वर्षभराच्या मुलाला घेऊन चालणारा पुरुष आणि त्याच्यासोबत पर्स सांभाळत चालणारी बायको. बाईकवर नवऱ्याला खेटून बसलेली बायको आणि पेट्रोलच्या टाकीवर समोरून येणाऱ्या हवेच्या झोताला तोंड देणारं मुलं, हे
चित्र नवीन नाही. अनेकदा गाडीवर मुल दोघांच्या मध्ये उभं असलेलं दिसतं. पुरुषाने मुलाला घेऊ नये असं मी मुळीच म्हणत नाही. परंतु स्त्रियांना मुलं कडेवर घेता येत नाहीत. गाडीवर बसल्यावर मांडीवर घेता येत नाही हे वास्तव आहे.
आजकालच्या आज्यांना तान्ह्या बाळाला साधी अंघोळ घालता येत. बाळाला अंघोळ घालायला बाहेरची बाई लावावी लागते. आईला 'गाई, गाई' करून बाळाला निजवता येत नाही, मांडीवर घेऊन जोजवता येत? अंगाई बिंगाई फार लांबची गोष्ट. राजा राणीची गोष्ट नाहीच नाही. यु ट्यूबवर एखादं गं लावून देतील. मग मुलांवर संस्कार होणार कसे? आजकाल सगळं लक्ष माझी ओढणी नीट आहे का? माझा लूक खराब होणार नाही ना? यावर. स्त्रीच्या मनातल्या ममत्वाला ओहोटी लागली आहे कि काय? असा प्रश्न पडतो.
लिहायचा विषय हा नाहीच. वडील गेल्यापासून गेली आठ दहा वर्ष मी शेती पाहतो आहे. गावाकडचा गहू दरवर्षी पुण्यात घेऊन येतो. परिचितांना विकतो. व्यापाऱ्याकडे गहू विकण्यापेक्षा असा विकला तर किलोमागे दोन चार रुपये जास्त मिळतात. हमाली, आडत यात होणार नुकसान टाळता येतं. दरवर्षी गहू घेणारे ठरलेले असतात. मी गावावरून गहू घेऊन येतो आणि ज्याच्या त्याच्या घरी पोहच करतो. सात वर्षात कोणी काही तक्रार केली नाही.
परंतु यावर्षी 'मला तुमचा गहू हवा आहे' असे एका परिचित स्त्रीने माझ्या पत्नीला सांगितलं. गहू आणला तिच्या घरी पोहच केला. दोन दिवसांनी तिने पोतं उघडलं. म्हणाली, "तुमच्या गव्हात कचरा खूप आहे. तो परत घेऊन जा." इतर कोणी तक्रार केली नाही. वाटले हि बाई स्वतःला काय समजते? हिच्या घरी गहू पोहच करायचा. आणि हिला पसंत नाही म्हणून आपला आपण उचलून घेऊन जायचा. हि कुठली रीत? डोकं जाम गरम झालं होतं.
त्याच वेळी गावाकडेही काही मंडळींना त्याच भावात गहू दिला होता. भेट झाल्यावर त्यातल्या एकाला विचारलं, "भापकर साहेब गहू बरा आहे ना?"
त्यावर ते म्हणाले, "बरा कशाने? चांगला आहे कि."
"नाही हो, आमच्या पुण्यातल्या एका बाईने काड्याकुड्या खूप आहेत, अशी तक्रार केली आहे."
त्यावर भापकर म्हणाले, "साहेब, या शहरातल्या बायकांचं कसं आहे? पाचच्या तिथे दहा रुपये जास्त जाऊ द्या. पण निवडायचा कुटाणा नको. गहू आणला कि डब्यात ओतून गिरणीत नेता यायला हवा. परंतु दुकानातला गहू आणि शेतातला गहू यातला फरक त्यांना कसा कळणार? त्यांना माहित आहे का दुकानातून घेतलेल्या गव्हाला पॉलिश केलेले असते. चकाकी यावी म्हणून औषध चोळलेले असते."
"ते तर आहेच. त्याशिवाय सूप घेऊन निवडायला, पाखडायला, घोळायला येतंय कुणाला. अलीकडे तर कित्येक बायका केवळ पंचमीच्या खेळात सूप हातात धरत असतील. तेवढाच त्यांचा आणि सुपाचा संबंध." मी म्हणालो.
आता यावर कोणी म्हणेल, "बायकांच्या मागे किती कामं असतात, त्याची तुम्हाला जाणीव नाही."
हि अवस्था फक्त नौकरी करणाऱ्या बायकांची आहे असे नव्हे. घरी असणाऱ्या बायकाही दळण कांडण करत नाहीत. शेवया, कुरडया, पापड, लोणची, मिरची मसाला या गोष्टी करणाऱ्या स्त्रिया सापडणं दुर्मिळ. बऱ्याच घरात तर दिवाळीचा फराळही बाहेरून आणला जातो. आल्या गेल्यासाठी नाष्ट्यासाठी काही करत बसण्यापेक्षा बिस्किटं अथवा असंच काही दुकानातून आणलेलं पुढ्यात सरकवलं जातं. त्यात स्त्री पुरुष समानतेसाठी लढणारे, "मुलांचे डायपर बदलण्याचा मक्ता काही केवळ स्त्रियांनीच घेतलेला नाही..... पुरुषांनी सुद्धा डायपर बदलायला हवेत....... भांडी घासायला हवीत...... भाजी निवडून द्यायला हवी....... आठवड्यातून एक दिवस घरातल्या स्त्रीला सुट्टी देऊन, घरातली कामं घरातल्या इतर सभासदांनी करायला हवीत." असं म्हणतात. असं करायला काहीही हरकत नाही. परंतु असं करून नेमकं काय साधलं जाईल? हे सांगेल का कोणी.
Its true
ReplyDeleteधन्यवाद.
Delete