Saturday 23 May 2020

त्यांनी खड्डे खणले आहेत , जनता माती टाकेल

cartoon by vijay shendge
मा. देवेंद्रजी फडणवीस,

सप्रेम नमस्कार. 

शिवसेनेने सत्तेत राहून विरोधकाची भूमिका घेतली. पाच वर्षे खिशात राजीनामे घेऊन फिरले पण
ते राजीनामे त्यांनी कधीही बाहेर काढले नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी तर बोलून चालून विरोधकच होते. या सगळ्यांनी मिळून २०१४ ते २०१९ या पाच वर्षात तुम्हाला हरप्रकारे घेरण्याचा प्रयत्न झाला. मराठा मूकमोर्चा असो, धनगर आरक्षण असो, हल्ला बोल मोर्चा असो, संविधान बचाव आंदोलन असो, शिक्षकांचे आंदोलन असो, अंगणवाडी सेविकांचे आंदोलन असो, ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप असो, अडत्यांचे आंदोलन असो, हजार प्रकारे तुम्हाला छळण्याचा प्रयत्न झाला. परंतु तुम्ही डगमगला नाही. शिवसेनेने दगाफटका केला नसता तर तुम्हाला सत्तेपासून रोखण्यासाठी पवार साहेबांना पुन्हा जन्म घ्यावा लागला असता.

आपण इतके विचारी, धोरणी असताना २०१९ विधानसभेच्या निवडणुकीपासून मात्र आपले तारू काहीसे भरकटलेले आहे. भाजपचा राज्यातला थिंक टॅंक कोण मला माहित नाही. आपले होकायंत्र कोण, कोण तुम्हाला दिशा दाखवते आहे माहित नाही. परंतु २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून आपले काही निर्णय चुकलेच आहेत. शिवसेनेशी केली युती हा असाच एक चुकीचा निर्णय. त्यानंतरही काही निर्णय चुकलेच. एकतर होकायंत्र बिघडले असावे, अथवा ते तुम्हाला जाणीवपूर्वक चुकीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत असावे. 

जनतेला जागे करावे, त्यांच्या मनात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रोष निर्माण करावा यासाठी आंदोलने केली जातात. परंतु सध्याचे सरकार स्वतःच खड्डे खणते आहे. मग तुम्ही कशाला आंदोलने करत बसला आहात. 'माझे आंगण, माझे रणांगण' या तुमच्या आंदोलनात काहीही गैर नाही. तुम्ही कोणता मोर्चा काढला नाहीत. तुम्ही कोठे सभा घेतल्या नाहीत. प्रत्येकाने आपापल्या अंगणात उभे राहून सरकारचा निषेध करायचा आहे. परंतु अंगण आणि रणांगण याचा अर्थाअर्थी संबंध न लागल्यामुळे सवंग मिडिया, सत्ताधारी केवळ त्यातील आंदोलन हा शब्द विचारात घेऊन राळ उडवू लागले आहेत. 'माझे आंगण, माझे रणांगण' या आंदोलनाची काहीच गरज नव्हती. त्यातून काय साध्य होणार आहे. अनंत करमुसेला मारहाण झाली, पालघर येथे दोन साधूंची राजरोस हत्या झाली ते धागे धरून तुम्ही आंदोलन सुरु केले असते तर ते तुमच्या फायद्याचे झाले असते.

कोरोना असताना सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत. राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकी मिळविण्यासाठी त्यांनी राज्यपालांचे उंबरे झिजवले. परंतु राज्यपालांनी बोलाविलेल्या बैठकीला उपस्थित रहायला मात्र त्यांना वेळ नाही. कारण कोरोनाशी जनतेने लढा दयावा. परंतु त्यांना स्वतःला घराबाहेर पडण्याची भीती वाटते आहे. तुम्ही मात्र घरात न बसता या संपूर्ण काळात सर्वोपरीने जनतेची मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. 

त्यामुळे तुम्ही काही करू नका. जनतेत जात रहा, सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणा. आता जनता शहाणी झाली आहे. तिला सगळे कळते आहे. आणि भरीस भर म्हणून, सत्ताधारी स्वतःच स्वतःसाठी खड्डे खणून ठेवत आहे. त्या खड्ड्यात तिघाडी सरकारला लोटून त्यावर माती टाकायचे काम जनता नक्की करेल. तुम्ही हाताला माती सुद्धा लावून घेऊ नका. या सापावर काठी घालायला जनता समर्थ आहे , तुम्ही काठी सुद्धा हातात घेऊ नका. 

2 comments:

  1. अगदी बरोबर विचार

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

      Delete