Monday 3 March 2014

Story for kid's : बन्सी आणि मिठाईवाला

बन्सीला स्वतःची शेती नव्हती. तो दुसऱ्यांच्या शेतावर मोलमजुरी करून घर चालवायचा.  त्याचं त्याच्या कुटुंबावर प्रेम होतं.

एक दिवस तो असाच दिवसभर मजुरी करून घरी परत निघाला होता. वाटेत नेहमीचं मिठाईचं दुकान दिसलं. वाट पहाणारी कच्चीबच्ची आठवली. त्यांच्यासाठी खाऊ घ्यावा असं मनात आलं. दुकानासमोर पोहचता पोहचताच त्यानं खिशात हात घातला. पण आजचे मजुरीचे पैसे मिळाले नव्हते. आणि त्याच्या खिशात केवळ थोडीफार चिल्लर होती. तेवढ्या खुर्द्यात मुलांसाठी काहीच घेणं शक्य नव्हतं. निराश मनानं तो तसाच दुकानासमोर थबकला. दुकानातून येणारा मिठाईचा सुवास त्याला आणखीनच निराश करत होता.

थोडावेळ दुकानासमोर थांबून निराश मनानं तो पुन्हा वाटेला लागला. चार पावलं टाकतो न टाकतो तोच
दुकानदाराचा दरडावणीचा स्वर त्याच्या कानी पडला, " अरे इतका वेळ दुकानासमोर उभं राहून तू मस्त मिठाईचा सुवास घेत होतास त्याचे पैसे कोण देणार ? "

" पण शेटजी मी तर कोणतीच मिठाई घेतली नाही, मग पैसं कसलं  देणार ? " तो दीनवाण्या स्वरात म्हणाला.

" वा रं  वा ! मलाच उलट प्रश्न विचारतोस. मिठाईचा सुवास घेतलास काय आणि मिठाई घेतलीस काय, दोन्ही सारखंच. चल, चल दोन रुपये काढ. " दुकानदार बन्सीच्या अंगावर धावून जात म्हणाला.

आता मात्रं काय करावं हे बन्सीला कळेना.

जवळच हारवाल्याच्या दुकानात साळुंके गुरुजी उभे होते. ते मिठाईवाल्याची दडपशाही पहात होते. गुरुजींनी बन्सीला बोलावलं. त्याच्या कानात काहीतरी खुसफुस केली. बन्सीचा चेहरा उजळून निघाला. आणि नवा डाव कसा रंगतोय हे पहात गुरुजी दूर उभे राहिले.

बन्सी मिठाईवाल्याजवळ गेला. क्षणाचाही विचार न करता त्यानं मिठाईवाल्याचा हात पकडला आणि स्वतःच्या कोपरीच्या खिशात घातला. मिठाईवाल्याचाच हातानं खिशातल्या नाण्यांचा खळखळाट केला. मिठाईवाल्याला हे सारं विचित्र वाटत होतं. तो पुरता गांगरून गेला होता. पण नाण्यांचा खळखळाट ऐकताच  मिठाईवाल्याचा चेहराही आनंदानं चमकून उठला. बन्सीला काहीच न देता त्याच्याकडून पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली.

क्षणभरानं बन्सीनं मिठाईवाल्याचा हात बाजूला काढला आणि मार्गाला लागला.

पुन्हा मागून मिठाईवाल्याचा आवाज आला, " अरे बन्सी, एवढ करून तू माझे पैसे न देताच निघालास की रे. "

" शेठजी, पण आत्ताच तुम्ही नाण्यांचा आवाज ऐकलय नव्हं ? " बन्सी गालातल्या गालात हसत म्हणाला. 

" अरे पण नाण्यांचा आवाज आइकला म्हणजे काय मला पैसे मिळाले का ? " बन्सी चालतच राहिला.

" शेटजी, मिठाईचा वास घेणं  हे जर मिठाई घेतल्यासारखं असल तर मंग पैशांचा खळखळाट ऐकणं हे पैसे घेतल्या सारखंच न्हाई का ? "

मिठाईवाल्याला कुणीतरी तोंडात मारल्यासारखं वाटत होतं. बन्सी मिठाई न घेताही खुशीत घरी निघाला होता. गुरुजी बन्सीकडे बघून डोळे मिचकावत होते.


No comments:

Post a Comment