Thursday, 23 July 2020

सलोनी, यु आर ग्रेट?

image by vijay shendge

सलोनी, आपलं माणूस मरणाच्या दाढेतून परत येतं तेव्हा आनंद होतोच. अशा वेळी त्याला डोळे भरून पहावं. त्याच्यावर डोळ्यातल्या पाण्याचा अभिषेक करावा. त्याला तांब्याभर पाणी द्यावं. त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवून माया करावी. त्याला गच्च मिठीत घ्यावं अशी पद्धत होती. आजवर कॅन्सरचे पेशंट बरे होऊन घरी आले तेव्हा कोणी फुलं उधळल्याचं ऐकिवात नाही. पण अलीकडे हि फुलं उधळण्याची रित आली आहे. सोम्या उधळतो म्हणून गोम्या उधळतो. यमी नाचते म्हणून पमी नाचते. 

पण सलोनी खरंच ग्रेट नाचली आहेस तू. टाईमिंग सुद्धा काय मस्त साधलस! छानच वाटलं पाहून. तुझा आदर्श घेऊन आता रस्तोरस्ती असे नाचे आणि नाच्या दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको. सलोनी मला सांग कसं प्लॅनिंग केलं होतं? म्युझिक कोणतं निवडायचं. स्टाईल कोणती ठेवायची. सगळं आधीच ठरवलं होतं का? आई बाबांची परवानगी घेतली होती का? आणि भाऊ. तो तर सामील होता असं दिसत होतं. बँक स्टेजला आवाज येत होता त्याचा. पण छान वाटलं. समाजाला दिशा दिलीस तू. आणि तुझं कर्तृत्व किती थोर होतं याची तुला कल्पना आली असेलच! अगं चक्क मीडियाने दखल घेतली तुझी. मीडियाचं तसं फार काही विशेष वाटतं नाही. ते नेहमी सवंग गोष्टीच दाखवत असतात. ( सवंग म्हणालो का मी.... सॉरी.... सॉरी.)

हा! तर, मीडियाने तर तुझी दखल घेतलीच. पण यशोमती ठाकूर या मंत्रीणबाईंनी सुद्धा तुला फोन केला. काय भारी वाटलं असेल ना तुला. आमचे नेतेसुद्धा किती जनताभिमुख? हेही ठळकने दिसून आलं. आणि सगळ्याचं टायमिंग किती ग्रेट. तू नाचतेस काय, तुझा व्हिडीओ त्यांच्यापर्यंत पोहचतो काय, त्या तुझा फोन नंबर हुडकून काढतात काय. तुला फोन काय करतात. आणि लगेच हि बातमी मीडियापर्यंत पोहचते काय. काय वेळ साधली सगळ्यांनी. ग्रेट. मीडियाने तुमचा फोन टॅप केला होता कि तुमच्यापैकी कोणी मीडियाला कळवलं होतं? असो. काही असो. पण तुमच्या कुटुंबाने, यशोमती ठाकुरांनी, मीडियाने समाजासमोर एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे.

घरातलं माणूस बरं होऊन आल्यानंतर एवढं. तर तुझं लग्न असेल तेव्हा काय होईल. मला वाटतं तेव्हाही तू अशीच नाचशील. उपस्थित व्हराडी तुझ्यावरून अक्षता ओवाळून टाकण्याऐवजी नोटा उधळतील. मीडिया पिपाणी आणि ताशा लाजवेल. आणि तुला मुलं होतील तेव्हा.... तेव्हा तर काय एखादी मंत्रीणबाई बाळाची बाळुती धुवायला महिनाभर तुझ्या घरी मुक्कामच ठोकेल बहुदा.     

हा लेख व्हायरल होऊन त्या सलोनीपर्यंत पोहचला तर मला मनापासूनआनंद वाटेल. पण त्यापेक्षा समाजाने यातून काही बोध घेतला तर अधिक आनंद होईल.

भाजप राजकीय किड दूर करते आहे. परंतु सामाजिक किड कोणी तरी दूर करायला हवी ना. त्यासाठी मला असे लेख लिहिण्याची गरज वाटते. कुणाला मी कर्मठ वाटेल. परंतु संस्काराची जोपासना करणं हा कर्मठपणा असेल तर, होय आहे मी कर्मठ. 

No comments:

Post a Comment