डायरेक्ट स्वर्गाचा पास मिळणार आहे अशा अविर्भावात मंडळी टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करत आहेत.
यात शिक्षित मागे नाहीत. डॉक्टर्स मागे नाही, श्रीमंत मागे नाहीत आणि आणि गरीब सुद्धा मागे नाहीत. गरीब मागे नाहीत म्हणण्यापेक्षा ते फारच आघाडीवर आहेत असेच दिसते. हे गरीब अनेकदा मजुरी करणारे असतात. पत्र्याच्या खोलीत रहात असतात. शासन दरबारी यांची नोंद गरीब अशीच असेल. हे सर्व शासकीय योजनांचा फायदा घेत असतील. यांच्याकडे रेशन कार्ड असेल आणि महिन्याच्या महिन्याला हे त्यावरील धान्य घेत असतील. पण अशा गरीबाच्या घरात प्रत्येकाकडे सात आठ हजाराचा अँड्रॉइड फोन असतो. प्रत्येकजण महिन्याकाठी दोन तीनशेचं रिचार्ज मारतो. त्यांना बाकीची समज कमी असली तरी वेगवेगळे ॲप वापरून व्हिडीओ तयार करण्याचे आणि ते अशा व्यासपीठांवर अपलोड करण्याचे ज्ञान मोठे असते.
मुळात फुकटात संधी मिळणार असेल तर कंबरेचं सोडून हवं तिथे नाचायला उभं राहील अशा मानसिकतेची मंडळी आमच्या देशात फार आहेत. आता कोणी म्हणेल, "तुम्ही का पहाता असे व्हिडीओ?" तर त्यावर मी, "त्यात काही समाज हिताचे काही आढळते का?" हे बघण्यासाठी पाहतो एवढेच सांगेन.
१) बायकोच्या हातात फोन असतो. ती तिच्या आईसोबत बोलत असते. तिची आई विचारते, "जावई बापू काय करतात?" त्यावर ती बायको म्हणते, "आहेत कि."
त्यावर तिची आई म्हणते, "दे बरं त्यांना." आणि मग ती बायको नवऱ्याच्या कानाखाली मारते. मान्य ती खोटी असते. पण काय साधतो यातून आपण?
२) दोन मुली घराच्या समोर उभ्या राहून ताट वाजवताहेत. त्यांच्या सोबत त्यांचा भाऊ. मागे वडील सुद्धा उभे आहेत. घर सुशिक्षित, संपन्न दिसते. संध्याकाळी या मुली ताट वाजवतात..... आणि नंतर, "चीनच्या आईची XX." असं म्हणतात. अगदी सहज. मागे त्यांच्या जन्मदात्याच्या चेहऱ्यावर धन्य धन्य झाल्याचे भाव.
३) एक बाई पन्नास पंचावन्नच्या. आणि त्या अत्यंत अश्लील भाषेत चीनचा अत्यंत उद्धार करत आहेत. ते शब्द इतके अश्लील एखादा नवरा बायकोच्या मिठीत असताना त्या शब्दांचा उच्चार करताना आपल्या बायकोला ते सोसतील कि याचा विचार करतो. आणि हि बाई आपण फार मोठा तिर मारल्याच्या अविर्भात ते शब्द उच्चारते. त्याचा व्हिडीओ करते.
४) एक मुलगी तिच्या प्रियकराला सांगते, "अरे, माझ्या घरी कोणीही नाही. तू लगेच ये. आणि येताना सुरक्षेची साधने ( तिला निरोध म्हणायचे असते ) घेऊन ये. तो म्हणतो, "का तुझ्याकडे सुरक्षेचं काहीही नाही का? ठीक आहे मी सॅनिटायझर, मास्क घेऊन लगेच येतो." त्यावर ती म्हणते, "तुझ्याच्याने काहीही होणार नाही. तू येऊच नको." समझदार को इशारा काफी है.
५) बायको नवर्याच्या समोर भांडी आणून ठेवते. आणि म्हणते, "हि भांडी घासून टाका बरं लगेच," नवरा भांडी घासायला तयार होत नाही. तेव्हा ती म्हणते, "बघा हा नाही तर मी पालिकेच्या माणसांना सांगते यांना खोकला येतो म्हणून. मग बसा १४ दिवस अडकून." मग नवरा भांडी घासायला तयार होतो.
६) सोशल डिस्टन्सिंग चा संदर्भ घेत सहा फुटी वाढण्या घेऊन जेव वाढण्याचे व्हिडीओ.
७) "काही करा बुवा. पण दारूचे बार तेवढे चालू करा." अशी दीनवाण्याने चेहऱ्याने मुख्यमंत्र्यांना विनंती करणारा कांबळे नावाचा गृहस्थ.
अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. वृद्धांचे डान्स, बायकांनी कंबरा हलवत केलेले डान्स, मुलींचे अत्यंत भडक हावभाव आणि नको तसे संवाद वापरून केलेले व्हिडीओ.
या सगळ्या व्हिडिओंचे रेकॉर्डिंग त्यांच्या लेकीबाळींनी, सुनांनी, नातवांनी, जवळच्या मित्रांनी केलेले असते. त्यांना कोणता संस्कार दिला जातो असे करताना. बरं एक व्हिडिओ केला कि त्याच प्रकारचे तीन चार व्हिडिओ येतात. हि सगळी मंडळी कॉपी करूनच पास झालेली असतील याचा अंदाज असे एकसारखे व्हिडीओ पाहून येतो. अनेकदा अशा व्हिडिओमध्ये लहान मुलांचा सुद्धा वापर केलेला असतो. काय साधतात हि मंडळी अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करून आणि ते व्हिडीओ समाज माध्यमांवर अपलोड करून.
त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ते व्हिडिओ तिथून डाउनलोड करून आणि एकमेकांना फॉरवर्ड करून आम्ही काय साधतो? पुढच्या पिढीला कोणता संस्कार देतो आम्ही?
माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण काहीतरी आगळेवेगळे व्हिडीओ एकमेकांना शेअर करायला काहीही हरकत नाहीत. पण हे असले सुमार दर्जाचे व्हिडीओ एकमेकांना पाठवून कोणतं समाजकार्य करतो आम्ही?
माझ्याकडे हे ॲप नाही. मी ते कधीही डाऊनलोड करणार नाही आणि त्यावर कधी काही अपलोड सुद्धा करणार नाही नाही. ते राहू द्या मी माझ्याकडे आलेले कोणतेही व्हिडीओ कधीही फॉरवर्ड करत नाही. कारण असे करून मी माझी आणि माझ्या देशाची कार्यशक्ती वाया घालवू इच्छित नाही. टिकटॉक विषयी डोळे पांढरे व्हावेत असे आणखी काही वास्तव मी मांडणार आहे. पण ते पुढच्या पोस्टमध्ये.
No comments:
Post a Comment