परवा माझ्याकडे एक व्हिडीओ आला होता. कोणा स्टेज शो करणाऱ्या तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरून शाब्दिक कोटी करण्याचा प्रयत्न केला होता. काही शिववादी तरुणांनी त्याचा शोध घेऊन त्याला मार दिला. व्हिडीओ बनवून व्हायरल केला. त्या व्हिडिओची टॅगलाईन होती, 'नडला तर तोडला.' यातून समाजात काय संदेश पोहचला? केवळ मराठा समाजाला शिवाजी महाराजांच्या विषयी आदर आहे का? छत्रपती शिवाजी महाराज हि कोणाची खाजगी मालमत्ता नाही. परंतु तुम्ही छत्रपतींचा जयजयकार केला तर तुम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. नाही तर नाही. असे वातावरण निर्माण केले गेले आहे.
व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली. काय चुकलं त्यांचं? ते विधानसभेचं सभागृह नाही. राज्यसभेचं सभागृह आहे. तिथे आज तुम्ही शिवरायांचा जयघोष कराल. उद्या दुसरा महाराणा प्रतापांचा जयघोष करेल, कोणी बसवेश्वरांचा जयघोष करेल कसं चालेल हे? संजय राऊत यांनी उदयनराजेंना छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागितले होते. त्यांचं कोणी काय वाकडं केलं? का नाही कोणी संजय राऊतांची कॉलर पकडली? का नाही त्यांना टोले टाकले? का नाही त्यांची गाडी अडवली? सामनामध्ये मराठा समाज काम करत नाही का? का नाही त्यांनी काम बंद आंदोलन केलं? साहेबांच्या बरोबर आहेत ना मग सगळं. माफ असे आहे का?
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, त्यांना आदर्श मानून शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेतलं 'शिव' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांमधलंच 'शिव' आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही. शिवाजी महाराजांचा मावळा म्हणूनच मराठी तरुण मोठ्या प्रमाणात शिवसेनेत दाखल झाला. शिवाजीतला 'शिव' आणि हिंदुत्वाच्या भगव्याने मराठी तरुणांना भुरळ घातली. बघता बघता शिवसेना फोफावली. ८० % समाजकारण आणि २० % राजकारण म्हणता म्हणता शिवसेनेनं समाजकारण फेकून दिले, हिंदुत्वाला मूठमाती दिली आणि फक्त राजकारण करण्याचा निर्णय घेतला.
मला आठवतं आहे अगदी सुरुवातीला शिवसेनेनं झुणका भाकर केंद्रे सुरु केली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. परंतु या झुणकाभाकर केंद्रांच्या नावात, शिव नव्हते. परंतु 'शिव' वडा म्हणत शिवसेनेने वडापाव जनतेसमोर आणला आहे, जेवणाच्या थाळीला 'शिव' थाळी म्हटलं हे कितपत योग्य आहे. यात छत्रपतींच्या प्रतिमेचा, कर्तृत्वाचा अपमान झाला आहे असं कोणालाही वाटले नाही? 'शिवसेना' हे नाव नक्कीच आक्षेपार्ह्य नाही. परंतु शिववाडा आणि शिवथाळी? हे माझ्या तरी बुद्धीला पटलं नाही.
छत्रपती शिवाजी महाराज इतिहास पुरुष आहेत. ते राष्ट्रीय पुरुष आहेत. इंदिरा वडा, राजीव थाळी असे म्हणत त्यांच्या नावाचा कोणी बाजार मांडला नाही. मग वड्यात आणि थाळीत 'शिव' कसं चालू शकेल? वड्यात जोशी चालतील, रोहित चालेल. पण वड्यात 'शिव'? उद्या एखाद्याने महाराजांच्या नावाने वाईन शॉप सुरु केलं तर चालेल का?
शिवसेना जनतेच्या मुखी रहावी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वडापावच्या गाड्या सुरु करता याव्यात म्हणून शिववडा सुरु केला. 'शिववडा' हे नाव वडापावच्या गाड्यांवर पाहिलं कि कारवाई करण्याची कोणीही हिंमत होऊ नये म्हणून शिव वडा. परंतु वड्यात आणि जेवणाच्या थाळीत छत्रपतींचं नाव आणणं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाला काळिमा फासण्यासारखं नाही का? इतरांचं जाऊ द्या हो पण छत्रपतींना दैवत मानतात त्यांना शिव वडा आणि शिव थाळी कशी चालते?
No comments:
Post a Comment