Thursday 17 July 2014

In love with her : तुम्ही ‘ तिला ‘ रब मानता ?

ती खरंच आपल्या स्वप्नांचं आभाळ असते. तिच्यासाठीच घेत असतो आपण प्रत्येक श्वास………ती जगण्याच्या प्रत्येक क्षणाची आस……….आपल्याला हवी असते तिची आपल्या भोवतालची दरवळ………तिचा सहवास. तिच्या सहवासात आपण अनुभवतो प्रत्येक क्षणाला उमलत जाणारं आपलं आयुष्य. ती म्हणजेच आनंदाचा प्रत्येक क्षण…..ती आयुष्यातला हर्ष.


परवा शाहरुखचा ‘ रब ने बना दि जोडी ‘ हा चित्रपट पहिला. म्हणजे या आधी पहिला नव्हता असं नव्हे. पण आज त्याविषयी लिहावसं वाटलं. अर्थात हे काही त्या चित्रपटाचं समीक्षण नाही. तो चित्रपट पहाताना माझ्या मनात……. ‘ तिच्या ‘ विषयी जे काही विचार उमटले त्या साऱ्यांच प्रतिबिंब म्हणजे हे लेखन.

खरंच ‘ राधा – कृष्ण ‘ या महाभारतातल्या प्रेमी युगलाचं अखंड नामस्मरण होत असताना आपली प्रेमाकडे पहाण्याची भूमिका निष्पाप आहे ? कृष्णानं जसं राधेवर निख्खळ प्रेम केलं आणि राधेनही ज्या सहजतेनं कृष्णाला व्यापून टाकलं. तेवढी सहजता आहे आजच्या प्रेमात ?

‘ रब ने बना दि जोडी ‘मध्ये ती त्याला रब मानते. पण ते फार उशिरा. हे बदललेल्या सांस्कृतिक परिमाणांचं मूल्य तर नाही ? पण त्याच्या खूप आधी शाहरुखच्या मुखी ‘ तुझ मे रब दिखता है, हाय मै क्या करू ? ‘ हे गाणं आहे.

आणि मी चमकलोच. अरे खरंच आपणही कुणालातरी असंच परमेश्वर मानतो. तिच्यावर आपली प्रचंड श्रद्धा आहे. तिचा सहवास लाभला नाही तर आपलं आयुष्य सुरळीत चालणार नाही असं  वाटतं आपल्याला. आपण तिच्यावर रागवलो तर त्याचे परिणाम आपल्याला सोसायला लागतील अशी आपली धारणा असते.  तिनं सोबत दिली तर आयुष्य चोहोबाजूंनी फुलत राहील………नाहीतर आयुष्याचा पाचोळा होईल……….      .तिच्या सहवासात आयुष्य खळाळणारा ओढा होऊन वहात राहील………….नाहीतर आयुष्य एखाद्या
डबक्यासारखं साचून राहील. असं खूप काही वाटत असतं आपल्याला तिच्या विषयी. मग आपण धडपडत राहतो तिची सोबत मिळवण्यासाठी.

स्त्रीनं तिच्या नवऱ्याला परमेश्वर मानावं असं आपली परंपरा सांगते. पण पुरुषानही स्त्रीला परमेश्वर मनावं असं आपले संस्कार आपल्याला सांगत नाहीत. पण खरंच मित्रांनो तिला असं परमेश्वराच्या ठिकाणी मानून पहा. तुम्ही आयुष्यातलं सर्वात मोठं सुख मिळवलेलं असेल.

कधी कधी तिचा सहवास नसतो…..स्पर्श नसतो………नुसतीच असते तिची सोबत. तेव्हा तुमचं झालेलं मोरपीस तुम्ही कधी अनुभवलंय. मन कसं अगदी भरून आलेलं असतं….श्वास घेतानाही खूप खूप मोकळं मोकळं वाटत. आपण हवेत अधांतरी चालतो आहोत असं वाटत रहातं………. असं का होतं याचा विचार केलात कधी !!!!!

कारण एकच आपला परमेश्वर आपल्या सोबत आहे याची याची आपल्याला जाणीव झालेली असते.

आणि ती परमेश्वरासारखी आपल्या पाठीशी नाही हि जाणीव सरते तेव्हा…………तेव्हा आपली जगण्याची उमेदही सरते.

No comments:

Post a Comment