Saturday, 22 November 2014

Shivsena, BJP, NCP : पवारांची पलटी

देशाच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांचा मन मोठा असला तरी त्यांची पत फार कमी आहे. आणि म्हणुनच इच्छा आणि पात्रता असुनही ते कधीच देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत. पण राजकीय डाव टाकण्यात त्यांच्या एवढा पट्टीचा मल्ल अवघ्या देशात नाही.  त्यामुळेच स्थिर सरकारसाठी भाजपाला पाठींबा असं ठासून सांगणारे शरद पवार आज सरकार स्थापन करून केवळ दहा दिवस झाले नाहीत तोच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील असं भाकीत करतात. तेव्हा त्या विधानाचा मतितार्थ शोधावाच लागतो. पण खरचं तसं घडेल का ?
घडणार असेल तर ' स्थिर सरकारसाठी भाजपाला पाठींबा ' असं म्हणणारे पवार केवळ दहा दिवसात त्या सरकारला सत्तेवरून खाली खेचू पहाताहेत का ? पवारांच्या पाठिंब्यावर विसंबुन भाजपा गाफील राहिली का ? या सगळ्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

मागे मी शरद पवारांची गुगली आणि शरद पवारांची चतुराई हे लेख लिहिले होते. आणि केवळ महिन्याच्या आत मी त्यांच्या निर्णयावर तिसरा लेख लिहतोय. कारण त्यांची प्रत्येक कृती, प्रत्येक विधान तेवढंच सनसनाटी होतं.

मतदान मोजणीच्या आदल्या दिवशी आमची सरकारमध्ये महत्वाची भुमिका राहील असं जाहीर करणारी राष्ट्रवादी. मतमोजणीच्या दिवशी निकालांचा कल पाहून लगेच भाजपाला बिनशर्त जाहीर करणारी राष्ट्रवादी. किती शाश्वत वाटत होती. ती विधानं करताना त्यांनी जनमताचा, राष्ट्रवादीच्या तत्वाचा कशा कशाचा विचार केला नाही. कारण आपण हे सारं का करो आहोत हे त्यांना माहित होतं. पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही गोष्टी घडल्या असल्या तरी सगळ्याच गोष्टी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडल्या नाहीत. आणि घडणारही नाहीत हे त्यांना कळून चुकलंय. मग ज्या तव्यावर आपली पोळी भाजणार नसेल त्या तव्यावर पोळी टाकाच कशाला या आणि एवढयाच हेतुने त्यांनी कालचं विधान केलंय. भाजपाला पाठींबा देण्यामागे शरद पवारांचा काय हेतू होता हे मी शरद पवारांची गुगली या लेखात विस्ताराने लिहिले आहे. त्यामुळे त्याविषयी फार सविस्तर लिहिण्याची गरज नाही. पण पवारांनी अशी पलटी का खाल्ली ते थोडक्यात सांगतो -

आपण भाजपाला पाठींबा दिला तर शिवसेना - भाजपातलं वैर वाढीस लागेल हि पवारांची अपेक्षा. ती बऱ्याच अंशी पुर्ण झाली. पण आपण पाठींबा जाहीर करताच भाजपा ' हुरळली मेंढी आणि गेली लांडग्या मागे ' या उक्तीनुसार आपल्या मागे येईल आणि आपला पाठींबा घेईल असे पवारांना वाटत होते. पण निकाल जाहीर झाल्यापासून भाजपा नेतृत्वानं कधीही राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत स्वारस्य दाखवलं नाही. आणि कुणीही त्यांच्या गोटात चर्चेस गेलं नाही. त्यामुळे भाजपा शिवसेनेला चुचकारून तर आपल्याला खिजगणतीत न धरून शिवसेने बरोबर आपलीही नाचक्की होतेय हे शरद पवारांच्या लक्षात आलं. आजवर जनतेस दिसेल असा आपला पाठींबा भाजपानं घेतला नाही. आणि भविष्यातही घेणार नाही याची जाणीव शरद पवारांना झाली. त्यामुळेच आज उद्या भाजपा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालेल हि शक्यता मावळली.

शरद पवार राजकारणात जेवढे मुरलेले आहेत. तेवढंच भाजपा मुरलेलं आहे. त्यामुळेच पवारांच्या पाठिंब्यावर भाजपानं कोणत्याही क्षणी विश्वास ठेवला नाही. इतकंच काय भाजपाने जाहीरपणे राष्ट्रवादीचा पाठींबा सतत नाकारत राहिली. आपला पाठींबा मिळताच भाजपा शिवसेनेवर तुटून पडेल अशी शरद पवारांची अपेक्षा होती. पण शरद पवारांनी पाठिंब्याची ग्वाही दिलेली असताना भाजपानं शिवसेनेच्या विरोधात कधीही उग्र भुमिका स्विकारली नाही. उलट शिवसेनेचीच टिका भाजपानं अत्यंत संयमानं घेतली. त्यामुळे भाजपा शिवसेना एकत्र येण्याची चिन्ह पवारांना दिसू लागली. आणि आता जर हे जुने मित्रं एकत्र आले तर आपण तोंडघशी पडु हे त्यांनी जाणलं आणि म्हणुनच त्यांनी हे असं विधान केलं.

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील असं विधान करून त्यांना आणखी एक गोष्ट साधायची आहे. आजही भाजपा आणि शिवसेनेत पुर्ण वितुष्ट आलेलं नसली तरी राष्ट्रवादीच्या भुमिकेमुळे शिवसेना काही पावलं मागे सरकली होती. आपण मध्यावधी निवडणुकांचं विधान केलेल्या बरोबर शिवसेना जागी होईल आणि मंत्री पदाच्या मागणीबाबत पुन्हा आग्रही होईल. तसे झाले तर जनमानसात शिवसेनेची आणखी नाचक्की होईल. भाजपा शिवसेनेत धुमसत असलेलं सख्य पेट घेईल. आणि त्यांच्या मैत्रीची राख उधळुन आपण निवडणुकांची धुळवड खेळु. कदाचित महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणुन उदयाला येऊ.

पवारांच्या मनात हीच आणि एवढीच गणितं असतील. पण तसं होईल असं मला अजिबात वाटत नाही. म्हणजे शरद पवार पाठींबा काढून घेतील हे नक्की. पण शिवसेना भाजपातली मैत्री संपुष्टात येणार नाही तर काळाची पावलं ओळखुन दोघे एकत्र येतील. आणि तसे न होता खर्च महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्या तर काय होईल यावर आज काही लिहीण्यापेक्षा तेव्हाच लिहीन. 

2 comments:

  1. या साहेबांना आता जरा दुर्लक्षित कराल तर सर्वांच्या ते हिताचे होईल. त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द इतक्या पोटतिडीकीने विचारात घेतलाच पाहिजे असे नाही. आता त्यांना अडगळीत टाकण्याचे दिवस आले आहेत.

    ReplyDelete
  2. Mannab अत्यंत मोजकी पण चपखल प्रतिक्रिया. आभार.

    ReplyDelete