Thursday 6 March 2014

Story for kid's : मुर्ख राजा आणि विदुषक

अडगमपूर नावाचं एक राज्य होतं. सोमा हा तिथला राजा. शूर पण काहीसा छंदीफंदी. सकाळच्या प्रहरी त्याच्या आवडत्या घोडयावरून रपेट मारण्याचा त्याला भलताच नाद. केवळ त्या शौकापाई त्यानं दूरदूरवरच्या राज्यातून घोडे आणून त्याच्या तबेल्यात जोपासले होते. त्याच्या ठेवणीतला एखादा घोडा त्याच्या पसंतीतून उतरल्यास तो त्याला लगेच विकून टाकत असे. तसेच एखादा तगडा, राजबिंडा घोडा त्याच्या नजरेस पडल्यास कोणताही विचार न करता तो घोडा खरेदी करत असे.

छंद जोपासण्याच्या भरात राजाच्या हातून घडणारा हा अविचारीपणा एका दूर देशीच्या व्यापाऱयानं चांगलाच हेरला. आणि या गोष्टीचा फायदा घ्यायचा ठरवून
तो व्यापारी काही घेऊन घोडे राज्यात पोहचला.

एक व्यापारी काही घोडयांसह राज्यात उतरलाय हे कळताच राजनं त्या व्यापाऱ्याला घोडयांसह आपल्या पागेत बोलावलं. प्रत्येक घोडा बारकाईनं न्याह्ळला. एक दोन घोड्यांवरून रपेटही मारून पहिली. पण एकही घोडा राजाच्या पसंतीस उतरला नाही.

" शेटजी, कसले घोडे आणलेत ? आम्हाला तुमचा एकही घोडा पसंत नाही. "

" क्षमा असावी हुजूर. आम्ही महाराजांची पारख आणि कुवत ओळखू शकलो नाहीत. " व्यापारी निराश झाल्याचा आव आणत म्हणाला.

" कुवत ओळखू शकलो नाही, मतलब ? " महाराजांनी भुवया उंचावत विचारलं.

" माफी असावी महाराज. आमच्याकडे याहूनही खूप उमदे घोडे आहेत. पण खूप किमती आहेत. शिवाय त्यांना सोबत घेऊन फिरल्यास त्यांचे तेज उतरते. महाराजांनी त्या घोड्यांची किंमत आगाऊ दिल्यास आम्ही ते घोडे महाराजांच्या दिमतीला हजर करू. "

महाराजांनी क्षणाचाही विचार केला नाही. खजिनदारांना व्यापारयानं सांगितलेली रक्कम अदा करण्याचं फर्मान सोडलं. व्यापारी त्रिवार मुजरा करत मागे सरकला. पण मागे सरकताना त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं छद्मी हसू महाराजांना दिसलं नाही.

व्यापारी राजाच्या तिजोरीतून भलीमोठी रक्कम घेवून गेला. दिवसामागून दिवस आणि महिन्यानं मागून महिने उलटले. व्यापारी काही घोडे घेऊन येईना.

एक दिवस दरबारातला राजाचा आवडता विदुषक दरबारात पोहचला. राजाला मुजरा करत राजाच्या समोरील आसनावर विराजमान झाला. राज्याचे प्रधानमंत्रीही तिथंच उपस्थित होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. राजानं राज्यातल्या घडामोडींची विचारणा केली. विदुषकाला आयती संधी मिळाली. तो तत्परतेने म्हणाला, " महाराज, अलिकडे आपल्या राज्यात मुर्खांची संख्या खुप वाढलीय."

" मग ती कमी कशी करणार. "

" महाराज, मी त्या मुर्खांची यादी तयार केली आहे. त्या मूर्खांना राज्याबाहेर हाकलून दिल्यास आपोआपच राज्यातल्या मुर्खांची संख्या कमी होईल आणि आपल्या राज्यात केवळ शहाणी रयत उरेल. "

" तू विदुषक असूनही लाख मोलाचं बोललास. बघू ती यादी. "

विदुषकानं यादी राज्याच्या हाती ठेवली. राजानं यादी हातात घेतली आणि यादीत सर्वात वरती स्वतःच नाव पाहून खूप संतापला. त्यानं त्याक्षणी विदुषकाचा शिरच्छेद करण्याचा हुकुम सोडला. हेच बक्षीस पदरी पडणार याची विदुषकाला जाणीव होती. तो घाबरला नव्हता. त्यानं राजाला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

पण राजा काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्याचवेळी राज्याचे प्रधान मंत्री पुढे सरसावले. महाराजांना मुजरा करत म्हणाले, " महाराज, याच क्षणी तुमच्या हुकुमाची अंमलबजावणी होईल. "

" मग वाट कसली बघताय ? " राजा रागानं बेभान झाला होता.

" महाराज अभय असावं. पण एक विनंती करायची आहे. "

" अभय आहे.  बोला. "

" विदुषकाला फाशी देण्यापूर्वी त्याचं म्हणनं ऐकून घ्यावं. "

महाराजांची परवानगी मिळताच विदुषक म्हणाला, " महाराज, तो व्यापारी कुठला ? कोणत्या राज्यातला ? आपल्या शत्रूच्या कि मित्राच्या राज्यातला ? तो खरेच घोडे घेऊन येणार का ? आला तरी ते घोडे तुम्हाला पसंत पडतील का ? अशा कोणत्याही गोष्टीची खातरजमा करून न घेता तुम्ही त्याला केवढी मोठी रक्कम दिलीत. आपल्या राज्यातला मुर्खातला मूर्खही अनोळखी माणसाला अशी रक्कम देणार नाही."

राजाला त्याची चूक कळली. तरीही आपली कृती कशी योग्य होती हे पटवून देण्यासाठी राजा म्हणाला, " पण उद्या जर तो व्यापारी घोडे घेऊन आला तर तू काय करशील ? "

" त्या क्षणी मी तुमच्या जागेवर त्या व्यापाऱ्याच नाव टाकीन. "

विदूषकाच्या या उत्तरावर राजा खुष झाला. विदुषकाला सुनावलेली शिरच्छेदाची शिक्षा मागे घेत गळ्यातला कंठा विदुषकाला बहाल केला.

No comments:

Post a Comment