Tuesday, 29 April 2014

Love Poem : येते ओठावर गाणे


ती आयुष्यात येते तेव्हा त्याला किती बोलू आणि किती नको असं होतं. त्याचं आयुष्य एखाद्या खळाळत्या ओढ्यासारखं वाहत. पण ती आयुष्यातून दूर जाते तेव्हा …………


तेव्हा त्याचं सारं आयुष्यच अचेतन होतं. ओठांमधले शब्द ओठातच मिटून जातात. ती आयुष्यातून दूर जाते तेव्हा साऱ्या स्वप्नांचीच राख होते. पण तरीही तिच्या प्रेमावर त्याची एक अढळ निष्ठा असते. तिच्याविषयी एक आत्मविश्वास असतो. आणि म्हणूनच मनात एक आशावाद असतो कि विरहाचं हे मळभ दूर होईल. ती पुन्हा आवेगानं धावून येईल आणि त्याला तिच्या प्रेमाच्या कुशीत घेईल. या आशावादाच्या आधारावरच तो आयुष्य जगत रहातो. दुख पापण्यांच्या आड लोटून देतो. दुखाचे सारे कडू घोट पीत राहतो.


ती समोर नसते तरीही तो तिच्याशी अखंड बोलत राहतो. तो म्हणतो, “ आता तुला माझ्या चेहऱ्यावर जे हसू दिसतंय ते काही खरं हसू नव्हे. ते  हसू खूप उसनं आहे. ओदून ताणून आणलेलं. खरं तर माझं मन आतल्या आत आक्रोशतय. तू जर सोबत केलीस, तू जर तुझा हात माझ्या हाती दिलास तरच  माझ्या मनात पुन्हा आनंदाचा मोर नाचेल. इतर कशानही माझ्या मनमोराचा पिसारा फुलणार नाही.”

“ तू माझ्याशी असा अबोला धरला आहेस. विरहाचं खूप दान माझ्या झोळीत टाकलं आहे. पण तरीही मी परमेश्वराजवळ तुझ्या सुखाचीच  याचना करतो आहे. तू मला असं दुखाच्या दरीत लोटलेलं असतानाही मला मात्र परमेश्वराजवळ तुझ्या सुखाची याचना करण्याचं बळ दिलं ते आपल्या  आयुष्यातल्या गोड आठवांनी.”

“ तुझ्या प्रेमाला पारखं झाल्यानंतर माझं मन उन्मळून पडलं. तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या मनात जी पालवी फुटली होती ती सारी झडून गेली. पण असं असलं तरीही अजूनही माझं मन आशावादान कोणीतरी मुळापासून हलवत आहे. आणि या अशा दुखाच्या क्षणीही असं कशामुळ होतं आहे याचा शोध मी घेवू लागतो तेव्हा लक्षात येत, तुझ्या गोड आठवणी, तुझ्या श्वासांची स्पंदने अजूनही माझ्या भोवती रुंजी  घालताहेत. त्यामुळेच माझ्या मनात अजूनही नकळत हसू फुलतं आणि माझ्याही नकळत माझ्या ओठांवर गाणं येत."


No comments:

Post a Comment