Saturday 19 July 2014

Social Media and sex : सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग ४

 ( कृपया लेख पूर्ण वाचा. माझ्या मुलाचं आहे म्हणून नव्हे पण शेवटचं उदाहरण आवर्जून पहा.)

सोशल मिडिया आणि अश्लीलता या विषयावर लिहावं तितकं थोडं आहे. पण तरीही आज चौथा भाग लिहून हा विषय मी माझ्यापरीनं संपवणार आहे. या भागात मुलांना मोबाईल पासून दुर कसं ठेवावं याविषयी लिहिणार आहे. यानंतरही वाचकांनी हि बाब गांभीर्यानं घेतली नाही तर आपलंच भविष्य धोक्यात येणार आहे. कारण अनेक सेक्सियुल वेब साईट्स ना व्हिव आणि लाईक करणाऱ्यांची संख्या लाखात आणि कोटीत असते आणि त्यात आपलीही मुलं असु शकतात.
खरंतर शासनानं अशा साईट्स ब्लॉक करायला हव्यात. पण काही आंतरराष्ट्रीय नियमांमुळे शासन तसं करू शकत नाही. पण शासनाचे हात बांधले गेले असतील तरी आपले हात मात्र कुणी बांधलेले नाहीत. त्यामुळेच जे आपल्या हाती आहे ते आपण करू या.   


आजतागायत मी सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग १ , भाग २ आणि भाग ३ लिहिले आहेत.  पहिल्या भागात चार सहा महिन्यांच्या मुलाला मोबाईलची सवय कशी आणि कुणामुळे लागते तसेच हि सवय मुल चार सहा वर्षाच होईपर्यंत हाताबाहेर कशी जाते याविषयी लिहिलं होतं.

तर भाग २  मधे शालेय वयातील मुलांना मोबाईलची गरज का नसते याविषयी लिहिलं होतं.

तर तिसऱ्या भागात ज्या वयात मुलांनी अभ्यास करायला हवा त्या वयात मुलांच्या समोर सेक्सी, भोग विषयक विषय कसे येतात. शालेय वयातल्या आणि उच्च माध्यमिक शिक्षण ( ११,१२ वी ) घेणाऱ्या या मुलांच्या मोबाईल वर नेमकं काय चालतं ? याविषयी लिहिलं होतं.

मोबाईल , इंटरनेट या गोष्टी घातक नाहीत पण त्यांचा अति आणि अयोग्य वापर निश्चितच घातक आहे. त्यामुळेच या गोष्टींचा मुलांनी कसा आणि किती वापर करावा यावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणं हे पालकांचं काम आहे. 

हे करणं फार अवघड नाही. त्यासाठी मुलांवर ओरडण्याची, त्यांना मारहाण करण्याची मुळीच गरज नाही. प्रेमानं जग जिंकता येतं मग आपण आपल्या मुलांना का नाही जिंकू शकणार. पाण्याला जसं वळण मिळेल तसं पाणी वहातं. यावर कुणी म्हणेल आम्ही आमच्या मुलांना चुकीचं वळण लावतो का ? नाही मुळीच नाही कोणतेच आई बाबा आपल्या मुलांना चुकीचं वळण लावत नाहीत. पण बऱ्याचदा जिथून मुलांना चुकीचं वळण लागतं तिकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि मुलांना चुकीचं  वळण लागण्याच्या वयाचे काही टप्पे आहेत ते आपण सांभाळले कि आपलं पुढचा काम सोपं होतं.

सर्वात पहिला टप्पा - वय वर्ष १ ते ७

या वयात मुलांना आपण आपल्या ज्या गोष्टी गरजेच्या वाटत नाहीत त्यापासून दूर ठेवलं  कि पुढच्या अनेक गोष्टी सोप्या होतात.  उदा. पहिल्या भागात मी चार सहा महिन्यांच्या मुलाला मोबाईलची सवय कशी आणि कुणामुळे लागते तसेच हि सवय मुल चार सहा वर्षाच होईपर्यंत हाताबाहेर कशी जाते याविषयी लिहिलं होतं. आता आपण जर त्या वयात मुलांना त्यापासुन गोष्टींपासून दूर ठेवलं तर पुढे मुलांना त्या गोष्टींचं आकर्षण वाटणारच नाही. किंवा आपण स्वतःच मोबाईलवर कधीही गेम खेळलो नाहीत आणि त्याचा वापर केवळ फोन म्हणून केला तर आपोआपच मुलांना मोबाईल कशासाठी असतो हे लक्षात येतं आणि पुढे मुलंही मोबाईलचा केवळ तेवढ्यासाठीच वापर करण्याची शक्यता निर्माण होते.

आणखी एक या वयात आपण मुलांचं आल्या गेल्यांसमोर अति कौतुक करू नये. कारण मुल लहान आहे म्हणून आपण बऱ्याचदा त्याच्या कृष्ण लीलांच नको तितकं कौतुक करतो आणि आणि मग. त्या गोष्टी मुलं अधिक प्रमाणात करू लागतात. याची काही उदाहरनं मी  पहिल्या भागात दिली आहेत.

दुसरा टप्पा - वय वर्षं १२ ते १८

या वयात मुलांमध्ये शारीरिक बदल होत असतात. अलीकडे मोठ्या प्रमाणात माजलेल्या सिनेमा आणि मालिकांच्या बजबजपुरीतून नको ते संस्कार मुलांपर्यंत पोहचतात. हेच वय असतं भिन्न लिंगी प्रेमाची जाणीव होण्याचं एखाद्या नकळत क्षणी प्रेमात पडण्याचं. यावयात मुलांवर थोडं लक्ष ठेवलं कि मुलांचं आयुष्य एक निर्मळ प्रवाह होऊ शकतं.

कुणासाठी नाही आपल्या पिलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एवढ नक्की करा. त्यांना कमीतकमी दहावी पास होईपर्यंत साधा मोबाईल आणि बारावी पास होऊन आयुष्याच्या राजमार्गावर पदार्पण करण्यापूर्वी स्मार्ट फोन देऊ नका. कारण मोबाईल हि मुलांची गरज नसते. ते आपलं  कौतुक असतं. आपले लाड असतात. विश्वास ठेवा खरंच मी माझ्या मुलांना बारावी पास होऊन आयुष्याच्या राजमार्गावर पदार्पण करण्यापूर्वी दिलेले नाहीत. आणि त्याचे खुप चांगले परिणाम मी अनुभवतोय. अगदी उदाहरणच देतो. माझे मोठे चिरंजीव आज ताम्हणी घाटात मित्रांबरोबर पावसाळी भटकंतीसाठी गेले आहेत. पण त्याचा स्मार्ट फोन त्याने घरी ठेवलाय आणि एक गरज भासल्यास संपर्क साधाता यावा म्हणून एक साधा मोबाईल सोबत नेलाय. तुमच्या किंवा कोणत्याही मुलानं असंच केलं असतं असं तुम्ही छातीठोकपणे सांगू शकता ? मी स्वतः त्याच्या जागी असतो तर आज स्मार्ट फोनच सोबत नेला असता. कारण इतरांसमोर मिरवता आला असता. चांगले फोटो काढता आले असते. पण त्याला ते गरजेचं वाटत नाही. हि माझ्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. मागे एका ट्रीपच्यावेळी मी त्याला या विषयी विचारलं होतं  तेव्हा तो म्हणाला होता, " बाबा, खूप मुलांकडे डिजिटल कॅमेरे असतात. नंतर त्यांच्याकडून सगळे फोटो डाऊन लोड करून घेता येतात." हे सारं माझ्यासाठी खुप सुखाचं आहे. असं सुखं प्रत्येकाच्या नशिबी असावं असं  मला वाटतं. म्हणून हे सारं लिहित बसलोय.     

  

No comments:

Post a Comment