( हा लेख भारतीयांनी तर वाचावाच पण सातासमुद्रापलीकडे असणाऱ्या भारतीयांनी तर नक्कीच वाचावा. आणखी एक विनंती, इथले व्हिडीओ पाहताना दिसतील तेवढयाच विंडोत पहावेत. कारण व्हिडीओ फुल स्क्रीन केलात तर व्हिडीओचा दर्जा खालावेल. )
मला खरंतर एकाच भागात दोन्ही चित्रफिती टाकून एकाच वेळी हा सारा भाग निकालात काढता आला असता. परंतु तसं करणं शक्य नव्हतं. कारण
तो संपुर्ण दोन तासांचा कार्यक्रम पहाताना माझ्या मनात भावनांचे अगणित तरंग आकाराला येत होते आणि म्हणुनच साधारणता दोन तासांचा तो कार्यक्रम मी तीन भागात लिहिण्याचं ठरवलं. मोदींच्या चित्र रेखाटनाचा एक स्वतंत्र भाग या आधी पोस्ट केलेला आहेच.
आज मराठी ब्लॉगिंग क्षेत्रात अनेक अनिवासी भारतीय आहेत. त्यांच्या आठवणी ते लिहितात. तिथले अनुभव लिहितात. ते स्वतःला फार मोठे लेखक समजत नाहीत. भारतात कुणीतरी आपला ब्लॉग वाचतील. तिथूनच आपया पाठीवर हात ठेऊन म्हणतील, " छान लिहिलं आहेस. हे नुसते शब्दच नाहीत. तुमचा स्पर्श आहे." या आणि इतर अशा अनेक ठिकाणाहून ते आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. आपआपल्या परीनं मराठीशी असलेली नाळ घट्ट जोडुन ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांचा तसाच प्रयत्न मला परवाच्या कार्यक्रमातही दिसून आला.
नृत्य, गाणी आणि मोदींच भाषण सुरु असताना जेव्हा जेव्हा प्रेक्षकांमध्ये कॅमेरा फिरायचा तेव्हा तेव्हा प्रेक्षक भान हरपून आणि सारं विसरून कॅमेऱ्याला सामोरे जायचे. खरंतर क्रिकेट सामन्याला उपस्थित असणारे बरेच प्रेक्षक आपलं अस्तित्व कॅमेऱ्यानं टिपावं म्हणुन अनेक माकड चाळे करत असतात. परंतु मेडिसन स्क्वेअरला उपस्थित लहान मोठी सारीच मंडळी त्यांच्यावर कॅमेरा रोखला गेलाय हे लक्षात येताच केवळ कॅमेऱ्यासमोर हात हलवत होते. जणु साता समुद्रापलीकडे असलेल्या आमच्याशी ते संवाद साधत होते. सात समुद्रापलीकडे असलेले आपले आई - बाबा, भाऊ - बहीण, काका - काकी, मामा - मामी, आत्या यांच्यापैकी कुणीतरी आपल्याला पाहिलं. आपली त्यांची दृष्टभेट झाली तरी पुरे. त्या क्षणभरातही त्यांच्या डोळ्यात दिसणाऱ्या असंख्य भावनांचे तरंग माझ्या मनाला स्पर्श करून गेले. जणू सातासमुद्रापलीकडे असलेल्या आपल्या जिवलगांना ते सांगू पहात होते, " आम्ही आहोत इथे. आम्हाला तुमची खुप खुप आठवण येते. खूप लांब असलोत आम्ही तुमच्यापासून तरी आम्हाला तुमचा विसर पडलेला नाही. पहा ना आमच्या डोळ्यात, तुम्हाला ओळखीच्या खुणा दिसतील. कदाचित अजुनही वर्षभर नाही येता यायचं आम्हाला तुमची भेट घ्यायला. चला क्षणभर इथचं भेटून घेऊ. "
माझ्यापासून हजारो मैल असणाऱ्या मित्रांनो हेच भाव होते ना तुमच्या डोळ्यात !
No comments:
Post a Comment