उद्धव ठाकरे आमदार झाले. मुख्यमंत्रीपदी कायम राहिले. आणि दुसऱ्या दिवशी ते दूरदर्शनवर जनतेला संबोधित करण्यासाठी आले. तेव्हा त्यांच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती आपण सगळ्यांनी पाहिली असेल. उद्धव ठाकरेंनी आजवर छत्रपतींच्या पुतळ्याचे अनेकदा पूजन केले आहे. मग यावेळी पाठीशी सिंहासनारूढ मूर्तीच का?
चार सहा दिवसापूर्वी उद्धव ठाकरे निवडणुकीला सामोरे का गेले नाहीत? याविषयी मी लिहिले होतेच. ठाकरे कुटुंबीय स्वतःला जनतेचे सेवक मानत नाहीत तर महाराष्ट्राचे सरंजाम मानतात. राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत, त्यामागे हिच भूमिका असावी. अन्यथा निवडणूक पार पडल्यापासून मुख्यमंत्री होईपर्यंत उद्धव ठाकरेंनी अनेकदा राज्यपालांच्या घराच्या पायऱ्या चढल्या आहेत. परंतु मुख्यमंत्री झाल्याबरोबर राज्यपालांच्या बैठकीपेक्षा अधिक महत्वाचे कोणते काम निघाले. ते चार सहा तासांनी झाले असते तर चालले नसते का?
ठाकरे कुटुंबीय स्वतःला सरंजाम मानत असले तरी बाळासाहेबांची भूमिका देशहिताची होती. हिंदुत्वाची होती. त्यांनी पक्षवाढीसाठी काही राजकारण केले आहे. परंतु ते खऱ्या अर्थाने पक्षाचे रिमोट म्हणून वावरले. सगळ्यांना नाचवलं. पण कुणाच्या हातातलं बाहुलं झाले नाहीत. २०१२ ला बाळासाहेब गेले. आणि उद्धव ठाकरेंना मृत्यूसमयी बाळासाहेबांना दिलेल्या वाचनाची आठवण २०१९ झाली. २०१४ शिवसेनेचे ६३ आमदार असताना त्यांना ते वचन का नाही आठवले?
हे हि सगळी आकडेवारी यासाठी दिली कि उद्धव ठाकरे अत्यंत खोटं बोलत आहेत. वास्तव हे आहे कि, त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. १०५ आमदार असलेली भाजप अशा रितीने पुन्हा कोंडीत सापडण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे आत्ता नाही तर पुन्हा नाहीच, याची जाणीव उद्धव ठाकरेंना होती. त्यामुळेच हिंदुत्व सोडून, तत्वांना मूठमाती देऊन, नको त्या लोकांच्या गळ्यात गळा घालून उद्धव ठाकरेंनी डाव साधला. आणि सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणता म्हणता स्वतःच मुख्यमंत्री झाले.
महाराष्ट्रात आजवर अनेक मुख्यमंत्री झाले. सगळ्यांनाच महाराजांविषयी आत्मीयता आहे, आदर आहे. तरीही आजवर कोणीही महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती मागे ठेवून पुढे खुर्चीत बसले नाहीत. परंतु उद्धव ठाकरेंना मात्र 'महाराष्ट्रात दोन राजे झाले एक ते आणि दुसरे आम्ही.', 'तेव्हा ते सिंहासनावर बसले आणि आज आम्ही' हेच दाखवून द्यायचे होते. आणि म्हणूनच त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचा असा वापर केला. असे माझे ठाम मत आहे. त्यातही राजे मागे आणि उद्धव पुढे हे तर चुकीचेच. अर्थात असे कोणी काही केले म्हणून महाराजांच्या कर्तुत्वाला बाधा पोहचत नाही. आणि महाराजांची प्रतिमा मागे ठेवली म्हणून कोणी महाराजांएवढे मोठे होत नाही. पण त्यातून उद्धव ठाकरे यांची वैचारिक बैठक दिसून येते एवढे मात्र नक्की.
छान
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.
Delete