Sunday, 29 March 2020

कशाला हवा माणुसकीचा गहिवर?

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी
आम्हा मित्रांच्या मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपवर परवा एक फोटो अपलोड करण्यात आला होता. एका सिमेंटच्या पाईपमध्ये बसलेली तीन पोरं, त्यांची आई, चार भांड्यांचा संसार आणि पाईपवर हाताची घडी घालून बसलेला त्या पोरांचा बाप. फोटो खाली ' २१ दिवस यांनी काय खायचं?" अशी टॅगलाईन. त्यावर उत्तर देताना मी लिहिले,
"पोरं जन्माला घालताना हे विचार करत नाहीत. मग समाजाने यांचा विचार का करावा?"

सगळे सख्खे मित्र. अनेकांना माझे विधान पटले नाही. कारण एकंच कोणीही सारासार विचार करत नाही. ज्यांना रोज भीक मागितल्याशिवाय पोट भरणे शक्य नाही, त्यांनी पोरं जन्माला घालताना विचार करायला नको. पण नाही. समाज आहे पोसायला. मग ते कशाला विचार करतील? मी अनेकदा सिग्नलवर भीक मागणारी चार सहा वर्षाची पोरे बघतो. मोठ्या पोरीच्या कडेवर लहान असतंच. बाजूला पुटपाथवर त्यांच्या पंचविशीच्या आया बसलेल्या असतात. बापाचा जवळपास कुठे पत्ता नसतो? तो बहुदा फक्त रात्री झोपण्यापुरताच येत असावा.

माझ्या परिचयाचे एक कुटुंब आहे. हातावरचे पोट. गरिबी पाचवीला पुजलेली. त्यांना पहिल्या दोन मुली. मी म्हणालो, "आता थांबा. ऑपरेशन करा." नाहीच ऐकले. मुलगा हवा म्हणाले. आईवडील ऐकत नाहीत म्हणाले. झाले तिसरा मुलगा झाला. मला वाटलं 'आता थांबतील हे' पण कसलं काय? 'भावाच्या जोडीला भाऊ हवा' म्हणाले. 'पोरीचं काय लग्न करून जातील निघून.' झाले त्यांनी पुन्हा चान्स घेतला. कुठे गर्भ तपासणी करून मिळते का यासाठी जंगजंग पछाडलं. नाहीच जमलं. चौथी मुलगी झाली. मला वाटलं आता तरी गप्प बसतील. पण कसलं काय? पुन्हा चान्स. पण नशीब बलवत्तर म्हणून पाचवा मुलगा झाला. उद्या या पोरांच्या बापाला काही झालं तर हि पोरं लहानाची मोठी करताना त्या आईची किती परवड होईल? पण हा विचार माझ्या मनात येतो. त्यांच्या नव्हे.

ज्यांच्याकडे संपत्ती आहे ते दुसऱ्या मुलाचाही विचार फार सहज करत नाहीत. आणि ज्यांचे हातावर आहे अशा गरिबांच्या घरात वर्षाला पाळणा हलतो. आमच्या पोरी पंचवीस सव्वीस वर्षाच्या होईपर्यंत बोहल्यावर चढत नाहीत आणि गरिबांच्या पोरी पंचविशीत चार सहा पोरांच्या आया झालेल्या असतात. गरिबांना त्यांच्या भविष्याचा कधीही विचार करावा वाटत नाही. कारण त्यांना माहित असतं गरज पडेल तेव्हा स्वतःला कनवाळू समजणारे दाते, सेवाभावी संस्था, सरकार हाक न मारता पुढे येत असतं. आणि आपल्याला घास भरवत असतं.

परिस्थिती काय आहे याची प्रत्येकाला जाणीव होती. प्रत्येकाने वेळेत आपले घर, गाव गाठायला हवे होते. पण नाही. अनेकजण आहे त्या परिस्थिती रेंगाळत राहिले. आणि मग समाजातून आव्हान होऊ लागलं. प्रत्येकाने आपापल्या परीने अन्नछत्र उघडलं. लोक हात पसरून रांगा लावू लागले. कोणी एक शेतकरी गव्हाचे वाटप करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याला टीव्हीवर देखील प्रसिद्धी मिळाली. रांगेत उभ्या असणाऱ्या बायका अगदीच धडधाकट. सत्तर ऐंशी किलोच्या. गरिबी कुणाच्याही अंगावर दिसत नव्हती. पण फुकट मिळतंय ना मग उधळल्या.पण या सगळ्यामध्ये कनवाळूपणा अधिक असतो कि प्रसिद्धीची हाव? मला यामागे प्रसिद्धीची हाव असल्याचेच दिसून येते कारण असे काही करताना त्याचे व्हिडीओ केले जातात. समाजमाध्यमांवर व्हायरल केले जातात. कशासाठी असे? भिकाऱ्यांना भीक देणारे पाहिले कि माझ्या डोक्याचा संताप होतो. पण अशा रीतीने गरिबांना भीक देऊन पुण्य गोळा करू पाहणाऱ्यांना कोण समजावणार?


2 comments:

  1. खरंच आहे, हे दानशूर फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी खटाटोप करत असतात.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

      Delete