Monday, 13 October 2014

Shiv sena, BJP : शिवसैनिका हे वाच रे !

शिवसैनिका हे वाच रे ! या शीर्षकाखाली हा लेख लिहिला असला तरी. तो समस्त रसिक वाचकांसाठी आहे. हे असं शिर्षक निवडण्याला कारण असं कि, मी नुकताच फेसबुकवरची शिवसेना हा लेख लिहिला होता. त्या लेखाला अनेक प्रतिक्रिया आल्या. काही लेखाचं समर्थन करणाऱ्या होत्या तर काही माझी कान उघडणी करणाऱ्या होत्या. पैकी बबन बांगरे या कट्टर शिवसैनिकाची प्रतिक्रिया
अत्यंत संतप्त आणि परखड होती. ती सविस्तर प्रतिक्रिया तुम्हाला फेसबुकवरची शिवसेना या लेखाखाली पहायला मिळेलच. इथं केवळ त्या प्रतिक्रियेतले काही संदर्भ आले आहेत. त्यांच्याशी  आणि त्यांच्यासारख्या इतर शिवसैनिकांशी संवाद साधण्याच्या हेतूने हा लेख लिहितो आहे.*******

बबनजी, स्पष्ट आणि प्रांजळ प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. तुमच्या लेखाला प्रतिक्रिया दयावी म्हणुन लिहायला बसलो आणि 'शिवसैनिका हे वाच रे !' हा लेख लिहिला गेला. कृपया लेख वाचून पुन्हा प्रतिक्रिया मिळाली तर बरे होईल.  पण तुम्ही उद्धव ठाकरेंची भाषा बोलता आहात हे पाहुन वाईट वाटलं. आणि मी माझ्या लेखात तेच म्हणालो आहे कि , " शिवसेनेच्या समर्थकांच्या तोंडी हि भाषा येते कुठून ? हे वळण आई वडिलांचं तर मुळीच नसणार ? शिक्षकांनी सुद्धा हे धडे दिले नसतील ? समाजानही हे वळण लावलं नसेल ! मग कुठून येते शिवसैनिकांच्या तोंडी हि भाषा ? खुप विचार केला तेव्हा लक्षात आलं, ' जसा नेता तसे कार्यकर्ते.'"

तुम्ही जसे हाडाचे शिवसैनिक आहात तसाच मीही शिवसैनिकच आहे. इतकंच काय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माझी सख्खी बहीण नगरसेवक आहे. तेही सर्वाधिक मताधिक्यान विजयी झालेली. छोटा भाऊ शाखा प्रमुख. पण जे चुक ते चुक हे सांगण्याचं धाडस आमच्यात आहे. त्यामुळेच तुमचा , " शेंडगेसाहेब ही निवडणूकीची लढाई आहे. ह्या लढाईच्या गदारोळात तुम्ही पडूच नका, नाहीतर नस्ता मनस्ताप होईल डोक्याला. " हा सल्ला पटला नाही.

तुम्ही म्हणता , " आम्ही तुम्हाला दिल्लीत पाठवलं त्यात महाराष्ट्राचा सुध्दा वाटा आहे." ते कुणीच अमान्य करत नाही. पण महाराष्ट्रात ४२ आणि युपीत ७३ जागा मिळतील असं कुणालाच वाटत नव्हतं. महाराष्ट्रात अधिकाधिक ३० ते ३५ आणि युपीत ५५ ते ६० जागा मिळतील एवढीच प्रत्येकाची अपेक्षा होती.महाराष्ट्रात शिवसेना पाठीशी होती हे मान्य. पण युपीत कोण होतं ? कुणीच नाही ना ? त्यामुळेच महाराष्ट्रातच काय संपूर्ण देशात भाजपाला जे यश मिळालं ते केवळ मोदींच्यामुळे हि वस्तुस्थिती कुणीच नाकारू नये. माझा थोडाबहुत राजकीय अभ्यास आहे. मनोविशलेष्णही काहीसं जाणतो त्यामुळेच मी हे ठामपणे सांगू शकतो कि मोदींच्या ऐवजी अन्य कुणाला भाजपाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणुन प्रोजेक्ट केले गेले असते तर भाजपाला पुर्ण बहुमत मिळालेच नसते.

तुमचा आणखी एक प्रश्न, " देशाचा पंतप्रधान जर भाजपचा नेता बनून एका राज्यासाठी मतं मागायला आला तर त्याच्यावर आम्ही टीका करायची नाही, की पंतप्रधान आले म्हणून लाल गालिचा अंथरायचा ?" त्याचंही उत्तर दयायला हवं.

तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे पंतप्रधान असते तर शिवसेनेच्या प्रचारासाठी राज्यात आले नसते. आहो, सोनिया इथं, राजीव इथं, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, मायावती इथं. मग मोदी आले तर बिघडलं कुठं ? आपलं वय काय मला माहित नाही. पण मी ४८ वर्षाचा आहे. आणि माझ्या लहानपणी इंदिरा गांधींना विधानसभेचा प्रचार करत महाराष्ट्रातच काय अनेक राज्य फिरताना पाहिलं आहे.  पण मोदींची सगळ्यांनाच भीती वाटते आणि म्हणुनच शिवसेनेनच नव्हे तर सगळ्याच विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय.

बबनजी, काँग्रेस - राष्ट्रवादीन मतदारांना विकत घेण्याची संस्कृती या लोकशाहीला दिली. शंभर टक्के मतदार विकला जातो असं मी मुळीच म्हणणार नाही. पण जो दहा टक्के मतदार विकत घेण्यासारखा असतो तोच आमच्या लोकशाहीचं भवितव्य ठरवतो हे या नेत्यांना पुरतं कळून चुकलं आहे. आणि म्हणुनच आज आम्ही कोट्यांनी पैसे जप्त केल्याच्या बातम्या पहात आहोत. 

स्थानिक पक्षांचं राजकारण कधीही जनहिताच आणि देशहिताच असणार नाही हे मी माझ्या,  Indian Politics : स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा  या लेखात लिहिलं आहे. आणि, " मी केवळ एक रुपया मानधन घेईन." असं म्हणत ६८ कोटींची बेहिशोबी मालमत्ता गोळा करणाऱ्या जयललिता हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. आणि तरीही त्यांच्या शिक्षेच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरते आहे. नवा मुख्यमंत्री शपथ घेताना आश्रू गाळतो आहे. इतकी का आमची लोकशाही आंधळी आहे ? अधिक स्पष्टीकरणासाठी माझे Shiv sena, BJP, MNS : माया, ममता , राज आणि उद्धव हा लेख जरूर पहावा. रामदास आठवलेंच पहा ना ? त्यांना सत्तेत दहा टक्के वाटा  हवा आहे. का हो ? ज्या माणसाची स्वबळावर दहा आमदार निवडुन आणण्याची कुवत नाही त्याने केवळ आपल्या जातीचं राजकारण करून सत्तेत दहा टक्के वाटा मागावा ? कशासाठी ? जनकल्याणासाठी ? कधीकाळी याच आरपीआयला सोबत घेवून फिरणाऱ्या आघाडीनं स्वतःला सेक्युलर म्हणवून घ्यावं ? 

परवा कोकणातल्या एका भाषणात राज ठाकरेंनी गोव्याचं आणि मध्यप्रदेशाच भरभरून कौतुक केलं.  "गोव्यात काही नसताना केवळ पर्यटनाच्या आधारावर ते राज्य चाललं आहे."  असं त्यांनी ठणकावून सांगितलं. मध्यप्रदेश सरकारनं केवळ आपली जंगलं जगाला दाखवुन आपल्या राज्याची घडी बसवल्याचं सांगितलं. पण हे सांगताना या दोन्ही ठिकाणी गेली अनेक वर्ष भाजपाचं राज्य आहे याचा त्यांना विसर पडला असावा. मोदी देश रसातळाला नेतील असं म्हणणाऱ्या विरोधकांनी आणि त्यांची रि ओढणाऱ्या समर्थकांनी १५ वर्षात गुजरातची काय अधोगती झाली ते सांगावं. आणि अधोगती होत असताना वर्षानुवर्ष मोदींच्या हातात बहुमतानं मोदींच्या हाती सत्ता देणारी जनता मुर्ख कि जनतेला ठगऊ पहाणारे विरोधक नालायक हा विचार आपण करायचा आहे. 

बबनजी, " तुम्ही केक खाणार आणि आम्ही काय फक्त मेणबत्त्याच लावायच्या काय ? " या उद्धव ठाकरेंच्या विधानाचं आपण काय स्पष्टीकरण दयाल ? यातल्या केकचा अर्थ काय ? कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद शिवसेनेलाच हवं हि मागणी उद्धव ठाकरेंनी का लाऊन धरली होती ? पदाशिवाय जनसेवा करताच येत नाही का ? 

आणखी एक बाळासाहेबांच्या नंतर उद्धव आले, आपल्याला हवं ते पदरात पडत नाही हे पाहून राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली. उद्धव आता आदित्यला सोबत घेऊन फिरताहेत. पुढचा वारसदार म्हणुन आदित्यला प्रोजेक्ट करताहेत. आणि हेच उद्धव ठाकरे काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करताहेत. या संदर्भात मी , ' पंडित नेहरू ते आदित्य ठाकरे ' हि पोस्ट लिहिली होती. जरूर पहावी. 

लिहायचं म्हणलं तर आणखी खूप काही लिहिता येईल. पण शेवटचा मुद्दा मांडतो. 

" हो, हे शक्य आहे !" म्हणत जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याच स्वप्न जनतेला दाखवणाऱ्या राज ठाकरे यांना नाशिकबद्दल विचारलं तर, " ते मला पाच वर्षांनी विचारा. " असं सांगतात.

आणि मोदींनी १०० दिवसात काय केलं याचं हिशोब राज ठाकरेंसह सगळेच विरोधक मागतात. कधी नव्हे ते पेट्रोल ६ रुपयांनी स्वस्त झालं. हे विरोधकांना तर सोडाच पण जनतेलाही दिसणार नाही. धन्य आमचे विरोधक आणि धन्य आमची लोकशाही. मी मोदींच समर्थन करणार नाही. काँग्रेसला साठ वर्ष दिलीत तशीच भाजपालाही साठ वर्ष दया असं म्हणणार नाही. पण पाच वर्षतरी थांबा. पाच वर्षात अपेक्षित परिणाम नाही दिसला तर तर खेचा ना त्यांना सत्तेवरून खाली. पुन्हा काँग्रेसला बहुमत दया. पण या स्थानिक पक्षांच्या भूलथापांना बळी पडू नका.

     

6 comments:

 1. एकदम रास्त लेख.

  ReplyDelete
 2. Ekdam Sahi Sarji.

  ReplyDelete
 3. प्रतिक्रियेबद्दल आभार मित्रा. पण यापुढे लिहिण्याची तसदी घेतलीत तर खूप बरे होईल.

  ReplyDelete
 4. कणखर लेख वजा समज काढणारा जवाबआवडला

  ReplyDelete
 5. आभार प्रशांतजी. पण तुमच्यासारख्या जाणकार आणि समजूतदार वाचकांनी माझे काही चुकत असले तर मला नक्की आवडेल.

  ReplyDelete