Saturday 25 April 2020

रेडिओ आणि म्युझिक ॲप

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी
२२ मार्चपासून लॉक डाऊन सुरु आहे. कोण काय करतं मला माहित नाही. परंतु मी मात्र माझ्या आयुष्याला मस्तच वळण लावून घेतलं आहे. रेडिओ ऐकायचं विसरुं गेलो होतो. परंतु आता रेडिओ ऐकण्याची सवय लागली आहे. आणि ती सवय यापुढे
मोडेल अशी सुतराम शक्यता नाही. ॲप स्टोअरवर अनेक म्युझिक ॲप उपलब्ध आहेत. एकदिवस एक म्युझिक ॲप दौलोड करून घेतलं. दोन चार तास त्यावरून गाणी ऐकल्यानंतर लक्षात आलं कि रेडिओ ऐकण्यात जी मजा आहे ती मजा ॲप वरून गाणी ऐकण्यात मुळीच नाही. किशोरकुमार सिलेक्ट केले कि त्याचीच गाणी, अगदी ठरल्यानुसार, एकामागून एक. राजेश खन्नाची गाणी म्हटलं कि तीच
गाणी. एक दोन दिवसात ॲपवर गाणी ऐकण्याचा कंटाळा आला. आणि मी ते ॲप डिलीट करून टाकलं.

रेडिओ ऐकताना टीव्हीवरील बातम्या पाहण्यापेक्षा रेडिओवरील बातम्या ऐकणे खूप सुखावह आहे हेही लक्षात आहे. बातम्या, अनेक कलावंतांच्या मुलाखती, शास्त्रीय संगीत, दोन गाण्यांमधलं निवेदन, अनेक सिनेकिस्से अशा कितीतरी गोष्टी रेडिओ ऐकताना पदरात पडतात. गाणे कोणत्या सिनेमातील, कोणी गायलं, कोणी लिहिलं, संगीत कोणाचं, त्या गाण्याचा काही खास किस्सा असेल तर तो अशा कितीतरी गोष्टी आपल्या कानावर पडतात. ॲपवरून गाणी ऐकताना तसे काहीच नाही. नुसतीच गाण्यामागून गाणी. 

मला वाचन करताना रेडिओ चालत नाही. लिहायला बसतो तेव्हा रेडिओ सुरु असला तरी चालतो. कारण कान तिकडे असले तरी मन लेखनात गुंतलेलं असतं. लिहिताना माझी अवस्था 'घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी' अशीच असते. परंतु लिहीत असताना लाईव्ह आवाज ( प्रामुख्याने बायकोचा ) अजिबात चालत नाही. 

आता वर्तमानपत्र येत नाही. त्यामुळे काम नाही म्हणून त्यात बुडून जाण्याची सवय पूर्णपणे मोडली. तो दोन तासाचा वेळ मी वाचनात घालवतो. अर्थात फेसबुक, व्हॅट्सऍपवरील वाचन नाही हा. चांगले कथासंग्रह, कादंबऱ्या, काव्यसंग्रह यांचे वाचन. बरे ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चिंतन, मनन आणि लेखन. अर्थात सात तास सारखेच लिहिता असता का? असे नका विचारू. यातील चिंतन, मनन करण्याची प्रक्रिया फार मोठी असते. सातला फ्रेश व्हायचे. चहा घ्यायचा. साडेसात ते आठ सव्वा आठ थोडे पाय मोकळे करायला खाली उतरायचे. घरापासून १०० मीटरच्या आत बरं का. मग तिथून पुढचा वेळ जेवण, टिव्ही यासाठी. 

या सगळ्यात फेसबुक आणि व्हाट्सअप हे गरजेपुरते नक्की वापरतो. एखादी पोस्ट करतो. चार चांगल्या पोस्ट असतील तर कॉमेंट करतो. आणि दिवस कसा सरतो हे लक्षात सुद्धा येत नाही. मित्रांनो वाचन आणि रेडिओ ऐकण्यात जे सुख आहे ते आणखी कशातही नाही. माझ्या घरातला टिव्ही रात्री आठच्या आत सुरूच होत नाही. आमचे सोडा तरुण पिढीने आयुष्याला अशी शिस्त लावून घेणे नक्कीच गरजेचे आहे. व्हॅट्सऍपफेसबुक वेळेचा अपव्यय करायला मदत करेल पण ते माणसाचे आयुष्य समृद्ध नाही करू शकत. 

4 comments:

  1. अतिशय सुंदर बर का

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

      Delete
  2. Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद विशाल जी.

      Delete