Saturday 21 March 2020

नोटांमुळे सुद्धा पसरू शकतो कोरोना



करोना येऊन तीन महिने झाले. दीड महिना झाला आपल्या येथील वर्तमानपत्रातून त्याविषयी बातम्या झळकताहेत. सध्या संपूर्ण वर्तमान पत्र आणि दृक्श्राव्य माध्यमातील चोवीस तासीय बातमीपत्रे संपूर्णतः करोनामय झाली आहेत. इतकी कि मी हातात घेतलेलं वर्तमानपत्र दहाव्या मिनिटाला खाली ठेवतो आणि
अवघ्या दोन मिनिटात चॅनल बंद करून एखादा टॉलिवूड सिनेमा लावून बसतो.

कारण वर्तमानपत्रात आणि टीव्हीवरील बातम्यात करोनाचा इतका बढीमार असतो कि एखाद्याला केवळ वर्तमानपत्र वाचल्यामुळे आणि बातम्या पाहिल्यामुळे सुद्धा करोना होईल. अगदी सुरुवातीला 'नोटांमुळे सुद्धा पसरू शकतो कोरोना' अशी बातमी झळकली होती. आणि  व्यवहारासाठी ऑनलाईन पर्यायांचा वापर करण्यात यावा असे सुचविण्यात आले होते. परंतु जेव्हा नोटांमधून करोना पसरू शकतो तर मग वर्तमानपत्रातून का नाही पसरू शकणार अशी टूम निघाली  मात्र मीडियाने नोटा आणि वर्तमानपत्रातून करोना पसरत नाही अशा बातम्या झळकू लागल्या.

सगळ्यांना सगळ्यांसाठी वर्क फ्रॉन होमची मागणी होते. मग वर्तमानपत्रातील आणि न्यूज चॅनल मधील कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमची मागणी का होत नाही? लोकल, बस, रेल्वे, दुकाने सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. मग पंधरा दिवसांसाठी वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनल बंद ठेवले तर काय बिघडणार आहे? लोकल आणि बस धुतल्याचे दाखवले जाते पण न्यूज रूम धुवून काढल्याची बातमी ऐकिवात नाही.

या सगळ्या लेखनामागे करोना टाळण्यासाठी काळजी घेऊ नका अशी भूमिका नाही. काळजी नक्की घ्या पण भीती  आणि भीती घालू नका. आपली वृत्तमाध्यमे केवळ भीती घालण्याचे काम करत आहेत असे मला वाटते. त्यामुळेच करोना या विषयावर 'मी गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला ' या अत्यंत आनंदी मूड असणाऱ्या गाण्याच्या चाली आधारित गाणे लिहिले आहे. मागे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्री केलं तेव्हा मी लिहिलेली 'बाबा नको मला हो जेट, मला हवंय केबिनेट' हि कविता कोणीतरी मस्त व्यंगचित्रांचं बॅकग्राउंड वापरून, नवोकोरी चाल देऊन त्याचा व्हिडीओ केला. तो व्हिडीओ व्हॅट्सऍपवरून फिरत फिरत माझ्यापर्यंत आला तेव्हा मला फार आनंद झाला. तसेच हेही गाणे एखाद्याने आपल्या आवाजात रेकॉर्ड करून त्याचा व्हिडीओ बनवला माझी मुळीच हरकत नाही. 

खरंतर अशा प्रासंगिक कविता लिहिणे मला फारसे रुचणारे नाही. कारण अशा कविता आतून नसतात. अशा कविता म्हणजे रचना असतात.  कोणतीही कविता हि रचनाच असते. परंतु आतून आलेल्या कवितेच्या स्फुलिंगाने मनात पेट घेतलेला असतो. आणि त्यात तावून सुलाखून कविता आकाराला आलेली असते त्यामुळे अशा आतून आलेल्या कवितेत एक चैतन्य असते. तिला एक आगळी वेगळी झळाळी प्राप्त झालेली असते.

प्रसंगानुरूप एखाद्या लोकप्रिय गाण्याच्या चालीचा आधार घेऊन लिहिलेल्या कवितेला अशी स्वयंभू झळाळी नसते. त्यामुळेच अशा विनोदी अंगाने जाणाऱ्या, लोकप्रिय गीताचा आधार घेऊन रचना लोकप्रिय होतील. पण त्यातून कवीचे नाव लोकांच्या ओठावर येईल परंतु अशा कविता अल्पजीवी असतात. त्या कविता लोकप्रिय होतात, रसिक हास्यात बुडून टाळ्या देतात. परंतु अशा कविता माणसाच्या मनावर कोरल्या जात नाहीत. स्मरणात रहात नाहीत. असो मला विनोदी अंगाने लेखन करणाऱ्या कवींना दुय्य्म लेखायचे आहे असे कोणीही समजू नये. ते कामही फार सोपे नसते. याची मला जाणीव आहे.

पहा माझी रचना आवडते का -

करोना आला रे आला
नका मुळीच घाबरु त्याला

अरे एक दोन तीन चार संगे
सुरक्षेचा असो भाला
करोना आला रे आला
नका मुळीच घाबरु त्याला

हा चीनच्या मातीचा रोग
झाला जगाचा साऱ्या भोग
नका मिळवू हो हात, जर करायची मात
साधा नमस्कार तुम्ही घाला घाला घाला
करोना आला रे आला नका मुळीच घाबरु त्याला........

खेळ चीनचा होता झाला
अन् जगाच्या अंगी आला
नका नको ते खाऊ, नका घाबरून जाऊ
नको रोग हा, नको रोग हा त्याला त्याला त्याला,
करोना आला रे आला
नका मुळीच घाबरु त्याला......

घाला मास्क हो तोंडावरती
नाही रोगाला मग या भरती
हात मिळवता भाऊ,
हात धुवून घेवू
जीव नाही हो, जीव नाही हो पाला पाला, पाला
करोना आला रे आला
नका मुळीच घाबरु त्याला

अरे एक दोन तीन चार संगे
सुरक्षेचा असो भाला
करोना आला रे आला
नका मुळीच घाबरु त्याला

No comments:

Post a Comment