Wednesday 11 June 2014

social media and sex : सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग २

चार सहा दिवसापूर्वी मी सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग १  हा लेख लिहिला होता. एवढ्या काळात जवळ जवळ चारशेहून अधिक रसिकांनी तो लेख वाचला. त्यातील उद्बोधक चित्रे मी फेसबुकवरही लोड केली होती. पण कुठेही मला ना एकही Like मिळाली ना प्रतिक्रिया. याचे दोन अर्थ निघतात…… एक तर माझे विचार रसिक वाचकांना पटले नाहीत किंवा आपल्याला आपल्या मुलांची,  भावी पिढीची काळजी नसावी.
माझं दुसरं विधान मलाच फारसं पटत नाही. कारण आपल्या मुलांची काळजी प्रत्येक सुज्ञ पालकांना असतेच. आता राहिला पहिला अर्थ. त्यावर मी एवढंच म्हणेन कि माझे विचार रसिकांना पटत नसतील तर त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया द्यायला हवी. माझे विचार पटत नाहीत अशा चार सहा प्रतिक्रिया मिळाल्या असत्या तर मी हा दुसरा लेख लिहिण्याचा खटाटोप केला नसता.    

आजकाल सातवी आठवी शिकणाऱ्या मुलांच्या हातातही मोठ्या स्क्रीनचे, टच प्याड असणारे आणि अत्यंत महागडे स्मार्टफोन दिसतात. या मोबाईलची किंमत पाच हजारापासून पंचवीस तीस हजारापर्यंतही किंवा त्यापेक्षाही अधिक असते. कशासाठी देतात पालक एवढे महागडे मोबाईल आपल्या मुलांना ?

याचं एक फार समर्पक उत्तर पालकांकडून मिळतं.

पालक म्हणतात मुलांकडे मोबाईल असल्यामुळे त्यांच्याशी कधीही संपर्क साधता येतो. ती घरी येण्याची वेळ टळून गेली कि काळजी वाटू लागते. अशा वेळी त्यांच्याशी फोनवर बोललं कि जीव भांड्यात पडतो. मुलं कुठं आहेत ? त्यांना घरी यायला किती वेळ लागणार आहे ? हे जाणून घेता येतं.

पण मुलं असतात एखाद्या बागेत आणि सांगतात कॉलेजात……. मुलं असतात मैत्रिणीच्या घरी आणि सांगतात मित्राच्या घरी…………मुलं असतात सिनेमाच्या थिएटरमध्ये आणि सांगतात तिसरंच काही याचं काय ? ल्यांडलाईनचं एक बरं होतं. एकीकडे असायचं आणि दुसरीकडे दिसायचं हे तेव्हा शक्य नव्हतं. पण मोबाईल हातात घेऊन अशी फसवणूक सहज करता येते. आणि भाबड्या आई बाबांना मुलांवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो.

बरं आमच्या किंवा आपल्या काळी म्हणू फारतर पण आपल्या आई बाबांना आपली काळजी नव्हती का हो ? कि त्यांनी आपल्याला वाऱ्यावर सोडुन दिलं होतं. नक्कीच नाही. पण आपण मुलांच्या काळजीचा जेव्हढा बाऊ करतो आहोत तेवढा आपले आई बाबा करत नव्हते.

एक प्रसंग सांगतो -

मी पाचवीत होतो. घरापासून दहा - बारा किलोमीटरवर माझी शाळा. सकाळी अकराला निघायचो ते संध्याकाळी साडेसहा सातला पोहचायचो. शहरातल्या अंतर्गत वाहतुकीसाठी असणाऱ्या बसने प्रवास करायचो. प्रवासात एक ओढा.   

पावसाळ्याचे दिवस. संध्याकाळी नेमका शाळा सुटायच्यावेळी धो धो पाऊस पडलेला. शाळेत बातमी आली आज रात्रभर बस ओढयाच्या पलिकडे जाणार नाही. ओढ्याच्या पलीकडून येणारी आम्ही पंधरा वीस मुलं होतो. झालं काही मुलांची चलबिचल सुरु झाली. पण माझ्यासह बऱ्याच मुलांना आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या. चला आज या अशा पावसात आपल्याला घराबाहेर रहायला मिळणार. शाळेच्या मुख्याधापकांना मात्रं चिंता. मुलांच्या घरी कळवायचं कसं ? मोबाईल तर सोडा तेव्हा ल्यांडलाईनही घरोघरी नसायचे. शेवटी ज्या मुलांना आपल्या पालकांच्या कंपनीचे फोननंबर सांगता आले त्यांच्या कंपनीत फोन केले व ज्यांचे नंबर मिळाले नाहीत त्यांच्याविषयी निरोप देण्यात आले. 

शाळेचं वसतीगृह होतं. तिथंच आमची रहाण्याची सोय करण्यात आली. वसतिगृहाच्या भटारखान्यात भात शिजवण्यात आला. आम्ही जेवलो. वसतिगृहाच्या व्हरांड्यात मस्त ताणून दिली. सकाळी ओढ्याच्या पलीकडे वाहतूक चालू झाली तेव्हा आम्ही घरी पोहचलो.

जे मला मिळालं नाही ते मुलांनाही मिळू नये या मताचे कोणतेही आई बाबा नसतात. हा ! थोडीशी तुलना जरूर होते. पण जे जे आपल्याला मिळालं नाही ते ते सारं मुलांच्या पायाशी हजर करावं म्हणून आई बाबा नेहमीच तत्पर असतात. पण मोबाईल हि खरंच मुलांची गरज आहे ?  मला वाटतं मुळीच नाही. कमीत कमी बारावीचा निकाल हाती पडून महाविद्यालयात प्रवेश घेईपर्यंत तर नक्कीच नाही. महाविद्यालयात प्रवेश मात्रं मुलांच्या हाती फोन द्यायला हवा कारण आजच्या आधुनिकतेच्या युगात स्मार्टफोन हा काहीशी गरज झालेला आहे.  

खरंतर मोबाईल हि गरज नसतेच शालेय वयात. केवळ यानं घेतला म्हणून त्यानं घेतला. त्यानं घेतला म्हणून यानं हट्ट केला. झालं प्रत्येकाच्या हातात महागडे मोबाईल दिसू लागले. काय करतात मुलं मोबाईलवर ? फेसबुक , वोट्स अप, गेम्स , बस्स. पण या सोशल साईट्स किती विषारी आहेत हे आपण शिवाजी महाराजांच्या  बदनामी प्रकरणात अनुभवलेलं आहेच.

या दोन्ही भागात अश्लिलतेविषयी फारसं लिहिलंच नाही. कारण आमच्या भारतीय ब्लॉगवर अश्लील लिहिण्यास आणि तसले फोटो लोड करण्यास मज्जाव आहे. पण तरीही काही गोष्टींविषयी पुढच्या भागात लिहिणार आहे. तो भाग वाचून ठरवा आपण आपल्या मुलांना असल्या अश्लिलते पासून दूर ठेवायचं कि त्या प्रवाहात वाहू द्यायचं.   

तेव्हा कृपा करा या पिढीच्या हातात मोबाईल दिलेत पण पुढच्या पिढीच्या हातात देऊ नका.

4 comments:

  1. अमोलजी प्रतिक्रियेबद्दल आभार. खरंच येत्या पिढीला आपण मोबाईलपासून दूर ठेवू शकलोत तर तेच या लिखाणाचं सार्थक.

    ReplyDelete
  2. aplya vicharanchi samajala garaj ahe.

    ReplyDelete
    Replies
    1. जगदिशजी प्रतिक्रियेबद्दल आभार. माझ्यासारखे विचार अनेकांचे असतात. त्यामुळे मी खूप काही जगावेगळं सांगतोय असं समजण्याच काहीच कारण नाही. गरज आहे ती प्रत्येकानं आपले विचार कृतीत आणण्याची.

      Delete