Thursday 19 March 2020

ब्राम्हणवाद आणि बहुजनवाद



मांडीला मांडी लावून पंगती झडल्या अथवा रोटी बेटी व्यवहार झाला म्हणजे जातीयवादाचे समूळ उच्चाटन झाले असे मुळीच नाही. कोणी कितीही समतावादी असल्याचा दंडोरा पिटत असले तरी बऱ्याच जणांच्या मनात जातीयवाद दबा धरून बसलेला असतो. वेळ काळ पाहून तो उसळी घेतो. शाहू, फुले, आंबेडकर अशी आपल्या भाषणांची सुरवात करून शरद पवार ब्राम्हणांशिवाय
देश असल्याचे भासवतात. फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा त्यांना हिणवतात. 'पगडी पेशव्यांची' म्हणत पुणेरी पगडी डोक्यावर धारण करायला नकार देतात. आणि तरीही स्वतःला मानवतावादी, समतावादी आणि पुरोगामी असल्याचे भासवतात.

पण सुधारणावादी  विचारधारा रुजवण्याचा प्रयत्न ब्राम्हणांनीच केला. शाहू, फुले, आंबेडकर नंतर आले. संत ज्ञानेश्वर हे आद्य समाजसुधार. ते ब्राह्मणच होते. आणि त्यांनी सुधारणवादाचा पुरस्कार केला म्हणून ब्राम्हण समाजाने त्यांना वाळीत टाकले होते हे कोणाला ठाऊक नाही. स्वतः शरद पवारांनी कोणत्या सामाजिक सुधारणा केल्या?

मराठे छत्रपती शिवरायांना आपली खाजगी मालमत्ता मानतात. बौद्ध बाबासाहेबांचे नाव घेत बाह्या मागे सारतात. धनगर पिवळा ध्वज उंचावतात. परवा एका दलित कवीच्या कवितेत 'दिल्लीवर निळा झेंडा फडकवायला हवा' असे विधान वाचले. मग तिरंग्याचे काय करायचे? समाजाला काहीतरी नवीन विचार देण्याच्या नादात आपण समाजात दरी निर्माण करतो आहोत हे या भोंदू विचारवंतांच्या लक्षात कसे येत नाही.

'एक कवी, एक कवयत्री' या कार्यक्रमात म. भा. चव्हाण यांची मुलाखत उद्धव कानडे घेत होते. तेव्हा 'आपण गांधीवादी विचारधारा स्विकारता. परंतु, आंबेडकरवादी विचारधारा आपणास फारशी पसंत नाही. असे दिसते हे खरे का?' या उद्धव कानडे यांनी विचारलेल्या प्रश्नावर मभा म्हणाले, जातीयवादी कोण नाही. मराठा असोत, दलित असोत सगळेच जातीयवादी आहेत. त्या कार्यक्रमाला ब्राम्हण समाजाची उपस्थिती अगदी नगण्य होती. सगळ्याच ब्राम्हण साहित्यिकांना त्या दिवशी काम होते काय?

परवा एका कवयित्रीला मानाचा शासकीय पुरस्कार मिळाला म्हणून तिचा सत्कारसोहळा आयोजित केला होता. तर त्या कार्यक्रमाला एकच ब्राम्हण कवी हजर होता. जात बाजूला ठेवून साहित्यिक म्हणून कवी म्हणून तरी सगळ्यांनी बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थित रहायला हवं होतं ना. पण नाहीच आमचे कवी कविता म्हणण्यासाठी कुठेहि जाऊन रांगा लावतील. परंतु टाळी द्यायला या म्हंटले, कि त्यांना हिव भरते.

अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा त्यांचा सत्कार सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित केला होता. या प्रसंगी आयोजित संपूर्ण कार्यक्रमात केवळ ब्राम्हण मंडळींचाच भरणा होता. निवेदन, संकल्पना, अभिवाचन, वाद्यवृन्द, नृत्य सगळीकडे फक्त ब्राम्हण. बहुजन समाजातील एकाहीजण औषधासाठी सुद्धा नव्हता. का असे? मुळात साहित्यातील जातीयवाद अजून संपुष्टात आलेला नाही मग समाजातील जातीयवाद कसा नाहीसा होईल.

वृत्तमाध्यमे तर नेमकी जातीवर बोट ठेवून वार्तांकन करतात. दलित समाजातील एखाद्या व्यक्तीवर जरासा अन्याय झाला कि ती जात जाणीवपूर्वक अधोरेखित केली जाते. मुस्लिम समाजातील व्यक्तीवर थोडाफार अन्याय झाला कि राईचा पर्वत करण्यात सगळ्या वार्ताहरांना धन्यता वाटते. देश. देशाचे ऐक्य या बाबी कोणालाही महत्वाच्या वाटत नाहीत. मानवतावाद तर फक्त बोलण्यापुरता आणि साहित्यापुरता उरला आहे. पण तरीही हे सगळे बदलण्यासाठी आपण आशावादी असायला हवे.

जात हाताच्या ठशांना नसते
माणसाच्या सावलीला नसते
नाकपुड्यातल्या श्वासांनाही नसते
आणि माणसाच्या रक्तालाही नसते.

तरी कसे जन्मा आले 
भिन्नरंगी झेंडे
जात कुणाला विचारते का 
फ्राय केलेले अंडे. 

ताटातली भाकरी सुद्धा 
विचारत नाही जात 
कोणत्या जातीचा असतो कुठे 
सांगता येतो प्रपात. 

माणसं मात्र स्वतःभोवती 
जातीचं वर्तुळ आखून घेतात 
आणि कधी कधी माणुसकी विसरून 
हिंस्त्र श्वापदं होतात. 

तसं तर फक्त जगायचंच असतं सगळ्यांना 
वाण्यांना, ब्राह्मणांना आणि दलितांना
आयुष्य उसवत जातं तेव्हा 
मरायचंच असतं प्रत्येकाला 
मेल्यानंतर प्रत्येकाची होणार असते माती
मनामध्ये जपलेली धूसर होतात नाती  

खूप धडपड करून सुद्धा 
मातीच्या जातीचा शोध लागत नाही.
आणि जात पाहून जगात कोणी 
बाई भोगत नाही. 


No comments:

Post a Comment