Friday 17 July 2020

गुण, गुणवत्ता आणि खिरापत

cartoon by vijay shendge

काल बारावीचा रिझल्ट लागला. आणि आपापल्या पाल्यांना मिळालेले यश सांगणाऱ्या, त्यांच्या टक्केवारीचे आकडे मांडणाऱ्या अनेक पोस्ट पडल्या. प्रत्येक पोस्टवर त्या मुलांचं कौतुक करणाऱ्या लाईक, कॉमेंटचा खच
पडला. पोस्ट लिहणारे धन्य झाले. लाईक कॉमेंट करणाऱ्यांनाही आपण पाठीवर कौतुकाची थाप दिल्याचा अनुभव घेता आला. परंतु गुण म्हणजे गुणवत्ता का हो? असं विचारून मला त्या मुलांच्या यशाला गालबोट लावायचं नाही. पण खरंच कुठून येतात एवढे गुण? CBS बोर्डाच्या एका मुलाला तर ६०० पैकी ६०० मार्क मिळाल्याची बातमी वाचली आहे. कसं काय? शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा वाढल्याचं  दाखवायचं आहे म्हणून मार्क खिरापतीसारखे वाटले तर जात नाहीत ना?   

एकेकाळी वर्तमानपत्रात गुणवत्ता यादी प्रसिद्ध व्हायची. आणि ९८ टक्केचा पहिला असायचा. पहिल्या ५१ मुलांची गुणवत्ता ९८ टक्क्यांपासून पासून घसरत ८८ टक्क्यांवर आलेली असायची. आणि आता १०० ते ९५ टक्के यातच दीडशे दोनशे मुलं असतात. कसं काय? खरंच मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास झाला आहे कि गुण देताना हात सैल सोडले जात आहेत? हि मुलं डिग्री घेऊन बाहेर पडतात तेव्हा त्यांचं पितळ उघडं पडत. खरंच ९० टक्के मुलांना फारसं काही येत नसतं. बरं वाढीव टक्केवारी फक्त दहावी बारावीचे विद्यार्थीच मिळवत आहेत असं नाही. इंजिनिअरिंगच्या मुलांची टक्केवारी पाहिली तरी असंच चित्र आहे. एकेकाळी इंजिनिअरिंगला डिस्टिंगशन मिळवणं फार कठीण असायचं. आणि आता तिथेही ८५ ते ९० टक्के मिळवणं फारसं कठीण राहिलेलं नाही. 

माझ्या अगदी जवळच्या मित्राच्या मुलाचं उदाहरण देतो. चार वर्षात या मुलाने कधी पेन हातात घेतला नाही. चार शब्द लिहिले नाहीत. कधी कुठले एक्झाम्पल सोडवले नाहीत. कधी कुठले फॉर्म्युले पाठ केले नाहीत. कधी लेक्चर अटेंड केले नाहीत. रफ वर्कसाठी कागद आणले नाहीत. कधी पेन खरेदी केलं नाही. जवळ पेन नाही म्हणून परीक्षेला जाताना ५ रुपयाचा बॉलपेन खरेदी करून परीक्षेला जाणारा हा मुलगा. थोडे थिडके नाही ७६ टक्के मार्क मिळवतो. त्याच्या बुध्दीमत्तेविषयी मला शंका नाही. परंतु फारसा अभ्यास न करता एवढे गुण? 

मला वाटतं पुढाऱ्यांनी शिक्षणाचं जे खाजगीकरण केलं आहे त्याला गळती लागू नये. कॉलेजात गेलं कि डिग्री मिळतेच. म्हणून मुलांनी शाळा कॉलेजात यावं. लाखो रुपये फि भरावी आणि डिग्रीचा गुंडाळा हातात घेऊन बाहेर पडावं. यासाठी हा सगळा परीक्षेचा डोलारा उभा केला आहे असं वाटतं. डिग्री घेऊन तुम्ही सुक्षिक्षित बेकार म्हणून फिरताय, कि पाच दहा हजारावर काम करताय याच्याशी कुणाला काही देणं घेणं नाही. आठवीपर्यंत मुलं नापास करायची नाहीत असा फतवा काढला जातो. ( पालकही खुश, मुलंही खुश.) त्यासाठी नापास झालेली मुलं आत्महत्या करतात असा बागुलबुवा उभा केला जातो, अंतर्गत २० मार्कांचा बोनस दिला जातो. कितीही ढ मुलगा असू द्या. २० पैकी १५ मार्क दिले जातातच. २० पैकी २० तर अनेकांना दिले जातात. मग पासिंगसाठी ८० पैकी अवघे १५ ते २० मार्क तर मिळवायचे असतात. बरं आमची मुलं कॉलेजात किती बसतात? क्लासला किती जातात? हे आम्हाला चांगलं माहित आहे. 

एका देशात HSC, CBSE, ICSE, IB  असे चार चार बोर्ड का? CBSE च्या अभ्यासक्रमात ५ विषय का? CBS ला ५ विषय आहेत म्हणून आमचं HSC बोर्ड परीक्षा ६ विषयांची घेतं, पण बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणत टक्केवारी मात्र ५ विषयांची देतं. असं का?  हेतू एकचं, नेत्यांनी ज्या भरमसाठ खाजगी शिक्षण संस्था उभारल्या आहेत त्याला कच्च्या मालाचा पुरवठा झाला पाहिजे. बाहेर पडणारा माल कच्चा, कि पक्का हे पालकांनाच नव्हे तर ब्रम्हदेवाला सुद्धा सांगता येणार नाही.   

No comments:

Post a Comment