'सासूने तिजोरीच्या चाव्या सुनेच्या हातात द्याव्यात, पण स्वयंपाक घराचा ताबा सुनेकडे देऊ नये.' असं म्हणतात. शरद पवार तर तिजोरीच्या चाव्याही दुसऱ्याच्या ताब्यात देऊ इच्छित नाहीत. आणि स्वयंपाकघरात जाऊन
कासोटा खोचून वाटण वाटायला सुद्धा कायम तयार असतात. काहीही झालं तरी आपलं महत्व कमी होता कामा नये, अशीच शरद पवारांची भूमिका असते. गेल्या आठ नऊ महिन्यात तर तर महाराष्ट्रात ते ज्या रितीने रमले आहेत, ते पाहिल्यानंतर तर आपण राज्यसभेचे खासदार आहोत याचा त्यांना विसर पडला आहे कि काय अशी शंका येते.
दर चार सहा दिवसांनी मुख्यमंत्र्यांसोबत खाजगीत गुफ्तगू करायचं, दर आठवड्याला बैठका घ्यायच्या, नुरा मुलाखती घडवून आणायच्या. पत्रकार परिषदा घ्यायच्या. वृत्त वाहिन्यांना स्टेटमेंट द्यायचे. नव्या नवरीला प्रत्येक सणासुदीला नटण्याची फार हौस असते. नव्या नवरीचं ठीक आहे. पण सून आल्यानंतर आणि नातवंडं खेळण्याच्या वयात ती पायघोळ निऱ्या काढून मिरवू लागली तर कसं वाटेल? मिरवण्याचं दूर राहू द्या ती त्या निऱ्यात पाय अडकून पडली तर? चार दिवसापूर्वी जशी संजय राऊतांनी पवारांची मुलाखत घेतली होती तशीच नौटंकी मुलाखत दोन वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी घेतली होती. साहेबांची मुलाखत घेऊन राज ठाकरेंना स्वतःचा राजकीय उद्धार साधायचा होता. आणि या मुलाखतीतून आपण मोदींना टक्कर देऊ शकणारे एकमेव नेते आहोत अशी छबी पवारांना निर्माण करायची होती. देशव्यापी तिसरी आघाडी उघडून आपल्या पदरात पंतप्रधानपद पडतंय का हे पहायचं होतं. प्रत्यक्षात मात्र त्यातलं काहीही साध्य झालं नाही. ना मनसेचा राजकीय उद्धार झाला. ना पवारांना कोणी स्विकारलं.
'पेंद्या जर गोवर्धन करंगळीवर घेतो.' असं म्हणाला तर त्यावर कोण विश्वास ठेवेल? साहेबांचं तसंच झालं आहे. महाराष्ट्रात २० वर्षात स्वतःच्या पक्षाची स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही. स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री खुर्चीत बसवता आला नाही. ७१ आमदार हि विधानसभेतली सर्वच्च कामगिरी. आणि ९ खासदार हि लोकसभेतली झेप आणि बाता मात्र मोदींची सत्ता उलथून टाकण्याच्या. सूर्याला गिळण्याचं धाडस हनुमानाने करावं. वाली सुग्रीवाचं ते काम नाही. त्यांनी सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न देखील करू नये.
साहेब, मोदी पंधरा वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत. दुसऱ्यांना पंतप्रधान झाले आहेत. गुजरातचे मोदी वाराणसीत उभे राहतात. प्रचंड बहुमताने विजयी होतात. मोदी यूपीत गेले तर राहुल गांधीला तिथून पळ काढावा लागतो. मुस्लिम बहुल वायनाड गाठावे लागते. तुम्ही महाराष्ट्राबाहेर कुठेही निवडून येऊ शकत नाहीच, परंतु बारामती आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन निवडणूक लढवण्याचं धाडस तुम्ही करू शकणार नाही. 'मोदींची सत्ता उलथून टाकण्यासाठी मीच पुढाकार घेणार' हे तुमचं स्वप्नरंजन छान आहे. स्वप्नं पहायला कोण हरकत घेणार. तुम्ही काय बोलावं हा तुमचा प्रश्न आहे. परंतु तुमची झेप किती हे महाराष्ट्रतल्या जनतेला चांगलं माहित आहे.
👍👍🌹🙏
ReplyDeleteमनपूर्वक धन्यवाद
Delete