माझी ' रे घना ' ही कविता दैनिक सकाळमध्ये प्रकाशित झाली होती. सकाळनं सोलापूरचे प्रसिद्ध चित्रकार माननीय श्री शिरीष घाटे यांच्याकडून माझ्या कवितेसाठी चित्रं काढून घेतलं होतं. दैनिक सकाळमध्ये शिरीष घाटे यांच्या चित्रासह प्रकाशित झालेली माझी कविता पाहून माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. माझी कविता दैनिकात प्रकाशित होण्याची
ती काही पहिलीच वेळ नव्हती. कविता प्रकाशित झाल्याचा आनंद झाला होताच. पण त्याहूनही अधिक आनंद झाला होता दैनिक सकाळनं माझ्या कवितेतल्या भावना व्यक्त करणारं चित्रं छापल्याचा. आणि ते शिरीष घाटे यांच्यासारख्या प्रसिद्ध चित्रकाराकडून काढून घेतल्याचा.मला एवढा आनंद होण्याचं आणखी एक कारण होतं. चित्रकार हा एक सुप्त कवी असतो आणि कवी हा एक सुप्त चित्रकार असतो असं माझं ठाम मत होतं. शिरीष घाटेंचं चित्रं पाहिल्यानंतर माझं मत विश्वासात बदललं. कारण कविता लिहिताना आपल्या प्रियकराची वाट पहाणाऱ्या प्रेयसीच्या मनातलं जे चित्रं माझ्या मनात तरळत होतं.…………… माझ्या मनात ज्या भावनांचा कल्लोळ होता………… कविता लिहिताना मला जसा प्रियकर दिसत होता. नेमकं तेच रेखाटलं होतं शिरीष घाटेंनी.
पुढे अनय गाडगीळ या संगीतकारानं माझ्याच गाण्यांचा स्टेज शो करायचं ठरवलं. मीच लिहिलेल्या २०- २२ गाण्यांचा हा कार्यक्रम. या शोलाही ' रे घना ' हेच शीर्षक द्यायचं ठरलं. त्यानं सकाळमध्ये कवितेसोबत प्रकाशित झालेलं चित्रं पहायल आणि म्हणाला, " मला हे मुळ चित्रं हवंय. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ब्याक स्टेजला मला हीच पार्श्वभूमी हवी. "
सकाळमध्ये ते चित्रं आम्हाला मिळालं नाही. मग आम्ही शिरीष घाटेंचा शोध घेतला. मला वाटलं होतं ते पुण्यातले असतील. पण ते निघाले सोलापूरचे. मग त्यांचा फोन नंबर मिळवला. संपर्क साधला. त्यांनी आनंदानं पुन्हा चित्रं काढून देण्याची तयारी दर्शविली. फक्त त्यांना माझ्या कवितेसाठी नेमकं कसं चित्रं काढलं होतं ते आठवत नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्या चित्राची प्रत मागितली होती. माझ्याकडे सकाळमध्ये प्रकाशित झालेली कविता आणि तिच्या पार्श्वभूमीवरच चित्रं होतं. मी लगेच त्याची छायांकित प्रत काढली. पोस्टानं ती त्यांना पाठवली. त्यांनीही पंधरा वीस दिवसात चित्रा काढून त्यांच्याच मित्राच्या हस्ते ते पुण्यात पाठवून दिलं. आजही त्यांची माझी भेट नाही. पण हा प्रत्यक्ष न भेटताही रुजलेला ऋणानुबंध मला कधीच विसरता येणार नाही. कुणास ठाऊक त्यांना भेटण्याचा योग कधी येतोय ?
No comments:
Post a Comment