Sunday, 9 February 2014

Love Poem : कृष्ण सावळा होईन मी





आपली प्रेयसी, आपली सखी खूप सुंदर असावी असं जसं प्रत्येकाला वाटतं. तशीच ती खूप प्रेमळ आणि सुस्वभावी असावी असंही वाटतं. ती तुळशीवृंदावनातल्या तुळशी एवढी पवित्र आणि सोज्वळ असावी असाही आपला हेका असतो.


पण


  तिच्याकडून एवढ्या अपेक्षा करताना आपण कसे आहोत किंवा तिच्याही तिच्या मनातल्या सख्याविषयी, तिच्या जिवलगाविषयी काही अपेक्षा असतील असा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. ती दिसते…….. सुंदर असते………. म्हणून आपण तिच्या प्रेमात पडतो……..…खोल खोल बुडत जातो. तिला आपल्याविषयी काय वाटतं याचा थोडाही विचार आपण करत नाही.

या कवितेतला प्रियकर मात्र ही सारी जाणीव बाळगून आहे. म्हणून तो जेव्हा त्याच्या सखी कडून ‘ प्रीतबावरी मीरा ‘ होण्याची अपेक्षा करतो तेव्हा स्वतः ही ‘ कृष्ण मुरारी ‘ होण्याचं वचन देतो. तो जेव्हा तिला ‘ राधा ‘ व्हायला सांगतो तेव्हा स्वतः ही  राधेच्या मनातला ‘ सावळा कृष्ण ‘ होण्याची तयारी ठेवतो. इतकंच नव्हे तर तिच्या आयुष्यातला दुखाच्या प्याल्यातला सुखाचा थेंब होण्याचं आश्वासन देतो.

मित्रहो खरंच इतकं भान हरपून प्रेम केलं तर ती नक्कीच पंख पसरून तुमच्या आयुष्यात येईल. तुमच्या डोक्यावरचं ऊन झेलताना ती सुखाची सावली होईल.

 
कृष्ण मुरारी होईन मी
तू प्रीतबावरी मीरा हो
महादेवाच्या माथ्यावरची
गंगेची तू धारा हो

कृष्ण सावळा होईन मी
तू अल्लड अवखळ राधा हो
मिठीत शिरता सांज सकाळी
फुलता फुलता मुग्धा हो

चक्रपाणी होईन मी तू
गीतेमधली वाणी हो
पहाटलेल्या स्वप्नामधली
तू एकटी राणी हो

मीरा हो तू, राधा हो तू
हो गीतेची वाणी
तुझ्याचसाठी भोगीन मी
पुन्हा मानवी योनी

तुझ्याचसाठी पुन्हा एकदा
जन्म येथला घेईन मी
तुझ्या दुखाच्या प्यालामधला
थेंब सुखाचा होईन मी.

4 comments:

  1. अनघा कुलकर्णी6 September 2014 at 16:41

    "तुझ्याचसाठी पुन्हा एखदा
    जन्म येथला घेईन मी
    तुझ्या दुखाच्या प्यालामधला
    थेंब सुखाचा होईन मी."
    खुप सुंदर कल्पना.

    ReplyDelete
    Replies
    1. अनघा प्रतिक्रियेबद्दल मनापासुन आभार. आता तू मला घरची वाचक वाटू लागली आहेस.

      Delete
  2. खरच छान आहे. इतकी छान शब्दांची गुंफण आहे आणि तुम्ही सगळ्या प्रकारात उत्तम लिखाण करता म्हणजे कविता असु देत किंवा लेख तुमची शब्दावरची पकड एकदम मजबुत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. दत्तुजी, आपल्या दिलखुलास अभिप्रायाबद्दल मनपुर्वक आभार. पण आपण समजता तशी माझी शब्दांवरची पकड मजबूत नाही. अथवा शब्द मझे दास नाहीत तर मीच शब्दांचा दास आहे. मी त्यांना हवे तसा वागवत नाहीत. तेच मला हवे तसे वागवतात. काही वेळा कितीही यातायात केली तरी हाती लागत नाहीत.

      पण लिहिताना ' माझे लिखाण कुणालाही सहज समजेल असे असावे ' याची मी अत्यंत जाणीवपूर्वक काळजी घेत असतो. कविता लिहिताना तर ती अत्यंत बाळबोध असावी असा प्रयत्न करतो. उगाच शब्दांचे खेळ करण्याचा प्रयत्न करीत नाही.

      आपल्या अभिप्रायाबद्दल आपले पुन्हा एकदा आभार.

      Delete