Sunday 29 March 2020

उद्धवा, नेमकं काय करतो आहेस बाबा

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी

खरंच काय सुरु आहे तुमचं? कोरोना आल्यामुळे एक बरं झालं. जनतेशी संवाद साधण्याचं निमित्त पुढं करून का होईना पण तुम्हाला रोज टिव्हीवर झळकता येतं आहे. असो काही का असेना आणि कसे का असेना आज तुम्ही सत्तेत आहात, हे तर कोणालाही नाकारता येणार नाही. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे हेही आम्हाला मान्य आहे. परंतु
तुम्ही जे निर्णय घेताय त्याचे परिणाम काय होतील याचा विचार तरी केला आहे का?

शेतकऱ्याच्या पिकावर रोगराई पडते तेव्हा शेतकऱ्याची काय अवस्था होत असेल याचा आता तुम्हाला अंदाज आला असेल. शेतकऱ्याच्या पिकावर रोगराई पडते तेव्हा त्याचे परिणाम शेतकऱ्यालाच भोगावे लागतात. पण साहेब तुम्ही जे निर्णय घेताय त्याचे परिणाम तुम्हाला नाही हो महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला भोगावे लागणार आहेत. तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेची खूप काळजी आहे असे तुम्ही दाखवता आहात. परंतु तुमचे सगळे निर्णय मोदींच्या संचारबंदीच्या निर्णयाला खो घालणारे आहेत. नशीब रेल्वे तुमच्या अधिकार कक्षेत येत नाही. नाहीतर मार्केट प्रमाणे तुम्ही मुंबईची लोकलसेवा सुरु करण्याचा देखील निर्णय घेतला असता.

* तुम्ही कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला.

* तुम्ही दहा रुपयाची शिव थाळी पाच रुपयात देण्याचे ठरविलेत. (अर्थात ती दहाला दिली काय आणि         पाचला दिली काय. पैसा मातोश्रीवरून पुरवला जात नाही हे जनतेला माहित आहे.)

* तुम्ही मार्केट सुरु करण्याचा निर्णय घेता आहात.

* तुम्ही किराणा दुकाने २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

* जनतेच्या मनात मांसाहाराची भीती असताना तुम्ही मटण, चिकन आणि मच्छी विक्री सुरु करण्याचा 
   निर्णय घेतला.

हे सर्व निर्णय घेताना तुमच्या मनात कोठेतरी मतांचे राजकारण सुरु आहे असेच दिसते. वरील सर्व निर्णय घेतल्याने कोरोना आटोक्यात कसा येणार आहे? एकीकडे तुम्ही जनतेच्या सोयीसाठी एवढे निर्णय घेता आहात आणि दुसरीकडे तुमचे गृहमंत्री अनिल देशमुख कोणा एका पोलीस कर्मचाऱ्याला लाठीसह टीव्हीच्या स्क्रीनवर आणतात. आणि बाहेर पडलात तर प्रसाद नक्की मिळणार असे ठणकवतात. पण आता तुम्ही एवढे मार्केट खुले केले तर जनता बाहेर पडणारच ना. तुम्ही जिथे जिथे अन्नछत्र सुरु केले आहे तिथे घोळका होणारच ना. त्यातून कोरोनाचा संसर्ग होणारच ना. तुम्ही दुकाने बंद ठेवली असती तर काही बिघडले नसते हो. महिन्याचा किराणा तर असतोच बहुतेक जणांच्या घरात.

उत्तरप्रदेश, बिहार हि आम्ही देशातली सर्वात मागास राज्ये समजत आहोत. पण तेथील कोरोना बाधितांची संख्या आपल्या तुलनेत खूप आटोक्यात आहे हो. युपीने आताशी साठी गाठली आणि आम्ही केरळला मागे टाकून दुहेरी शतक गाठण्याच्या मार्गावर आहोत. महाराष्ट्राने कोरोना बाधितांच्या आकडेवारीत जे दैदिप्यमान यश मिळविले आहे त्याचे श्रेय तुमच्या निर्णयाला कि महाराष्ट्रातील अतिशहाण्या जनतेला?

( व्यंगचित्र नेटवरून घेतलेले असून त्यात माझ्या पोस्टला अनुसरून बदल केले आहेत.)

No comments:

Post a Comment