Wednesday, 9 April 2014

Love Poem : तुझे नाव माझ्या मनी

दोन ध्रुव विषुवृत्तावर आणून ठेवल्यासारख त्याचं आयुष्य. एकरूप, एकजीव. त्याला तिच्या चेहऱ्यावरच इवलसं हसू हवसं असतं. आणि तिला त्याची  साताजन्माच्या ओढीची मिठी.

पण कधीतरी अशी वेळ येते. तिला नको असतानाही त्याच्यापासून दूर घेवून जाते. माहेराच्या कुशीत. काही दिवस तिला बरंही वाटतं. डोंगरापल्याडचं तिचं गाव. त्या गावातली गर्द  हिरवाई. आईची कुस, मायेचा गोतावळा. आणि सोबतीला त्याच्या आठवणी.

पण काही दिवसातच या आठवणींचा तिला उबग येतो. त्याचीच साथ……… त्याचीच सोबत ………. त्याचाच सहवास हवा वाटतो. अवती भवती सगळीकडे.


याक्षणी तिला सोबत असते त्याच्या आठवणींची. पण  आठवणींच्या त्या ओझ्याखाली दबून जाते तेव्हा म्हणते -
" मी म्हणजे एक फुल आहे आणि तुझ्या आठवणी म्हणजे त्या फुलाच्या पाकळ्या. मऊ, मुलायम, हळुवार. पण आता या आठ्वणींच मला फार ओझं वाटू लागलं आहे. तुझ्या आठवणींचा स्पर्श काही दिवस छान वाटला. पण आता मात्र तुझ्या आठवणींपेक्षा तुझा सहवासच अधिक हवाहवासा वाटतो. तुझ्याशिवाय मी अत्यंत  कासावीस झाले आहे."

त्याच्यापासून दूर जाताना तिला वाटत होतं फार थोडे दिवस काढायचे आहेत त्याच्याशिवाय. गावी गेल्यावर तिथल्या डोंगर- कपाऱ्यात, डोंगराच्या कुशीत असलेल्या गर्द हिरवाईत, तिथल्या नागमोडी वाटेच्या वळणामध्ये मी हरवून जाईन. तिच्याही नकळत त्या वाटेवर एक अवघड चढण येते. मोठ्या जोमाने, उत्साहाने ती  चढण चढण्याचा प्रयत्न करते. पण थोडी बहुत चढण चढून गेल्यावर तिच्या लक्षात येत कि ही चढण चढणं फारसं सोपं नाही. तो सोबत असता तर आपण अगदी सहजपणे ही  चढण चढून गेलो असतो. वाटेवरची ही चढण चढता चढता तिच्या लक्षात येतं कि आयुष्याची अवघड वाटही आपण त्याच्याशिवाय चढू शकणार नाही. तो सोबत हवाच. पण तो आपल्यापासून खूप खूप दूर असताना कसं शक्य आहे ते ? पण तेवढ्यात हवेची झुळूक येते. ती हवेची झुळूक नव्हे तर त्याचा श्वास आहे असं तिला वाटतं. आणि  मग ती म्हणते -

“अनघड  किती  वाट
जीव  घायकुतीला येतो
इतक्यात सोबती माझ्या
श्वास सख्याचा येतो ”

तिला जशी त्याची ओढ असते तशीच त्यालाही तिची ओढ असते. एक दिवस अचानक तो तिच्या अंगणात उभा राहतो. आणि मग सुरु होतो तिच्या अबोल शब्दांचा  खळखळाट. ती म्हणते -

“अरे माझं राहू दे. तू नव्हतास सोबतीला म्हणून इथल्या रानातली कोकिळा गात नव्हती. पण तू आता आला आहेस ना……… आता बघ ती कोकीळ पुन्हा गायला लागली आहे. माझ्या आयुष्यालाही पुन्हा सुर येईल, आनंदचा पूर येईल. ”

तिच्या भावना व्यक्त करताना ती म्हणते -

" ती पुढे अंधार तसा भित्रा. पण एवढ्याशा पणतीच्या उजेडाने त्याला धीर येतो. तो प्रकाशाच्या लक्ष लक्ष किरणांच्या रुपानं हसू लागतो. तशीच तुही माझ्या आयुष्यातल्या मिट्ट काळोखातली पणती आहेस. तू आलास ना, मग आता माझं आयुष्यही प्रकाशानं भरून जाईल. तुझ्याशिवाय आपला हे सत्ख्नी घर मला खायला उठतं रे. एवढा मोठ्ठा घर पण तुझ्याशिवाय ते खूप खूप सुना वाटत होता."

या साऱ्या भावना व्यक्त करणारी ही कविता.

2 comments:

 1. प्रथमेश पाटील12 September 2014 at 20:39

  कविता खुप छान आहे. खुप आवडली.

  ReplyDelete
  Replies
  1. प्रथमेश प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

   Delete