Tuesday, 8 April 2014

Love Poem : आला आला सखा माझा

गेली सहा सात दिवस गावी गेलो होतो. शेतावर. कालच आलो. माझं गाव तसं छोटेखानी. काँग्रेसच्या जवळजवळ साठ वर्षाच्या राजवटीनं शेतकऱ्याला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेसं पाणी पुरवलं नसलं………शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव दिला नसला………. शेतकऱ्याला आत्महत्येच्या खाईत लोटलं असलं तरी गावागावात कॉम्पुटर आणि घराघरात मोबाईल मात्र नक्की पोहचवलाय. गावतल्या सायबर कॅफेत मुलं   MSCIT शिकत असतात. या शासनमान्य कोर्सानं मुलांना काय दिलं ? माहित नाही पण गल्ली बोळात सुरु झालेल्या सायबरवाल्यांनी मात्रं धंदाच केला.
तर सांगायचा मुद्दा हा कि माझं गाव छोटेखानी असलं तरी तिथं सायबर कॅफे आहे आणि गावी गेल्यावर कधीकधी मी तिथल्या सायबर कॅफेतून पोस्ट करतो. पण यावेळी गावातल्या दोन्ही सायबर कॅफेतलं नेट बंद होतं आणि म्हणून मला नवं लिहायला वेळ झाला.   हे मात्रं ' नमनालाच तेल फार ' झालं. तेव्हा थांबतो -

तर ती दूर रानात ………. त्याची वाट पाहत. आज कधी नव्हे ते त्याला उशीर झालेला ………त्याची वाट पाहून तिच्या डोळ्यात पाऊस आलेला.

ती अगदीच कासावीस ………त्याची वाट पाहवून …….निशब्द झालेली.

त्याचं वाट पाहणं जसं नेहमीचंच ………….तसाच तिचा उशीरही.

ती नेहमीच उशिरा यायची. त्याला खूप राग आलेला असायचा तिचा. त्यानं ठरवलेलं असायचं …………आल्यानंतर तिला खूप खूप रागवायचं. पण झालेला उशीर तिला माहिती असायचा म्हणून ती लगबगीनं............केसांच्या बटा सावरत याची. येताना तिच्या ओठांवर एक हळुवार हसू असायचं. ते हसू पाहिलं कि तो तिला झालेला उशीर विसरून जायचा………तिच्या डोळ्यात खोल खोल बुडायचा.

आज मात्र त्याची वाट पाहून ती थकून गेलेली. त्यातातच आभाळ भरून आलेलं. प्रकाशाच्या वाटा पुसट होत चाललेल्या. त्यात आणखी वार्यानं काहूर मांडलेलं. तिचं मन अगदीच पाखरू झालेलं. पण तो मात्र दूरवर कुठेही दिसेना. कुठे दूरवर थोडं जरी खसफस झालं तरी तिला वाटायचं तोच आला असावा. पण तो कुठेच दिसायचा नाही.

त्याची अशी वाट पहाताना पाऊस रिमझिमू लागतो. तेव्हा तिला वाटतं......... हा पाऊस नव्हे आपला सखाच आहे. मग सारं चित्रं तिच्या डोळ्यासमोर उभं रहातं. तिला वाटतं हा पाऊस म्हणजे आपला सखा आणि दारातली जुई म्हणजे ती. असं चित्रं पहाता पहाता ती म्हणू लागते –
" आला आला सखा माझा …"
आला आला सखा माझा, वेडा होऊन पाऊस
त्याच्या येण्या नी जाण्याचे, सारे सरले आभास.........ll धृ ll
किती घातला धिंगाणा
जुई दारीची वाकली
   नको नको म्हणताना
 काया भरून माखली
तिची मोहरली काया, त्याचा गंधाळला श्वास
आला आला सखा माझा, वेडा होऊन पावूस.........ll १ll
चोहो बाजूने तो आला
आला पिसाटाच्यापारी
नको नको म्हणताना
माती चिंबीविली सारी
त्याने रुजवले बीज, तिची उजवली कूस
आला आला सखा माझा, वेडा होऊन पाऊस......ll २ ll
आला करीत गर्जना
भय कापरी कडाडा
आला करून दंडायी
आत लोटून कवाडा
 कळले ना कधी आला,लक्ष लांगुनिया कोस
आला आला सखा माझा वेडा होऊन पाऊस ........ll ३ ll

2 comments:

 1. Apratim! Apratim!! Apratim!!! Khupach chaan kavita sadar kelit Vijayji... ase vatle
  ki hi kavita shabda nahi tar pratyakshitach mazyasobat ghadtay.... Mi nakkich hya kavitela chaal lavun tumhyasamor sadar karin.... Dhanyavaad...

  ReplyDelete
  Replies
  1. मनोजजी, इतक्या उस्फुर्त आणि मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल मनापासुन आभार.

   Delete