Sunday 9 March 2014

Story For Kid's : प्रामाणिक पहारेकरी


एकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खुप दूर होता. पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहचणं शक्य नव्हतं. सहाजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहचले. परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते.

' आता काय करायचं ?' असा
प्रश्न साऱ्यांच्याच चेहऱ्यावर उमटला.

पण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज सोबत होते. ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता.

गडाचे दरवाजे बंद झालेत हे पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, " कोण आहे रे पलीकडे ? दार उघड. "

" तुमी कोण हायसा ? " पहारेकऱ्यानं दरडावून विचारलं.

पहारेकऱ्याचा दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तरही हसू दाबत महाराज म्हणाले, " आम्ही महाराज आहोत. "

पण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांनाच ओळखत नव्हता तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार. त्याला वाटलं ही काहीतरी शत्रूची चाल आहे. कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायला बघतोय.

तो आपला विचार करत राहिला आणि इकडून शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, "आरे,
उघड की दरवाजा. "

" तुमी कुणी बी असा पण दरवाजा उघडाया न्हाय जमायचं पाव्हणं. आवं सांजच्यापासून तांबडं फुटूस्तोवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचा न्हायी आसा शिवाजी महाराजाचाच हुकुम हाय. आन आमचं महाराज काय बी झालं तरी सवताचा हुकूम सवता कधीच मोडाय सांगत नाहीत असं समदी म्हणत्यात. आवं कुणी बी लुंग्या सुंग्या यईल आन महाराजांचं नाव घिवून दार उघडाया सांगण. आमाला एवढ कळना व्ह्य. तवा तुमी कुणी बी असा रातभर भायीरच बसा. दिस उजाडल्यावर बघू आपण काय आसन ते. "

महाराजांकडे आता कुठलाच मार्ग नव्हता. धाक दडपशाही करून त्यांनीच घालून दिलेला शिरस्ता त्यांना मोडायचा नव्हता. महाराजांनी आख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली.

सकाळ झाली. गडाला जाग आली. हळूहळू किलकिले होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यानं रात्रीचे पाहुणे दारातच असल्याचं पाहिलं. त्यांची नीट खातरजमा करूनत्यांना आत घेतलं.

पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याच्या कळालं कि ज्यांना रात्री आपण दरवाजावर आडवलं ते खरोखरच महाराजच होते तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट  दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला.

पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला. आणि म्हणाले, "तुमच्यासारख्या  प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचं स्वराज्य उभं आहे. "

छ्त्रपती शिवाजी महाराज की …… जय ………….!!!!!!!!!!!!!!!!!!

2 comments:

  1. Khup Chhan... Mast..
    www.marathiboli.com

    ReplyDelete
  2. Thanks Swapnil. Today i visited the English post http://subzeroricha.blogspot.in/2014/03/international-women-day-mom-and-me-store.html and found 75 comments on a single post including replies of other. We marathians must learn from this. Thanks ones again and be in touch.

    ReplyDelete