मित्रांनो,
अक्कलपूर हे गाव जगाच्या नकाशात कुठे आहे हे आम्हाला माहित नाही. सहाजिकच अक्कलराव नावाचे कुणी सद्गृहस्थ त्या गावात असण्याची सुतराम शक्यता नाही.
तरीही अक्कलराव आमच्या स्वप्नात आले. त्यांनी आम्हाला त्यांचं गाव सांगितलं. गाव सांगितलं. आणखी खुप सांगितलं त्यांनी आम्हाला त्यांच्याविषयी. पण क्षणापूर्वी स्वतःच नाव गाव सांगणारे अक्कलराव काही क्षणात पुन्हा स्वतःच नाव विसरून जातात.
अक्कालरावांच्या अशा खुप गंमती जंमती मी तुम्हाला सांगणार आहे त्यातली हि एक त्यांच्या शाळेत जाण्याची आणि अभ्यासाची गंमत -
अक्कलपुरचे अक्कलराव
अक्कलपुरचे अक्कलराव
छाती काढून खातात भाव,
जर विचारलं त्यांना नाव
लक्षात नाही म्हणतात राव.
अक्कलराव शाळेत जातात
वर्गात खुशाल झोपा घेतात,
मास्तरांच्या छड्या खाऊन
वरती पुन्हा ढेकर देतात.
वर्गामधे अक्कलराव
सगळ्यात मागे बसतात,
विनोद झाल्या नंतर ते
तासाभराने हसतात.
झोपताना उशाला ते
सारी पुस्तके घेतात,
उठ्ल्यावरती म्हणतात गेली
रात्र अभ्यासात.
अक्कलराव म्हणतात त्यांचे
सगळे पाठ पाढे,
डोळे झाकुनसुध्दा म्हणतात
वाचून दाखविन धडे.
ताड माड उंच पेन
ते परीक्षेला नेतात,
पेपर मात्र चक्क सारा
कोरा देऊन येतात.
अक्कलराव तसे मुलानो
अककलेचेच राव,
ओठावरती आणु नका
मुळीच त्यांचं नाव.
खोटी मिजास बाळगु नका
करा मन लावून अभ्यास,
तेव्हाच पहिल्या नंबराने
व्हाल तुम्ही पास.
पण मुलांनो अक्कलराव दिसत असे असले तरी खरे ते तसे नाहीत बरं का. ते आहेत खुप हुशार.तुमची गंम्मत करायची म्हणून त्यांनी हे सोंग घेतलंय.
खरे अक्कलराव फार हुशार आहेत. नुसते हुशारच नाहीत तर फार धाडसीही आहेत. ते राक्षसाच्या गुहेत जातात , विमानतबसतात, कागदाच्या होडीत बसून जगाची सफ़र करतात.
ते मुलांमध्ये मुल होतात
वेलीवरच फुल होतात
आपल्या भोवती खेळतानाच
पाहता पाहता गुल होतात
त्यांच्या सगळ्या गंमतीजंमती मी तुम्हाला हळुहळु सांगणारंच आहे.
त्यासाठी एका सुरात म्हणा
भेटू या पुन्हा !!!!!!!!
No comments:
Post a Comment