Thursday, 23 April 2020

संस्कारांची घडी विस्कटते आहे

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी
कायदा आणि सुव्यवस्था राखणे हि पोलिसांची जबाबदारी. परंतु इतर माणसांप्रमाणे त्यांनाही प्रसिद्धीची हौस आहेच. पोलिसांना प्रसिद्धीची संधी कधी मिळत नाही. कोरोना आला आणि त्यांच्यासाठी प्रसिद्धीची संधी चालून आली. मग त्यांनी गाणी म्हणत प्रबोधन करण्याचे प्रयत्न केले. त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर लोड केले. मग
काम नसलेली मंडळी ती एकमेकांना फॉरवर्ड करत बसली. मग एक व्हिडीओ आला, दुसरा व्हिडीओ आला आणि अशा रितीने पोलिसांचे व्हिडीओ येण्याची मालिकाच सुरु झाली. . 

गाणी म्हणणारे पोलीस, आपापल्या भागातील नागरिकांना आव्हान करणारे पोलीस, विहिरीतून पोहून वर येणाऱ्या तरुणांना मारहाण करणारे पोलीस. दुचाकी स्वारांना मारहाण करणारे पोलीस, लॉक डाऊनच्या काळात बाहेर आलेल्याला तरुणांना गाणांच्या चालीवर नाचायला लावणारे पोलीस, मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना उठाबशा करायला लावणारे पोलीस, एक ना अनेक प्रकारचे. पोलिसांनी नियम मोडणाऱ्या नागरिकांना मारहाण केली हे योग्यच केले. परंतुत्याचे व्हिडीओ बनवून समाजमाध्यमांवर पोस्ट करण्याचे अधिकार पोलिसांना कोणी दिले. 

आमच्या मंत्र्यांना बुद्धी कमीच असते. परंतु कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना हे चुकीचे आहे असे का नाही वाटले? तंबाखूची पुदी आणण्यासाठी बाहेर पडलेला आणि पोलिसांच्या कचाट्यात सापडलेला तरुण आमच्या समाजाला हिरो वाटतो. आणि आम्ही त्यांचे व्हिडीओ फॉरवर्ड करत बसतो. कशासाठी हे?

समाजाला दिशा देण्याचे पत्रकारितेचे. परंतु असल्या सुमार घटनांच्या बातम्या देऊन न्यूज चॅनल काय साधतात? अशा रितीने व्हिडीओ फॉरवर्ड केल्याने आणि त्याविषयीच्या बातम्या दिल्याने समाजात दहशत पसरणे सोपे झाले आणि त्यामुळे नागरिकांचे रस्त्यावर येणे कमी झाले असा युक्तिवाद कोणी मांडेल. परंतु आमच्या लॉक डाऊनचे कसे तीन तेरा वाजले आहेत. आणि एवढे सगळे होऊनही नागरिक कशा रितीने रस्त्यावर येतात हे आपण गेली महिनाभर पाहतो आहोत.  

आणखी एक गोष्ट, अनेकदा एखाद्या जमावाकडून पोलिसांना मारहाण होते? त्या घटनेची बातमी कशी होऊ शकते? अशा रितीने संघटित होऊन पोलिसांना मारहाण करता येते म्हटल्यावर पोलिसांचा वकूब कसा राहील? अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्याही समाज विघातक गोष्टींना प्रसिद्धी देण्याचे काहीही कारण नाही. परवाची बातमी आहे. कुठल्या तरी वधू-वरांनी, दोघा जणांच्या साक्षीने लग्न केले? लगेच ते दोघे मोटारसायकल वरून जातानाचा फोटो टिव्हीवर झळकला. यात बातमी करावे असे काय आहे? ठरलेले विवाह पुढे ढकलणारे सुद्धा अनेकजण असतील. त्यांचे काय? मुळात बातमी कशाची करावी आणि कशाची टाळावी याचे धडे चुकीचे दिले जातात का तेच तपासायला हवे?  

परंतु पत्रकारितेचे धडे चुकीचे असतील असे मला नाही वाटत. पत्रकारिता हा व्यवसाय झाला आहे. आणि पत्रकार त्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत. पोटार्थी माणसाला मनाविरुद्ध काम करावे लागतेच. आणि आपण करतो आहोत तेच बरोबर कसे याचे समर्थन सुद्धा करावे लागते. परंतु यामुळे आमच्या सामाजिक संस्कारांची घडी विस्कटते एवढे मात्र खरे. 

2 comments:

  1. Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

      Delete