Saturday 26 July 2014

Dancing Jockers : बहुरूपी नाचे

Dancing jocker
Dancing jocker
मला स्वतःला नाचता येत नाही. त्यामुळे मनात आणलं तरी माझी बायको मला नाचवू शकत नाही. पण आजकाल नाचणं आणि नाचवणं सार्वजनिक झालंय.  बायको नवऱ्याला नाचवते, नवरा बायकोला खेळवतो, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसला नाचवू पहाते तर शिवसेना भाजपला ठुमकायला लावू इच्छिते. 
वरातीत आणि मिरवणुकात नाचणं आता प्रतिष्ठेच मानलं जातं. तर अशा ठिकाणी चारचौघात नाचता आलं  नाही तर फारच खजील व्हायला होतं.  

पण परवा एका लग्नात मी दोन बहुरूप्यांना नाचताना पाहिलं आणि त्यांच्या नाचावर मी जाम खूष झालो तो व्हिडीओ खाली लोड केला आहेच. पण तरीही नाच या प्रकाराविषयी मला थोडसं अधिक लिहिणं गरजेचं वाटतं आहे. 


नाचता येण्यासाठी अंगी कोणता गुण असावा लागतो याची अनेकांकडून अनेक उत्तरं येतील. कुणी म्हणेल अंगी लवचिकपणा असावा लागतो. अंगी चापल्य असावा लागतं. कुणी म्हणालेल कठोर परिश्रमाची गरज असते.  पण याचं माझ्या  शब्दात उत्तर द्यायचं म्हटलं तर मी ' अंगी ताल असावा लागतो. 'किंवा त्याच्या ' अंगी लय असावी लागते. '  असंच म्हणेन. ज्याच्या अंगी ताल अथवा लय असते तो कलावंत असतो. त्यामुळेच त्याला नृत्य शिकण्याची गरज भासत नाही. बाळू जाधव नावाचा माझा एक मित्र मला आठवतोय. तीस पस्तीस वर्षापूर्वी मी त्याचा एवढा सुरेख डान्स पहिला आहे कि आजच्या सारखी रियालिटी शोची लगबग त्या काळी असती तर त्यांनं हमखास नंबर पटकावला असता. त्यामुळेच आज एखादयाचं मिरवणुकीतलं, रस्त्यावरचं नृत्य पाहिलं मी त्याची मुळीच निंदा करत नाही. कारण ज्याच्या अंगी ताल असतो, ज्याच्या अंगी लय असते तो कलावंत असतो. मग तो कलावंत कोणी असो अशा प्रकारचा बहुरुप्याचा वेष परिधान करून नाचणारा नाच्या असो, चित्रकार असो, शिल्पकार असो, कवी असो अथवा अन्य कुणी.  कारण कारण ज्याला संगीताचा ताल कळतो त्याला नाचता येता, ज्याला रंगांची लय सापडते त्याला चित्रं रेखाटता येतात, ज्याला पाषाणाचा ताल कळतो त्याच्या हातून शिल्प आकार घेतं. आणि सामान्य माणसाला न दिसणारा शब्दांमधला ठेका ज्याला जाणवतो त्याच्या लेखणीतून काव्य जन्माला येतं.    

या व्हिडीओ मधल्या बहुरुप्यांच नृत्य भलेही खूप प्रेक्षणीय नसेल. पण माझ्या अंगात नव्हता तो ताल त्यांच्या अंगात होता. त्यामुळेच अशा कलावंताचा मान राखला जावा एवढीच त्याची माफक अपेक्षा असते. पण परवाच्या लग्नात मी ज्या बहुरूप्यांना नाचताना पाहिलं त्यांचे पोषाख अत्यंत विटलेले होते. त्यांच्या ठेकेदाराकडून त्यांना अत्यंत हीन स्वरुपाची वागणूक मिळत होती. पण त्या ठेकेदाराला हे कळत नव्हतं कि हजार नव्हे दहा हजार दिले तरी मी यांच्यासारखं नाचू शकणार नाही. तळागाळातल्या अशा तमाम कलावंतांना हा लेख अर्पण.   

 

2 comments:

  1. Prakash Bhende27 July 2014 at 04:57

    video dhik aahe aahe. pan videopeksha tumcha lekhan khupach bhari aahe.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रकाशजी प्रतिक्रियेबद्दल. माझे शब्द आणि माझ्या भावना हेच माझं मर्म आहे. इतर गोष्टी शेफनं एखादी खमंग डिश करावी पण तरीही तिला सजवून पेश करावी तशा सजावटी असतात. पण तुम्हासारख्या रसिक वाचकांच्या प्रतिक्रिया हिच आमच्या लिखाणाची प्रेरणा. इतरही लिखाण नक्की चालून पहावं.

      Delete