Saturday 12 July 2014

Indian Politics : काँग्रेस वयात कधी येणार ?

शहाणं होणं म्हणजे वयात येणं. वयात येणं म्हणजे शारिरीक, मानसिक आणि परिपक्वता येणं. मुलींचा संदर्भ देऊन सांगायचं झालं तर शहाणं होणं म्हणजे ऋतुप्राप्ती होणं. काँग्रेसनं या देशावर साठहून अधिक वर्ष राज्य केलं पण काँग्रेस अजुनही वयात आली नाही. खऱ्या अर्थानं शहाणी झाली नाही.


आपण लोकसभेच्या निवडणुका का हरलोत यावर काँग्रेसनं मंथन केलेलं दिसत नाही. किंवा मंथन केलं असेल तर काँग्रेसनं चुकीचे निष्कर्ष काढले असतील. कारण आपण लोकसभेच्या निवडणुकात का पराभूत झालोत याची काँग्रेसला योग्य कारणमिमांसा करता आली असती तर काँग्रेसनं त्यातून योग्य धडा घेतला असता आणि आपल्या चुका सुधारल्या असत्या. पण तसं झालेलं दिसत नाही.

आपल्या राजवटीत काँग्रेसनं केलेल्या चुका हे जसं काँग्रेसच्या पराभवाचं एक कारण ठरलं तसंच मोदींचा पक्ष बाजूला ठेऊन काँग्रेसनं मोदींवर केलेली टोकाची टिका हेही काँग्रेसच्या पराभवाचं आणखी एक कारण आहे. काँग्रेसच कशाला काँग्रेससह मोदींवर टिकेचा भडीमार करणाऱ्या सपा, बसपा, जेडीयु, आप या सगळ्यांनाच दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. यातुन बचावल्या त्या केवळ ममता ब्यानर्जी आणि जयललिता. अर्थात आपण मोदिलाटेतही तरून गेलोत म्हणून त्यांनीही मिशीला पीळ भरण्याचं काहीच कारण नाही. कारण काँग्रेस हा देशातला सत्ताधारी पक्ष होता आणि म्हणूनच भाजपाचा प्रमुख विरोधक होता. युपीत जरी काँग्रेस सत्तेत नसली तरी दिल्लीतल्या सत्तेचा राजमार्ग उत्तरप्रदेशातून जातो हे भाजपा पुरेपूर जाणून होती आणि म्हणूनच तिथं भाजपानं पुर्ण ताकद पणाला लावली आणि अदभूत पूर्व यशही मिळवलं. तशी ताकद पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूत लावण्याची भाजपाच्या कोअर कमिटीला गरज वाटली नाही आणि म्हणूनच सगळेच पक्ष धाय मोकलून रडत असताना ब्यानर्जी आणि जयललिता आनंदोस्त्व साजऱ्या करू शकल्या.
पण इतरांपेक्षा मला काँग्रेसवर अधिक भाष्य करणं गरजेचं वाटतं आहे. कारण आपसह इतरांनी कितीही डोकेफोड केली तरी काँग्रेस हाच या देशातला खरा आणि प्रमुख विरोधी पक्ष आहे.

आणि असं असतानाही काँग्रेस योग्य रितीनं आत्मपरीक्षण करत नाही. मोदींवरच्या ज्या टीकेत्मक भुमिकेमुळे काँग्रेसला सत्तेवरून पायउतार व्हावंलागलं ती भूमिका काँग्रेस आजही सोडायला तयार नाही. म्हणूनच मोदींच मंत्रिमंडळ जाहीर होताच स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेवरून टीकेचा सूर लावणाऱ्या काँग्रेसला आपणही अनेक अशिक्षित मंत्री दिले आहेत याचा विसर पडला. केंद्रात भाजपाला सत्तेवर येऊन केवळ महिनाही झालेला नसताना दिल्लीत वीज पुरवठ्यात जो विस्कळीतपणा आला त्यासाठी भाजपावर टीकेची झोड उठवली, दिल्लीत निदर्शनं केली. पण पंधरा वर्षाच्या सत्तेत हे सारं आपणच पेरून ठेवलंय याचा काँग्रेसला विसर पडला असेल तरी मतदारांना कसा विसर पडेल ?

मोदींनी रेल्वे बजेट सदर केलं. काँग्रेसनं टिका केली. आजच मला फेसबुकवर काँग्रेसच्या ( युपीएच्या ) काळात सादर करण्यात आलेल्या दोन आणि आज बीजेपीच्या काळात सादर करण्यात एका रेल्वे विस्ताराचा तुलनात्मक विस्तार दर्शविणारा नकाशा पहायला मिळाला. त्यातून एक गोष्ट कुणाच्याही लक्षात येईल कि भाजपा या देशाचा विचार करते आहे.

परवा भाजपानं सर्वसाधारण बजेट सदर केलं आणि तमाम अर्थतज्ञ या बजेटची प्रशंसा करत असताना, सर्वसामान्य जनता समाधानाचा श्वास घेत असताना एकही विरोधी नेता बजेटचं समर्थन करत नव्हता. कारण काय तर ते आता विरोधी बाकावर बसलेत आहेत म्हणून.

पण दुसऱ्यावर चिखलफेक करून स्वतःच्या प्रतिमेचं, प्रतिष्ठेच उदात्तीकरण करता येत नाही. केवळ विरोधाला विरोध असं वागून चालणार नाही. गरज तिथे भाजपाला विरोध केलाच पाहिजे पण त्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे ते भाजपानं कुठे माती खाल्ली तर ते जगजाहीर करणं. त्यापासून भाजपाला थोपवणं. आणि गेली दहा वर्ष काँग्रेस सत्तेत असताना भाजपानं तेच केलं. काँग्रेसला निव्वळ विरोध न करता काँग्रेसनं कुठे, कशी आणि किती माती खाल्ली हे जनतेला दाखवून दिलं. पण कॉंग्रेसला हे शहानपण सुचत नाही. आपण असा विरोध केल्याशिवाय येत्या काही महिन्यात विविध राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला सत्ता मिळणार नाही असं काँग्रेसला वाटत असेल तर असा केवळ विरोधाला विरोध करून कॉंग्रेसला काहीच मिळणार नाही हे निश्चित. लोकसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतरही काँग्रेसला कुठलच शहाणपण सुचत नाही. पण विविध राज्यात येऊ घातलेल्या येत्या विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवानंतरतरी काँग्रेसला शहाणपण सुचायला हवं त्यांनी हे टोकाच्या विरोधाचं राजकारण सोडायला हवं. कारण काँग्रेस हाच खरा राष्ट्रीय पातळीवरचा एकमेव विरोधी पक्ष आहे. आणि तो विचारी आणि सुदृढ असणं हि आपल्या लोकशाहीची गरज आहे.

2 comments:

  1. Conress kadhich shani honar nahi.

    ReplyDelete
  2. पण काँग्रेस शहाणी न होण्यात जनतेचं हित निश्चित नाही. कारण सत्ताधारी पक्ष चांगला असला तरी अंकुश ठेवण्यासाठी मजबूत विरोधी पक्षाची गरज असतेच.

    ReplyDelete