किती दिवस झाले तुझं पत्र नाही………फोन नाही………..अगदी साधा यस एम यस नाही.
रागावलीस ना माझ्यावर ? कशासाठी पण ? आजवर तुझ्या माझ्या ज्या नात्याला तू
‘ मैत्री ‘ म्हणत होतीस त्याच नात्याला मी ‘ प्रेम ‘ म्हणालो म्हणून ?
तसं
असेल तर मला कीवच करावीशी वाटते तुझी. कारण ना तुला ‘ मैत्री ‘ चा अर्थ
कळलाय आणि ना ‘ प्रेमा ‘ चा. अगदी तू म्हणतेस त्याप्रमाणे तू मैत्रीण असतीस
ना माझी तर मी ‘ तुझ्या माझ्या नात्याला ‘ प्रेमा ‘ चं नाव दिल्यावर तू
अशी रागावली नसतीस माझ्यावर.
प्रेम आणि मैत्रीत काय फरक आहे माहिती आहे तुला ? मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ शकतं बऱ्याचदा पण प्रेमातून मैत्रीचा सूर उमटेलच असं नाही सांगता येत काही. प्रेमातून बऱ्याचदा आकाराला येतो अधिकाराचा अंकुर. मैत्री असते निर्व्याज, निरपेक्ष. आता तू म्हणशील, ” मग श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री ?”
खरं सांगू ! असं नाही सांगता यायचं काही. पण एवढ नक्कीच सांगेन कि प्रेमाच्या पातळीपर्यंत जाऊन केलेली मैत्री नक्कीच श्रेष्ठ.
तू म्हणशील, ” म्हणजे कशी ? “
आभाळासारखी आणि मातीसारखी. क्षितिजाशी पाहिलं तर एकरूप झालेली. प्रत्यक्षात मात्र नेहमीच एक अंतर राखून असलेली. कुणाच्या भीतीनं नव्हे………..एक मर्यादा म्हणून.
आता तू म्हणशील, ” मग प्रेम कसं असतं ? “
प्रेम असतं असतं नदी आणि समुद्रासारखं………मिलनाची आस असलेलं.
मला माहिती आहे यावर तू काय म्हणणार आहेस ते. आता तू म्हणशील, ” बस्स s s s !!! एवढंच ! प्रेम म्हणजे मिलनच का फक्त ? “
नाही ! प्रेम म्हणजे मिलनच नाही काही. प्रेमाला आणखी एक पदर असतो. श्रद्धेचा !!!!
होय !!!! श्रद्धेचा. ईश्वरावर असावी तशी श्रद्धा.
म्हणूनच मला मीरा हीच खरी प्रेयसी वाटते कृष्णाची. प्रसंगी कृष्णासाठी विष प्राशन करणारी ………पण कृष्णाशी एकरूप होऊ पहाणारी. आपण मात्र म्हणतो, मीरेची भक्ती होती कृष्णावर. पण श्रद्धा आणि भक्तीतला फरक स्पष्ट करता येईल कुणाला ?
पण आजकाल प्रेमातल्या श्रद्धेच्या या जरतारी पदराची जाणीवच नसते कुणाला. सौन्दर्य……….त्याची ओढ………त्याचं आकर्षण…………त्याची आसक्ती………आजकालच्या प्रेमाची एवढीच झेप.
मला माहिती आहे तुला काय म्हणायचं ते, हेच ना," तू जर मीरेला प्रेयसी म्हणतोस कृष्णाची, तर मग राधा कोण होती कृष्णाची? "
मी राधेला मैत्रीण मानतो कृष्णाची………रासक्रीडे पासून शृंगारापर्यंत कृष्णाला सोबत करणारी , साथ

कळलाय तुला प्रेम आणि मैत्रीतला फरक ?
No comments:
Post a Comment