Thursday 16 July 2020

खुळखुळा, मोबाईल आणि कान किटवणारे शब्द

cartoon by vijay shendge

परवाच्या माझ्या 'शेतातला गहू आणि शहरातल्या बायका ..... ' या पोस्टवर फार मोजक्या महिलांच्या प्रतिक्रिया मिळाल्या. हि पोस्ट वाचूनदेखील अनेक महिला तिच्याकडे दुर्लक्ष करतील याची मला जाणीव होती. राजकीय पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल करणारे माझे मित्र, सामाजिक पोस्ट मात्र शेअर करत नाहीत. असं का?
राजकारण हा आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. परंतु आमची पिढी कशी घडणार, हे अधिक महत्वाचं नाही का? मुळात आपण काय वाचतो आणि आपल्या पुढल्या पिढीला काय वाचायला देतो हे अधिक महत्वाचं आहे. असं माझं ठाम मत आहे.

त्यामुळे कान किटवणारे शब्द वापरून लिहिणं मला शक्य नाही. अत्यंत गलिच्छ शब्द वापरून पोस्ट करणारी, कॉमेंट देणारी मंडळी मी पाहतो तेव्हा वाईट वाटते. हि मंडळी माझी पोस्ट माझी मुलं, माझे भाऊ, माझी बहीण, इतर परिचित वाचतील तेव्हा माझ्याविषयी काय समज करून घेतील, असा विचार करत नसतील का? अपशब्द वापरणाऱ्या ५० हुन अधिक लोकांना मी ब्लॉक केलं आहे. मला त्यांच्या अपशब्दांची भीती वाटत नाही, परंतु इतरांच्या डोळ्यासमोर ते शब्द येऊ नयेत यासाठी माझ्याकडे तेवढाच एक पर्याय उरलेला असतो.      

अनेक मित्र माझी कादंबरी कधी येते, याची वाट बघत आहेत. अनेकांनी मेसेज करून तसं सांगितलं आहे. काही मित्रांनी कॉमेंटमध्ये तसं नमूद केलं आहे. हे पाहून एका मित्राने प्री बुकिंगची कल्पना मांडली. परंतु पुस्तक प्रकाशित झाल्याशिवाय पैसे घेणं मला योग्य वाटत नाही. शिवाय हा लॉक डाऊनचा पिरिअड. प्रेस पुरेशा वेगात सुरु नाही, कागद वेळेत उपलब्ध होईल याची शाश्वती नाही. एक ना अनेक अडचणी. अशावेळी दोन महिन्यात पुस्तक मिळेल असं सांगून चार महिने लागले तर? म्हणून मी मित्राचा सल्ला अजिबात मनावर घेतला नाही. पण मित्रांनो जेव्हा माझं पुस्तक येईल तेव्हा ते तुम्हाला निराश करणार नाही एवढी खात्री मात्र नक्की देतो. 

मी जे लेखन करतो आहे ते तरुण पिढीसाठी. आपल्या संस्कृतीचा, संस्काराचा विसर पडलेल्या या पिढीला चार गोष्टी सांगणं हाच माझ्या लेखनाचा हेतू. परंतु या पंचविशीतल्या पिढीपर्यंत माझं लेखन पोहोचतं कि नाही? त्या पिढीला त्यावर विचार करावासा वाटतो कि नाही? कि त्यांना हे लेखन बुरसटलेल्या विचारसरणीचं  वाटतं कोणास ठाऊक? नदीने वहात रहावं. समुद्राला मिळावं. कोण तिच्यात पापे धुतो आणि कोण तिची ओटी भरते याचा विचार नदीने करू नये, अशा मताचा मी आहे. परंतु आपला उगम शुद्ध, पवित्र आहे याची खात्री नदीला असायला हवी आणि आपण अत्यंत दर्जेदार, संस्कारक्षम लिहितो आहोत याची खात्री लेखकाला असायला हवी. 

मी सहा सात वर्षांपासून फेसबुकवर आहे. खऱ्या अर्थाने अक्टिव्ह मात्र अलीकडच्या दोन वर्षात आहे. मी अनेक कवींच्या कवितांवर टीका केली. अनेकांना शाब्दिक जोडे मारले. खणखणीत लेख लिहिले. झालं काय अनेक कविमित्रांनी मला वाळीत टाकलं. इथे बहुतेकांची भूमिका 'द्या टाळी आणि घ्या टाळी' अशीच आहे. परंतु यात असेही अनेकजण आहेत जे लेखक विचारवंत असल्याचा आव आणत नाहीत. लाईक कॉमेंटची पर्वा करत नाही. मी नामोल्लेख करत नाही. परंतु माझ्या पोस्ट नियमित शेअर करणारी पन्नास एक मंडळी केवळ त्यांना आवडणाऱ्या पोस्ट शेअर करतात.   

मी कितीतरी पुस्तकं वाचून मोठा झालो आहे. चांदोबा तर वाचायला मिळायचाच, परंतु राजकुमार आणि सात बुटके, म्हातारी चेटकीण आणि जादूची छडी, जलपरी आणि राजकुमार अशी कितीतरी पुस्तके मी लहानपणी ( वय वर्ष १० च्या आत ) वाचली आहेत. दहावीच्या आत छावा, मृत्युंजय, श्रीमान योगी, अशा पाचपाचशे पानांच्या कादंबऱ्यांची पारायणं केली आहेत. पदवी पदरात पडण्याच्या आत पुल देशपांडे, जयवंत दळवी, विस खांडेकर, श्रीना पेंडसे अशा लेखकांच्या पुस्तकांशी मैत्री केली आहे. 

अलीकडची पिढी मात्र वाचत नाही. इथं फेसबुकवर जो क्राउड आहे त्यापैकी ८० % चाळीशीच्या पुढचा आहे. चाळीशीच्या आतली मंडळी कुठे आहेत? ते वाचतात का? वाचत असतील तर काय वाचतात? ते वाचन त्यांना काय देतं? हे अधिक महत्वाचं आहे. वाचनाशिवाय तरणोपाय नाही. त्यामुळेच तरुणाईने वाचायला हवं. पण हि वाचनाची सवय पंचविशीत लागत नाही. वाचनाची सवय लागावी म्हणून तान्ह्या बाळासमोर मोबाईल न ठेवता खुळखुळा ठेवावा लागतो. आणि त्याला टिव्हीसमोर न बसवता त्याच्या पुढ्यात पुस्तकं मांडावी लागतात. तरुणाईने वाचायला हवे. तसे झाले नाही तर भविष्य भयंकर आहे हे नक्की. 

No comments:

Post a Comment