Tuesday 14 July 2020

पुनःश्च हरी ओम नव्हे......

cartoon by vijay shendge


कोरोना अगदी माझ्या घरात आला होता. अगदी जवळच्या मित्राच्या घरातले पाचजण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले. पण त्याविषयी काय लिहायचे. म्हणून मी एक शब्द लिहिला नाही. कोरोना आमच्या घरात आला याचे दुःख नाहीच. परंतु '३१ मेच्या आत महाराष्ट्र ग्रीन झोन मध्ये आला पाहिजे, आणि आपण तो आणणारच' असे म्हणणारे
मुख्यमंत्री आता जुलै उलटत आला तरी कोरोनावर नियंत्रण आणू शकले नाहीत. महाराष्ट्रात रोज सरासरी ६ हजार कोरोना रुग्ण सापडत असताना धारावी नियंत्रणात आली म्हणून तुमचे कौतुक सोहळे सुरु झालेत. श्रेयवादाची लढाई सुरु झाली. 'होय, होते संघाचे स्वयंसेवकांचे आमच्यासोबत.' एवढे जरी तुम्ही म्हणाला असतात ना तरी खूप झाले असते. परंतु जेव्हा तुम्ही आणि तुमचे भडभुंजे त्यांचं अस्तित्व नाकारतात, तेव्हा तुमचा मानसिक कोतेपणा दिसून येतो.

'एक मराठा, लाख मराठा' म्हणत आरक्षणासाठी लाखोंचा मोर्चा काढणारे या लढ्यात कुठे उतरलेले दिसले नाहीत. खळखट्याक करण्यासाठी रस्त्यावर उतरणारे राज साहेबांचे सैनिक कुठे दिसले काम करताना दिसले नाहीत. प्रकाश आंबेडकरांची भीमसेना कुठे होती कोणास ठाऊक? आणि शिवसैनिकांचे तर विचारायलाच नको. तुम्हीही घरात आणि तेही घरात? संघाला तुम्ही कितीही जातीयवादी ठरवले असले तरी संघाला जात नाही बरं का? संघात मराठा आहेत, दलित आहेत, वाणी आहेत आणि तेलीही आहेत आणि ब्राम्हण सुद्धा आहेत.

परंतु काम करते ती केवळ शिवसेना आणि जनतेत उतरतात ते केवळ शिवसैनिक असा भ्रम तुम्हाला झाला आहे. जनतेच्या मानेवर पाय देऊन तुम्हीही सत्ता ताब्यात घेतली आहे. हरकत नाही. एका जत्रेने देव म्हातारा येत नाही. आज नाही उद्या जनतेचा दिवस येणार आहे. असो. तर महाराष्ट्र कोरोना मुक्त करायला तुम्हाला जमले नाहीच परंतु 'पुनःश्च हरी ओम' म्हणत तुम्ही लॉक डाऊन उठवण्याची फुकाची घाई केलीत. आणि अवघ्या दिड महिन्यात 'पुनःश्च हरी होम' म्हणत जनतेवर घरात बसण्याची वेळ आली. 

घरात बसण्याचे दुःख नाही साहेब. पण तुमच्या प्रमाणे, भ्रष्टाचार हा जनतेच्या घरात पैसा येण्याचा मार्ग नव्हे. पैशासाठी आणि रोजीरोटीसाठी जनतेला घराबाहेर पडावे लागते, कष्ट करावे लागतात. घाम गाळावा लागतो हो. तुमचे आपले बरे आहे, 'जनतेचा घाम, तुमचा आराम.' उद्योग बंद असताना जनतेने पगाराची अपेक्षा कशी करायची आणि उत्पादन बंद असताना, विक्री होत नसताना उद्योजकांनी पगार तरी कसा द्यायचा? राज्य चालू असले काय आणि बंद असले काय, दुष्काळ पडला काय आणि सुकाळ आला काय, रोगराई आली काय आणि न आली काय, तुमचे उत्पन्न सुरूच असते. पण जनतेचे तसे नाही हो. 

अहो. रोजगार बंद असताना, कंपन्या बंद असताना, पगार तुम्ही कमीत कमी चार सहा महिन्याचे वीजबिल माफ तरी करायचे होते. वीजमाफी तर दूर राहो, परंतु तुम्ही वाढीव दराने वीजबिले दिली. पाच वर्ष सत्तेत राहिलात तर बाकी काही करू नका, पण तूर्तास महाराष्ट्र कोरोनमुक्त करा ( गुजरातमध्ये आग लागू द्या. आपल्याला काहीही घेणेदेणे नाही.), महाराष्ट्रातली कोरोना रुग्ण संख्या शुन्यावर येत नाही तोवर शाळा सुरु करू नका, तसेच फी सुद्धा आकारू नका. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार केले तरी बिल लाखाच्या आत असेल एवढी काळजी घ्या. 

कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आलेली नव्हती, मृत्युदर आटोक्यात आलेला नव्हता, रिकव्हरी रेट सुधारलेला नव्हता, तरी तुम्ही कशाच्या बळावर, 'पुनःश्च  हरी ओम' म्हणाला होतात माहित नाही. परंतु तुमच्या अपयशामुळे आणि चुकीच्या निर्णयामुळे आम्हाला मात्र पुनःश्च हरी होम करण्याची वेळ आली एवढे मात्र खरे.पुन्हा असे होऊ नये एवढेच. 

No comments:

Post a Comment