Tuesday, 7 April 2020

फेसबुकवरच्या मैत्रिणी

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरीखरंतर या विषयावर लिहावं कि लिहू नये अशा फार मोठ्या संभ्रमात मी होतो. कोणाचे माझ्याविषयी काय समज होतील आणि काय नाही देव जाणे. देव कशाला मलाच काही वेळात कळतील माझ्या लिखाणाचे परिणाम. माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये ज्या थोड्या बहुत मैत्रिणी आहेत. त्या मला
कदाचित लगेच डस्टबिनमध्ये टाकतील. टाकू दे टाकलं तर. पण वास्तव मांडायलाच हवं ना.

कसलं वास्तव म्हणताय ? अहो, आपण कितीही स्त्री पुरुष समानतेचा डंका पिटत असलो तरी स्त्री - पुरुष या दोन वेगळ्या प्रवृत्ती आहेत. आणि भिन्न लिंगी असल्यामुळेच त्यांना परस्परांविषयी आकर्षण आहे. हे आपण का नाकारतो ? फेसबुकवर कोणी कोणाचा हात धरू शकत नाही आणि कोणी कोणाच्या तोंडातही मारू शकत नाही. फार फार तर फ्रेंडलिस्ट मधून डिलीट केला जातं. या संधीचा अनेकजण अनेक प्रकारे फायदा घेतात.

स्त्रियांच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक आणि कॉमेंट मिळालेल्या तुम्हाला दिसतील. बऱ्याचदा त्या पोस्टमध्ये एखादं दुसरं वाक्य , इकडून तिकडून उचललेले कोट्स, आणि सेल्फी याशिवाय आणखी काही नसतं. तरी त्यावर कॉमेंट आणि लाईकचं पाऊस पडतो.

काही दिवसापुर्वी एका फेसबुक मैत्रिणीनं तिचा फोटो अपलोड केला. त्या फोटोला तासाभरात दोन हजारहून जास्त लाईक आणि पाचशेहून जास्त कॉमेंट. फोटो सुंदरच होता. पण इतक्या कॉमेंट मिळाव्यात असं फार काही नव्हतं त्यात. कदाचित स्त्रियांच्या कॉमेंट जास्त असतील असं समजून मी अक्षरशा त्या सगळ्या कॉमेंट चेक केल्या. मित्रहो खरंच सांगतोय त्या सगळ्या कॉमेंट मध्ये स्त्रियांच्या कॉमेंट हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याही नव्हत्या. ( कृपया पुरावा मागू नका. )

मीच नव्हे माझे अनेक मित्र फेसबुकवर अत्यंत उत्तम लिखाण करतात. पण लाईक आणि कॉमेंटची तशी वानवाच असते. माझी नको असला बाप हि कविता कोणीतरी माझे बाबा या पेजवर पोस्ट केली. पन्नास हजारहून अधिक लाईक असलेले हे पेज. तिथे माझ्या कवितेला १५०० लाईक आणि १०० एक कॉमेंट होत्या. त्या कॉमेंट आणि लाईक पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात अक्षरशा पाणी आलं होतं. आणि आपण जे लिहिलं ते सार्थकी लागलं अशी भावना मनात निर्माण झाली होती. हे मी मला लाईक अथवा कॉमेंट मिळाव्यात म्हणून लिहित नाही. मी जेव्हा एखादी अत्यंत सुंदर कविता लिहून पूर्ण करतो तेव्हा मला होणारा आनंद आणखी कशानही मिळणार नाही. पण तरीही वाचकांकडून एक साधी अपेक्षा असते. त्यातून पुढच्या लिखाणासाठी बळ मिळणार असत.

फेसबुकवरील मैत्रिणीचा आणखी एक किस्सा ? नाव आठवत नाही. (अथवा जाणीवपूर्वक सांगत नाही असं समजा. तिला मैत्रीण म्हणायचं तेही एवढ्यासाठी कि आमच्या परस्परातील जोडणीला फेसबुकनं ते नाव दिलंय. ) तर तिनं एक दिवस एक कविता पोस्ट केली. तासाभरात त्या कवितेला शे दोनशे लाईक , पाच पन्नास कॉमेंट. ( ते लाईक आणि कॉमेंट मला प्रेयसीला खुश करण्यासाठी गुडघ्यावर उभ्या राहिलेल्या प्रियकराच्या हातातल्या पुष्पगुच्छासारखे वाटले. )

तिची कविता तशी सोसोच होती. तिचेच कशाला बऱ्याच महिलांचे ( पुरुष सुद्धा अपवाद नाहीत. परंतु पुरुषांना चांगले असो वा सुमार तशाही लाईक कॉमेंट कमीच असतात. ) लेखन सुमार असते. अर्थात असे असले तरी सेल्फीची जोड दिली कि लाइक कॉमेंटचा पाऊस पडतोच. माझ्या चहाच्या कपासोबत असलेल्या फोटोला सुद्धा असेच ढिगाने लाईक मिळाले होते तेव्हा मी लिहिले _

शब्दात जिंदगीची वाहून नाव गेली
तसबीर मात्र माझी खाऊन भाव गेली.

परंतु महिलांना मात्र फार चांगल्या लेखनाची गरज भासत नाही. लेखन कशाला बऱ्याचदा तर 'नाम हि काफी होता है.'

No comments:

Post a comment