Saturday 27 June 2020

बाप आणि कावळा

vijay shendge images


इंदुरीकर महाराजांनी सम विषमचं विधान केलं. त्यांच्या विधानामुळे जणू काही जगबुडी येणार आहे अशा थाटात त्यांच्यावर खटला दाखल झाला. त्यांच्यावर खटला दाखल झाला म्हणून तृप्ती देसाईला आनंद झाला. आता या
लेखातील विचार वाचून अंधश्रद्धा समितीतील कोणी माझ्यावर खटला दाखल करू नये म्हणजे मिळवली. हिंदू धर्मातल्या अनेक गोष्टी या श्रद्धेचा भाग आहेत. ती अंधश्रद्धा कि काय याविषयी ठामपणे कोणीही काहीही सांगू शकणार नाही. पिंडाला कावळा शिवणे हि देखील अशीच एक श्रद्धा.

मृत्यूनंतर माझे सगळे विधी पुण्यातच व्हावेत अशी वडिलांची इच्छा. परंतु बंधूंच्या आग्रहाखातर त्यांचा दहावा गावी केला. तिथल्या दशक्रिया घाटावर पिंडाला कावळा शिवत नाही हा मागील वीसेक वर्षाचा अनुभव. एवढ्या वर्षात चार सहा पिंडाला कावळा शिवल्याचे मी अनुभवलेले. अनेकदा कावळा तर शिवत नाहीच परंतु गाय सुद्धा पिंडाला तोंड लावत नाही. मग पिंड पाण्यात सोडून दिला जातो. आणि 'गंगेत न्हालं, पवित्र झालं' या उक्तीनुसार पाण्यात सोडलेला पिंड पवित्र मानून मासे खातात. माणूस त्यात समाधान मानतो. परंतु खरंच मासे पिंड खातात कि नाही, हे पहायला पाण्याखाली कोणीच जात नाही. वडिलांच्या पिंडाला कावळा शिवला नाही तर जमलेली मंडळी कशात अडकला असेल गड्याचा जीव? अशी चर्चा करत घरी परतणार. आणि आमच्या सगळ्यांच्या मनाला उगाच टाचणी लागून रहाणार.

असो. मृत्यूनंतरही आमच्या वडिलांनी आमची आब राखली आणि अशक्य वाटत असताना अवघ्या दहा मिनिटात पिंडाला कावळा शिवला. मृत्यूपूर्वी वडिलांना शब्द दिला होता. त्यामुळे मी माझी नौकरी सोडली आणि गावी जाऊन शेती करू लागलो. गेली दहा वर्ष मी शेती पाहतो आहे. कुटुंब पुण्यात मी शेतावर. दुष्काळ पाहिले, पिकांचे मातीमोल भाव अनुभवले. उन्हात भाजलो. पावसात भिजलो. वादळ वारा सोसला. थंडी सोसली. डोळ्यासमोर मिट्ट काळोख असताना आणि सोबतीला कोणी नसताना भरणे केले. लाखभर रुपये खर्ची घालून पाईप लाईन केली. दोन-अडीच लाख खर्च करून विहीर बांधली. पाच पन्नास हजार खर्ची घालून थोडी लेव्हलिंग केली. 

पहिले पाच सहा वर्ष वडील वर्षा सहा महिन्यातून स्वप्नात यायचे. माझ्याशी बोलायचे. शेतावर चक्कर मारायचे. पण गेल्या चार वर्षात ते स्वप्नात आलेच नाहीत. मी मात्र वाटेकरी घेऊन नेटाने शेती करत राहिलो. सोमवारी ऊस लागण करायची म्हणून गावी गेलो होतो. दोन एकराचं बेणं पुरलं होतं. पुढच्या दोन एकराच्या बेण्याची तोड सुरु होती. पुरलेल्या बेण्यावर पाणी सुरु होतं. मी बाऱ्यावर होतो. माझ्या पाठीमागच्या लिंबाच्या झाडावर एक कावळा बसला होता. मला हाक मारत असावा असाच त्याचा आवाज वाटला. क्षणभर 'माझे वडील तर नसतील ना हे?' असा विचार मनात येऊन गेला. पण पुन्हा कामात रमलो.

थोड्या वेळाने पंख फडकावत कावळा खाली उतरला. चार सहा पावलांचं अंतर राखून पाटात बसला. पंख फडकावत अंघोळ केली. माझ्या मनात आलं 'पोराने दिलेला शब्द पाळला' म्हणून माझे वडीलच अंघोळ करायला आले असावेत असा विचार माझ्या मनात आला. आणि डोळ्यांचे पाट झाले. मुलांनी जिवंतपणी आई वडिलांना दिलेला शब्द पाळायला हवाच. परंतु ते मेल्यानंतर सुद्धा त्यांना दिलेल्या शब्दाचे स्मरण करायला हवे. तशी कृती करायला हवी. 

4 comments:

  1. वाह. खूप भावस्पर्शी. खर्या भावनांमुळे मनाला स्पर्श केलात

    ReplyDelete