वाजवून नाद करायला सांगितला होता.  पण अनेकांना भान उरलं नाही. लोक आपापल्या गच्च्यात जमा झाले. सामूहिक रित्या टाळ्या वाजवल्या गेल्या, ताटे बडवली. घंटानाद झाला, अनेकांनी शंखनाद सुद्धा केला. अनेकजण रस्त्यावर आले. सामूहिक जल्लोष झाला. कुणी फटाके वाजवले, कुणी बँड पथक मागवले. व्हिडीओ काढले गेले. नातेवाईकांना पाठवले. समाज माध्यमांवर शेअर केले. तिथून ते व्हायरल झाले. असे करण्यात लहान मुले मागे नव्हती, तरुण मागे नव्हते आणी म्हातारी माणसेही मागे नव्हती. सुशिक्षित मागे नव्हते, अशिक्षित मागे नव्हते. गरीब मागे नव्हते. सगळेच अगदी सगळेच अडाण्यासारखे वागले.

अमिताभ सुद्धा सह कुटुंब गच्चीत आला होता. साहेब सुद्धा घराच्या पोर्च मध्ये येऊन टाळ्या वाजवत होते. मग सामान्य नागरिक तरी कशाला मागे राहतील. एकवेळ मी सामान्य नागरिकांनी जे कृत्य केले त्याचे थोडेफार समर्थन करीन कारण त्यांना आम्ही मोदींच्या सोबत आहोत हे दाखवायचे होते. पण सेलिब्रेटींनी जे काही केले ते केवळ प्रसिद्धीसाठी. आणि मीडिया सुद्धा घरात बसलेल्या मंडळींची दाखल घेत नव्हती. तर जे रस्त्यावर उतरले आहेत त्यांचेच फोटो, व्हिडीओ बातम्यांमध्ये, वर्तमान पत्रात झकलात होते. सोशल मीडियावर गर्दीचेच व्हिडीओ व्हायरल झाले. निगेटिव्ह का असेना प्रसिद्धी तर मिळत होती. किती वाईट आहे हा प्रसिद्धीचा सोस.

शेक्सपिअरच्या ज्युलिअस सीझर या नाटकातील, "ब्रुटस यु टू." हा संवाद माहित नाही असा माणूस विरळाच. मोदींच्या २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर जनतेने  तर केलंच केलं परंतु अमिताभ सारखी सेलिब्रेटी सुद्धा मागे राहिली नाही. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, "अमिताभ यु टू."

उद्या मोदींच्या एवढ्या मोठ्या निर्णयानंतर सुद्धा कोरोना आटोक्यात नाही आला तर आम्ही सगळे मोदींच्या निर्णयावर टीका करायला बाह्या मागे सारणार आहोतच.  

No comments:

Post a comment