Saturday, 10 May 2014

Hollywood film 127 hours : जगण्याची उमेद आणि १२७ तास

Aron’s Ralston ची भूमिका करणारा James Franco
Aron’s Ralston ची भूमिका करणारा James Franco
प्रत्येकानं वाचायलाच हवा असा लेख. एका गिर्यारोहकाच्या आयुष्याची वास्तववादी कहाणी.

आपण जगतो कशासाठी ? हा प्रश्न मलातरी नेहमीच पडतो. तळहाता एवढा जीव घेऊन जन्माला यायचं. दाही दिशांनी वाढायच. लग्न करायचं. पोरं जन्माला घालायची. दोन वेळच्या अन्नासाठी हुजरेगिरी करायची. किडूकमिडूक जमवायचं. त्याला इस्टेट म्हणायचं आणि आपण मेल्यानंतर लोक काय म्हणतील म्हणून अप्तांनी एक सोन्याचा मनी बंद ओठात सरकवायचा. अग्नीच्या ज्वाळांनी आपल्याला लपेटलं कि आपली राख व्हायची. आणि आयाबायांनी " सोनं झालं गं बाई बाबाचं " म्हणत हळहळ व्यक्त करायची.

आमच्या कडे मागे ' १०० डेज ' नावाचा एक सिनेमा येऊन गेला. काय होतं त्यात आठवत नाही. पाश्चात्य संस्कृतीतून घ्यायचं म्हणालं तर घेण्यासारखं खूप काही आहे. पण आम्ही घेतो काय तर स्वैराचार. कुणी मला इंग्राजळेला म्हणतील. म्हणोत बिचारे. पण हॉलीवूड आणि बॉलीवूड अशी तुलना होऊच शकत नाही. आजकाल आमच्या नट नट्यांना हॉलीवूड मध्ये थोडीफार संधी मिळू लागलीय तर त्याचं कोण कौतुक ! दोनचार दिवसातून त्याविषयी एकतरी बातमी आमच्या वर्तमानपत्रात असतेच. 
पण परवा ' 127 hours ' हा Searchlight Pictures आणि Everest Entertaintment यांनी संयुक्तरित्या निर्माण केलेला Danny Boyle चा सिनेमा पहिला आणि सुन्न झालो.

हाच तो जिगरबाज गिर्यारोहक Aron’s Ralston
हाच तो जिगरबाज गिर्यारोहक Aron’s Ralston
Aron's या गिर्यारोहकाची हि कहाणी. पर्वत रंगांच्या कुशीत हा गिर्यारोहणाला गेलेला. एके ठिकाणी पाय घसरतो आणि पर्वताच्या एका खोल फटीत पडतो. खाली कुठेतरी पाय टेकतात पण हात ? एक हात वरून पडलेल्या मोठ्या धोंड्याखाली अडकलेला. मदतीला कुणीच नाही. दगडा खालून हात सोडवून घेण्याचा कोणताच मार्ग नाही. वेदना.......प्राणांतिक तडफड.....प्रयत्नांची पराकाष्टा.........घोर निराशा........जवळचं संपलेलं अन्न........रिकामी झालेली पाण्याची बाटली..........तासा मागून सरकणारे तास...........आणि दगडा खाली तस्साच अडकून पडलेला हात. Aron's Ralston ने १२७ तास लढा दिला. पण दगडा खालून हात सुटण्याचा आशेचा कुठलाच किरण दिसेना. आणि शेवटी त्यानं निर्णय घेतला.......हात तोडायचा. होय ! स्वतःच स्वतःचा हात तोडायचा. कुठलीही भूल न देता. डोळे टक्कं उघडे ठेवून. नाही तर आम्ही डॉक्टर इंजक्शन देतोय म्हटलं कि डोळे मिटून घेतो.

सिनेमात Aron's Ralston ची भूमिका केली आहे James Franco या अभिनेत्यानं. पण त्यानं हि भूमिका करायच्या आधी Aron's Ralston ते वास्तव जगलाय.

निव्वळ थ्रील किंवा एक वास्तववादी कथा म्हणून सिनेमा छान वाटला असं नाही. तर खरच सिनेमा सगळ्याच बाजूंनी सुरेख होता. पडद्यावरती सिनेमा उमटला कि लगेच दिग्दर्शकाची छाप दिसते आणि ती शेवटपर्यंत  टिकून रहाते.

सिनेमा सुरु होतो आणि पडद्यावर दिसते माणसांची गर्दी........मुंग्यांसारखी...........वेगवगळ्या देशातली. अगदी भारतातलीही. जगण्यासाठी धावणारी. हळू हळू गर्दी कमी होत जाते. आणि शेवटी उरतो एकच माणूस Aron's Ralston. खऱ्या अर्थानं जगण्याला लायक असलेला एकमेव माणूस.
एवढ्या मोठ्या संकटानंतरही नव्या उमेदीने गिर्यारोहण करणारा Aron’s Ralston
एवढ्या मोठ्या संकटानंतरही नव्या उमेदीने गिर्यारोहण करणारा Aron’s Ralston

2 comments:

  1. हो खरंच, एकाच वेळी मन सुन्न करणारा आणि जगण्यावर प्रेम करायला शिकवणारा अप्रतिम चित्रपट.
    एकदा सुरु झाल्यावर पूर्ण होईपर्यंत आपण त्या अनुभवाशी एकरूप होतो.
    Into the Wild हा Sean Penn ने दिग्दर्शित केलेला चित्रपट सुद्धा एक वेगळा अनुभव आहे.

    ReplyDelete
  2. अनन्या, मला सिनेमाचं वेड नाही. मुलं सुचवतात तेव्हा मी एखादा सिनेमा पहातो. तो मनाला भिडला तर त्यावर लिहितो. तू सुचविलेला सिनेमाही नक्की पाहीन.

    ReplyDelete