Sunday, 30 March 2014

Indian Festival : गुढी का उभारतात ?

गुढी का उभारतात त्याची गोष्ट -

छोट्या मित्रांनो,

उदया पाडवा तुम्हाला गोड गाठी आणि पापा दयाला हवा ना! म्हणून आज वेळ काढला.

हं, तर मग उदया काय आहे?

" माहित नाही म्हणताय ? छे ! तुम्हाला माहित नसणं शक्यच नाही. खरंच माहित नाही कि माझ्याकडून वदवून घ्यायचय. "

" खरंच माहित नाही म्हणताय. ठीक आहे. मी सांगतो,  उदया आहे गुढी पाडवा."

" हे काय ? आत्ता कोण म्हणालं ,” पाडवा,पाडवा, नीट बोल गाढ़वा ?”असं म्हणु नये. आज आपल्या हिंदू नव वर्षाचा पहिला दिवस. मग असं वाईट कशाला बोलायचं.?


"पाडवा, पाडवा नीट बोल गाढ़वा."

असं म्हणण्यापेक्षा -


"पाडवा,पाडवा,प्रेम वाढवा
अभ्यासाचं तोरण आभाळात चढवा"

असं म्हणालात तर किती छान वाटेल नाही !

उदयाचा सन मजेत साजरा करा. सकाळी लवकर उठा. दात घासून अंघोळ करा. नवे कपडे घाला. बाबांनी गुढी उभारलेली असेल. तिला नमस्कार करा आणि तुमच्या यशाची गुढीसुद्धा उंच आभाळात पोहचावी म्हणून तिला प्रार्थना करा. गुढीला पुराण पोळीचा नैव्यदय दाखवला कि तुम्हीही पुरणपोळीवर येथेच्छ ताव मारा. हो पण परीक्षा सुरु असतील तेव्हा खुप खुप अभ्यास करा.

गुढी का उभारतात माहित आहे ?

यासंदर्भात खूप कथा आहेत. या पुढच्या प्रत्येक गुढी पाडव्याला मी तुम्हाला एक गोष्ट सांगत जाईन.

आजहि एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो.

ब्रम्हदेवानं पृथ्वी निर्माण केली ती देवाधीकांच्या वास्तव्यासाठी. पण तेव्हा पृथ्वीवर वृक्षवल्लरी नव्हत्या. पशूपक्षी नव्हते. समुद्रात नवरत्न नव्हती तर फक्त अमृत होतं. पायाखाली माती आणि डोक्यावर रणरणतं ऊन. देवांचं मन रमेना. मग देवांच्या करमणुकीसाठी ब्रम्हदेवानं जीवसृष्टी निर्माण करायची ठरवली. पण सुरवात कुठनं करायची ?  जीवसृष्टी निर्माण करायची असेल तर तिला हवा हवी. पण हवा कुठून आणायची ? मग ब्रम्हदेवानं वृक्षवल्लरी निर्माण करायच्या ठरवल्या. पण त्या तरी कशा निर्माण करायच्या ?

देव असला म्हणून काय झालं ! देवालाही प्रश्न पडतातच बरं का मित्रांनो.

तर आधी वृक्षवल्लरी निर्माण करायच्या ठरल्या. मग ब्रम्हदेवानं त्यांच्या उपरण्याला घट्ट पिळा घातला. त्याला माती लावली. आणि त्या उपरण्याच्या पिळ्यावर लावलेला चिखल वाळल्यावर त्याची एक चांगली चिखालकाठी तयार झाली. ब्रम्हदेवानं ती चिखालकाठी मातीत रोवली आणि त्या काठीच्या बुडाशी रोज अमृत घालत राहिले. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष गेली. त्या चिखालकाठीत काहीच फरक पडत नव्हता. पण ब्रम्हदेव थकले नाहीत. ते नित्यनियमानं त्या काठीच्या बुडाशी अमृत घालत राहिले. आणि एक दिवस प्रातःकाळी आपल्या कुटीतून बाहेर येऊन पहातात तो काय एका रात्रीत त्या चिखालकाठीचा एक विस्तारलेला वृक्ष झाला होता.

ब्रम्हदेवानं त्या वृक्षाच्या दोन फांद्या प्रत्येक देवाला दिल्या. एक आपल्या कुटी समोरच्या अंगणात रोवायला सांगितली आणि दुसरीला आपल्या निर्मितीचा आनंदोउत्सव म्हणून वस्त्र अलंकारांनी सुशोभित करून आपापल्या कुटीवर उभारायला सांगितली.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तिला गुढी का म्हणतात ?

तिला गुढी म्हणतात कारण, ब्रम्हदेवाचा वृक्षवल्लरी निर्मितीचा हा खटाटोप कुणालाच माहित नव्हता. ब्रम्हदेवाच्या कुटीसमोर एका रात्रीत हा वृक्ष कुठून आला हे गूढ कुणालाच उकलत नव्हतं. ब्रम्हदेवही कुणाला काही सांगत नव्हते. त्या काठीच्या निर्मितीचं गूढ कुणालाच उकललं नाही. म्हणून तिला नाव मिळालं " गुढी."

 तेव्हापासून आपण गुढी उभारतोय नवनिर्मितीचा आनंद साजरा करतोय. नवे संकल्प करतो आणि त्यांच्या परिपूर्तीसाठी प्रयत्न करतोय.


No comments:

Post a Comment