Monday, 10 February 2014

ATM card Holder : ATM कार्ड धारक आहात : सावधान

प्रत्येक ATM कार्ड धारकानं ही पोस्ट वाचायलाच हवी. कारण इलेक्ट्रोनिक माध्यमांमुळे आपल्यासमोर अनेक नवनव्या सुविधा येतात. ATM मशीन फोडून त्यातील रक्कम लुटण्याच्या कितीतरी घटना आपल्याला माहित आहेत. परंतु एखाद्याचं अकाउंट ह्याक करून त्या अकाउंटमधली रक्कम परस्पर काढून घेतल्याच्याही घटना अधूनमधून आपल्या वाचनात येत असतात. हे कसं घडत असावं या संदर्भात माझ्यासोबत घडता घडता राहिलेली हि घटना.


माणसानं तयार केलेल्या कुठल्याही सिस्टीममधे लूप होल असतातच. ATM हीही माणसानंच तयार केलेली सिस्टीम आहे. तिच्यातही लूप होल असणारच. काही काळ गेला कि फसवणूक करू पाहणाऱ्यांच्या ते लक्षात येतात. पण बळी आपला जातो. सामान्य माणसाचा. 

घटना कालचीच. मी गावी होतो. शेतावर. उसाला खत टाकायचं काम चाललेलं होतं. ऊस फोडून त्याला माती लावायचं कामही दोघंजन करत होती. इतक्यात मला एक फोन आला. नंबर होता 07763071068. फोनवरील गृहस्थ म्हणाला ," मी ATM कॉल सेंटर मधून बोलतोय."

" बोला. " मी

" अलिकडे ATM कार्डच्या संदर्भात फसवणुकीचे बरेच प्रकार घडत आहेत. त्यामुळे बँकांनी सर्व ग्राहकांचे ATM कार्ड धारकांना नवीन कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन कार्ड तुम्हाला २४ तासाच्या आत मिळतील. " समोरून. 

" पण माझ्याकडे तर दोन बँकांचे ATM कार्ड आहेत. " मी.

" ठिक आहे आपले दोन्ही कार्ड आपल्याला बदलून मिळतील. या नव्या कार्डवर आपला फोटो असेल आणि केवळ घरातल्या व्यक्तीच हे कार्ड वापरू शकतील. " फोन करणारी व्यक्ती.

चला नव्या ATM कार्डवर आपला फोटो येणार म्हणून मी खुश. त्या खुशीतच मी विचारलं, " हे नवं कार्ड मला कुठं मिळेल? "

" तुम्ही कुठं जायची गरज नाही. उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत हे नवं कार्ड तुम्हाला घरपोच मिळेल. "

मला हवी तेवढी मिळाली होती. मी फोन बंद करायच्या तयारीत होतो. तेवढ्यात समोरची व्यक्ती म्हणाली, "

आता तुम्ही तुमचं ATM कार्ड हातात घ्या. मला तुम्हाला काही माहिती द्यायची आहे."

" पण आत्ता माझं ATM कार्ड माझ्याजवळ नाही." मी

" मग घेवून या."

" मला वेळ लागेल. "

" किती वेळ लागेल ? "

" एक तासभर. "

" आम्ही एवढा वेळ थांबू शकत नाही. कारण अर्ध्या तासात तुमचं अकाउंट लॉक करण्याच्या सूचना आम्हाला देण्यात आलेल्या आहेत. शक्य तेवढया लवकर तुम्ही तुमचं कार्ड सोबत घ्या. "

" ठीक आहे. वीसेक मिनिटांनी फोन करा. "

धावत पळत मी घरी गेलो. कपाटातलं ATM काढून खिशात ठेउस्तोवर त्या गृहस्थाचा फोन आलाच. " आता कार्ड तुमच्या हातात आहे. "

" हो आहे. " पण एवढया वेळात माझ्या मनात हजार शंका येऊन गेल्या होत्या.

" आता तुमच्या कार्डवर जिथं VISA ( व्हिसा ) असं  लिहिलेलं आहे. नव्या कार्डमध्ये तिथं त्या ऐवजी तुमचा फोटो असेल. "

" ठीक आहे. " मी.

" आता VISA च्या वरच्या बाजूला एक सोळा अंकी नंबर आहे. "

" तो चार ( ४ ) ने सुरु होतोय. "

" हो. " मी.

" Now tell me the number. Let me cross check it."

" सॉरी. मी तुम्हाला माझा नंबर सांगणार नाही. "

" ठीक आहे मी तुमचं अकाउंट लॉक करून टाकतो. " तो जरा संतापलेला.

अकाउंट लॉक होईल म्हणून मी मुळीच घाबरलो नाही. उलट मीचआवाज चढवला आणि म्हणालो " ठीक आहे लॉक करून टाका. मी बँकेत जाऊन पाहीन काय करायचं ते. "

माझ्या या पावित्र्यावर तो जाम भडकला. म्हणाला, " साले खाली अकाउंट नही लॉक करूंगा. तेरे उपर केस भी ठोक दूंगा. " आता तो त्याच्या जातीवर गेला होता.

मी आणखीनच आवाज चढवून म्हणालो, " तू क्या केस ठोकेगेगा ? तू कहासे बात कर रहा है बता दे मैं ही आकर तेरे उपर केस ठोकता हू। मैने …………"

त्यानं फोन ठेऊन दिला. मी इथं सारं मराठीत लिहिलं असेल तरी आमच्यातलं सगळंच संभाषण हिंदीत झालेलं होतं. मी आज बँकेत जाऊन रीतसर तक्रार करणार आहेच. पण तुम्ही काळजी घ्या. असा कुठलाही कॉल आला, SMS आला तर त्याला कुठलीच माहिती पुरवू नका.

ही पोस्ट सगळ्यांपर्यंत पोहचवा.   
    


   

  

No comments:

Post a Comment