Tuesday 26 May 2020

मराठी माणूस कधी सुधारणार ????

cartoon by vijay shendge

महाराष्ट्रात राहून मराठी माणसातले  दोष दाखवायला अगदी जीवावर येतं. आज कोरोनामुळे तरी महाराष्ट्रात दहा बारा लाख युपी बिहारी काम करत होते हे लक्षात आलं. हा आकडा सोडून गेलेल्यांचा मला वाटत अजून दहा बारा लाख मंडळी महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेली असतील. इथल्या व्यावसायिकांनी, उद्योजकांनी महाराष्ट्रीयन माणसाला डावलून
युपी बिहार मधील एवढ्या मंडळींना कामावर का ठेवून घेतलं असेल? कारण सोपं आहे महाराष्ट्रीयन माणूस अंग मोडून काम करेल याची शाश्वतीच नाही. 

गेल्या चार आठ दिवसातला प्रसंग. बाथरूममधला नळ गळत होता. एका प्लंबरला फोन केला. आज येतो, उद्या येतो करत तो आलाच नाही. चार दिवसानंतर दुसरा प्लंबर शोधला. पहिल्या दिवशी तो आला फक्त बघून गेला. पुढे दोन दिवस त्याचा पत्ता नाही. शेवटी काल संध्याकाळी त्याला पुन्हा फोन केला. सकाळी येतो म्हणाला. आज दोन पान्हे घेऊन आला. 

हवे ते नळ मिळाले नव्हतेच. परंतु जो चांगला नळ आहे, तो गळणाऱ्या नळाच्या जागी बसव आणि जिथे चांगला नळ होता तो एन्ड कॅप लावून तो ब्लॉक कर असं त्याला सांगितलं. पण त्याने सांगितलेलं ऐकलं नाही. इकडचा नळ तिकडे आणि तिकडचा नळ इकडे केला. त्याला म्हणालो, "अरे असं कसं चालेल? तो गळका नळ पुन्हा गळणार नाही का?" 

म्हणाला, "नाही गळणार." महाराष्ट्रीयन माणूस तुमचं कधी ऐकत नसतो. तुम्ही इंजिनिअर असलात तरी त्याच्या दृष्टीने अडाणी असता. दहा मिनिटात त्याने काम उरकलं. 

हा प्लंबर म्हणजे मुलाच्या मित्राच्या साईटवरील प्लंबिंगची कामं करणारा गृहस्थ. त्याला पैसे देऊ नका असं मुलाच्या मित्राने बजावलं होतं. तरीही मी त्याला पैसे देणार होतोच. परंतु त्या क्षणी पाणी नव्हतं. त्यामुळे झालेलं काम कसं झालं आहे ते कळत नव्हतं. जुना गलका नळ ज्या जागी बसवला आहे तो गळणार आहे आणि त्याला पुन्हा यावं लागणार आहे हे मला माहित होतं. त्यामुळे त्याक्षणी त्याला पैसे द्यायची माझी इच्छा नव्हती. 

तो निघाला. मी पैसे देण्याच्या मूडमध्ये नाही हे त्याच्या लक्षात आलं. लगेच म्हणाला, "साहेब आकाश सरांनी  सांगितलं आहे तुमच्याकडून पैसे घेऊ नको म्हणून. पण भोनीचा टाईम आहे काहीतरी द्या." दहा मिनिटाचे १०० रुपये मी त्याच्या हातावर ठेवले.  तो गेला. पुढल्या अर्ध्या तासात पाणी आलं. आणि जो गळका नळ होता तो अधिक धो धो गळू लागला. लगेच त्याला फोन केला. म्हणाला, "आता मी दुपारी २ च्या आत नाही येऊ शकत."  

कुठेही जा महाराष्ट्रीयन माणसाचा असाच अनुभव येईल. तुम्ही पानाच्या टपरीवर जा तिथला भैया तुम्हाला अधिक सौजन्याची वागणूक देणार. महाराष्ट्रीयन पाणीपुरीवाला तुम्हाला औषधालाही सापडणार नाही. महाराष्ट्रीयन माणूस भैयांसारखे वेळेला, नुसता भात खाऊन राहणार नाही. त्याला सगळे राजेशाही हवे. आज नाही तर उद्या गेलेले भैये परत येतील. पण महाराष्ट्रीयन माणूस किती दिवस सरकारच्या नावाने शिमगा करणार? नको त्या गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा पडेल ते काम करण्याची तयारी महाराष्ट्रीयन माणसाने ठेवली नाही तर टाचा घासण्या पलिकडे तो काहीही करू शकणार नाही.

2 comments:

  1. अगदी बरोबर माझ्या कामात मी हा अनुभव घेतला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून आभार

      Delete