Monday, 10 November 2014

BJP, Shivsena, NCP : शरद पवारांची चतुराई

धनुष्य बाण उद्धव ठाकरे यांच्याकडे असला तरी अचूक बाण सोडण्याचं आणि नेमका नेम साधण्याचं कसब त्यांच्याकडे नाही. पण घड्याळ सोबत घेऊन फिरणाऱ्या शरद पवारांचं
बाण सोडण्याचं टायमिंग मात्र अचूक आहे. मतमोजणी होण्यापूर्वी ' सरकारमध्ये आमची भुमिका महत्वाची राहील. ' असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं. तर मतमोजणीच्या दिवशी दुपारीच , ' आम्ही भाजपाला बाहेरून पाठींबा देऊ. '  असं जाहीर केलं. या सगळ्या घडामोडींविषयी मी ' शरद पवारांची गुगली ' या लेखात लिहिलं होतं. या लेखात मी शरद पवार यांच्यावर काहीशी टीका केली होती. त्यांचं राजकारण स्वार्थी आहे असं मत मांडलं होतं. अर्थात अनेकांना ते रुचलं नाही. 

तर मी शरद पवारांच्या टाईमिंग विषयी बोलत होतो. विधानसभेचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर चार दिवसात शरद पवारांनी काँग्रेसनं शिवसेनेला पाठींबा देवुन भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी केलेल्या विचारणेबाबत  गौप्यस्फोट केला. नेहमीप्रमाणे काँग्रेसनं हि गोष्ट नाकारलीच. तर चार सहा दिवसापुर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी पाठिंबा दयावा म्हणुन शिवसेनेने आपली भेट घेतली होती हे जाहीर करून टाकलं. शिवसेना मात्र हि भेट कायम नाकारत आली.

पण विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शरद पवारांनी , ' आम्ही भाजपाला स्थिर सरकारसाठी बाहेरून पाठींबा देणार आहोत. ' हे स्वतः जाहीर करून टाकलं. हे करताना काँग्रेसची गोची केलीच. पण शिवसेनेलाही दणका दिला. भले या सगळ्यात त्यांचा स्वार्थ असेलही. पण तो साधण्याच त्यांचं कसब मात्र वाखाणण्याजोगं आहे.

जी राजकीय परिपक्वता शरद पवारांनी दाखवली. तीच भाजपानं. एखादया दुसऱ्या नेत्याचा अपवाद वगळता भाजपानं राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत कधीही उस्तुकता दाखवली नाही. तसंच कोणत्याही क्षणी राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारलाही नाही. आणि शिवसेनेवर टिका करणं कायम टाळलं. 

शरद पवारांच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुळीच विश्वास नाही. राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन आपण आपलं सरकार अस्थिरतेच्या कड्यावर उभं करणार आहोत. तिथुन आपल्या सरकारचा कोणत्याही क्षणी कडेलोट होऊ शकतो. याची त्यांना पुर्ण जाणीव आहे. त्यामुळेच ते अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या पाठिंब्याची वाट पहात आहेत. पण असं काही होईल, शिवसेना भाजपाला पाठींबा देईल हि शक्यता दिवसेंदिवस दुरावतेच आहे.

शिवसेना सत्तेत सहभागी झाली नाही तर नुकसान शिवसेनेचं होणार आहे. भाजपाच्या १२३ आमदारांमध्ये इतर पक्षातून आलेले २२ आमदार असतील तरी शिवसेनेच्या ६३ आमदारांमध्ये सुद्धा ११ आमदार हे इतर पक्षातुन आलेले आहेत. त्यामुळेच हे आमदार वेळ आल्यास कोणत्याही क्षणी शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील आणि भाजपाच्या गोटात सामील होतील. हा सगळा खेळ करताना शिवसेनेने येत्या वर्ष दोन वर्षात येणाऱ्या नगरपालिकांच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा तरी विचार करायला हवा होता.


एकेकाळी देशभरात दोन खासदार असणाऱ्या भाजपाच आपण खच्चीकरण करू शकणार नाही याची शरद पवारांना पुर्ण जाणीव आहे. पण महाराष्ट्रात कडेलोटाच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसला दरीत ढकलण्यास ते नक्कीच उस्तुक आहेत. शरद पवार एकाचवेळी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचं खच्चीकरण करत आहेत. काँग्रेसच काय व्हायचं ते होउ दे पण आपलं खच्चीकरण होतं आहे, आपली पीछेहाट होते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं पाऊल मागं पडतं आहे हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात यायला नको ?

शरद पवार मात्र काँग्रेस आणि शिवसेनेचं खच्चीकरण करताना महाराष्ट्रातल राष्ट्रवादीच राजकारण अधिक मजबुत करत आहेत. 

पण उद्धव ठाकरे स्वतः फारसा विचार करत नाहीत. या विषयी मी , ' शिवसेनेतली आनंदीबाई ' या लेखात लिहिलं होतं. त्यामुळेच कानाला लागू पहाणाऱ्या या सगळ्यांना दूर ठेऊन निर्णय घेतले तर ते शिवसेनेच्या अधिक फायद्याचं होईल. स्वाभिमान या गोष्टींचा मागमूसही न दाखवता शरद पवारांनी जसा भाजपाला पाठींबा दिला तसा शिवसेनेने दिला तर ते शिवसेनेच्या फायद्याचं होईल. वेळ आली तेव्हा संभाजी महाराजांसह शिवाजी महाराज स्वत औरंगजेबाच्या दरबारी कैदेत राहिले. योग्य वेळ साधुन मिठाईच्या पेटाऱ्यातून पळाले. महाराजांच्या या कृतीला इतिहास महाराजांचा पळपुटेपणा म्हणत नाही.

नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची हि राजकारणाची समज लक्षात घेऊन निर्णय घेतले तर शिवसेनेचंच भलं होईल. अन्यथा मुजोर पातशाहीचा अंत झाला तसा उद्धव ठाकरेंच्या शिवशाहीचा शेवट व्हायला फारसा वेळ लागणार नाही. 

10 comments:

 1. मुळात ही संघटना समाजकारणासाठी आहे असे सांगून स्थापली आणि सतत सत्तेवरील पक्षीयांच्या संगनमताने वाढवली ; त्यात हिंदुत्वाचे पाणी टाकून ती तगवण्याचा प्रयत्न केला आणि तो कडवट लोकांनी मानून घेतला. आता या पक्षाच्या प्रमुखपदी आलेले चिरंजीव काय लायकीचे आहेत हे कितीदा पहायचे ? आता ही संघटना अस्ताला लागली आहे .

  ReplyDelete
 2. Mannb आपण नेमक्या कोणत्या संघटने विषयी बोलताय हे लक्षात येत नाही. पण आपण शिवसेनेविषयीच असे वाटते. आपल्या मित्रपक्षावर टीका करून आपली पक्षात जन फुंकता येईल असे उद्धव ठाकरेंना वाटते. त्यामुळेच ते अधः पतनाच्या मार्गावर निघाले आहेत.

  ReplyDelete
 3. होय, मी शिवसेनेविषयीच लिहिले आहे. अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही. आज ना उद्या बुडणारी ती नौका आहे.

  ReplyDelete
 4. मानब प्रतिक्रियेविषयी आभार. मी दुषित नजरेने लिहित नाही. माझ्यावर अनेकजण तसा आरोप करतात. समाधान एकाच गोष्टीचा कि आपल्यासारखे माझ्या मतांशी सहमत असणारेही अनेकजण आहेत.

  ReplyDelete
 5. हायकोर्टानी मराठा आरक्षणस स्थगिती दिली...

  हायकोर्टात मराठा आरक्षण टिकू नये यासाठी फडणवीसनी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झालेल्या दुसर्‍याच दिवशी आरक्षणा बाबत कोर्टात बाजू मांडण्यासाठी अजितदादानीं लावलेले तीन सचिव काढून टाकले..
  त्यामुळे आरक्षणा बाबत आपली बाजू कमकुवत झाली... आणि आज हायकोर्टानी मराठा आरक्षणस स्थगिती दिली..

  ReplyDelete
 6. मित्रांनो कृपा करून निनावी प्रतिक्रिया देऊ नये. कारण मी कोणाला उत्तर देत आहे हे इतर वाचकांना कळण्यास मार्ग उरत नाही. आपण नाव टाकले तरी आपल्यावर कोणीही कसलीही कारवाई करणार नाही. कृपया अपशब्द वापरू नयेत. यापुढे अशा प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत. या ब्लॉगवर जातीयवादाला थारा नाही.

  आपण म्हणताय ते खरं असतं तर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीनं पाठींबा काढून घेतला असता.

  ReplyDelete
 7. राष्ट्रवादी हा पक्ष मुळात सत्तेशिवाय जगूच शकत नाही. आता शिव सेनेला एन डी ए मधून बाहेर काढून राष्ट्रवादीला स्वतः करता प्रवेश व मंत्रिपदे हवी आहेत. शिवाय मित्र पक्ष म्हणून महाराष्ट्रातील घोटाळे भाजपला बासनात बांधून ठेवावे लागतील हाच मुख्य शरद पवारांचा उद्देश आहे व त्यांची हीच रण नीती आहे. शिव सेना संपेल असे म्हणणाऱ्या लोकांना राज कारण कळत नाही असे खेदाने म्हणावे लागेल.

  ReplyDelete
 8. चंद्रशेखरजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. शिवसेना संपेल असं मी माझ्या लेखी कुठंही म्हणालो नाही. शरद पवार स्वतःला कितीही चतुर आणि धुरंधर राजकारणी समजत असले तरी त्यांचं राजकारण किती आत्मकेंद्री आहे हे आता लपून राहिलेलं नाही. शिवसेना संपणार नाही. पण आजच नव्हे तर भविष्यात कधी शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येवू शकणार नाही. शिवसेनेला महाराष्ट्रात राजकारण करायचा असेल तर भाजपाला सोबत घेऊनच करावं लागेल आणि त्यासाठी वेळप्रसंगी स्वाभिमानाची भाषा बाजूला ठेवून दुय्यम भुमिका घ्यावी लागेल. भाजपा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे तो नेहमीच स्ब्लाची चाचपणी करत रहाणार. पण महाराष्ट्रात स्वबळावर निर्विवाद ( म्हणजे गुजरात, एमपी याप्रमाणे वर्षानुवर्षे बहुमताने ) राज्य करता येणार नाही. त्यामुळेच भाजपा नेते नेहमी पडती बाजू घेताहेत. पण त्याचा फायदा घेऊन शिवसेनेने भाजपाला कमी लेखून मानहानीकारक वागणूक देवू नये.

  ReplyDelete
 9. एकदम बरोबर

  ReplyDelete
 10. मित्रा, अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete