Sunday 2 February 2014

Marathi Kawita, Poem for Kids : पावसा रे पावसा


शाळा सुरु होते ना होते तोच मुलांना शाळा नकोशी वाटू लागते. मग ती शाळेला बुट्टी मारण्यासाठी एक ना अनेक हजार बहाणे शोधू लागतात. " सांग , सांग भोलानाथ, ......" हे मंगेश पाडगावकरांच अशाच एका मुलाचा खट्याळपणा व्यक्त करत. हा विषय माझ्या मनात घोळू लागला. मंगेश पाडगावकरांची कविता ध्यानीमनी सुध्दा नव्हती. पण


मनात विषय घोळत गेला. आणि बघता बघता कविता आकाराला आली.
या माझ्या कवितेतल्या मुलालाही शाळेत जायचं नाहीये. पण घरी रहाण्यासाठी आईला कारण काय सांगाव ? हा फार मोठा प्रश्न त्याच्यासमोर पडलाय. ‘ भोलानाथ, भोलानाथ ‘ या गाण्यातला त्याचा सवंगडीही त्याला आठवतोय. ‘ सहाजिकच पोटात दुखतय ‘ असं कारण सांगून आईला काही पटणार नाही याची त्याला जाणीव.

आभाळात जमून आलेले ढग दिसताहेत. पाऊस येण्याची चाहूल लागली आहे. आणि मग हा मुलगा पावसाला लवकर येण्याची विनंती करतो. त्यासाठी सरींच्या छड्या खाण्याची तयारी दाखवतो. त्याला गरम भजी आणि शिराही देण्याची तयारी दाखवतोय. पण त्यासाठी तो पावसाळा काय काय करायला सांगतोय ते पहा तर खरं -

पावसा रे पावसा

पावसा रे पावसा लवकर ये
तुझ्या कुशीमध्ये मला आणि घे …………….!! धृ !!


शाळेची कटकट नको वाटते
रोज रोज हातावर झडी बसते
रिमझिम छडी तुझी हातावर दे, पावसा रे पावसा,…….!! १ !!


रोज रोज अभ्यास करू मी किती
डोळ्यापुढे पुस्तक धरू मी किती
कुशीमधे मला जरा तुझ्या शिरू दे, पावसा रे पावसा,…!! २ !!


खोल खोल असतात भूगोलाची मुळे 
गणिताला असतात चार चार सुळे
ढगामध्ये मला तुझ्या जरा लपू दे, पावसा रे पावसा,…!! 3 !!


शाळेमध्ये ये एकदा, गुरुजी होऊन
शाळाच आख्खी जाऊ दे वाहून
गोड मग मला, तुझा पापा घेऊ दे, पावसा रे पावसा…….!! ४ !!


बोट धरून तुला माझ्या , घरी मी नेईन
गरम भाजी अन शिराही देईन
खिसा भरून मग तुझ्या मला गार गारा दे, पावसा रे पावसा……..!! ५ !!


No comments:

Post a Comment