Saturday 4 July 2020

साहेब, तुमची पुण्याई किती?

cartoon by vijay shedge

साहेब 'आमची तयारी आहे कोरोना सोबत जगायची, पण कोरोनाची आमच्या सोबत जगायची तयारी आहे का?' असं म्हणत आपण चक्क कोरोनाला धमकावलं  होतं. परंतु कोरोना काही आपल्या धमकीला घाबरला नाही.
आणि त्याने महाराष्ट्रातल्या जनतेची पाठ काही सोडली नाही. बहुधा तो तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय गप्प बसेल असे दिसत नाही. तुम्ही असेही म्हणाला होतात कि, 'एखाद्याच्या घरी कोरोना पोहचायच्या आधी योग्य आम्ही तिथे औषोधोपचार पोहचवणार आहोत.' परंतु तसेही झाल्याचे दिसत नाही. तुम्हाला हुलकावणी देऊन कोरोनाच लोकांच्या घरात आधी पोहचायचा.

एवढं सगळं होत असताना आपण मागच्या दाराने आमदार झालात. मुख्यमंत्री झालात. आणि देशातले क्रमांक एकचे मुख्यमंत्री अशी बातमी पसरविण्यात सुद्धा यशस्वी झालात. विठ्ठलाच्या मनात काय आहे हे तर तुम्हाला कधीही कळणार नाही, पण जरा जनतेच्या मनात डोकावून बघा. जनतेच्या मनातला आक्रोश तुम्हाला दिसून येईल. १५१ प्लस चा नारा देत २०१४ ला आपण भाजपला फसवलं. आणि २०१९ ला तर 'काही झालं तरी चालेल पण आपण मुख्यमंत्री व्हायचंच हा' आपला पण तडीस नेलात. त्यासाठी मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला. भामट्यांशी संग केला.  

तुमचं हे वागणं जनतेला रुचलेलं नाही. तर विठ्ठलाला कसं रुचेल? पांडुरंगाच्या पूजेच्या मान पुन्हा मिळणार नाही याची तुम्हालाही खात्री असावी म्हणून राज्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना आपण पंढरपूर गाठलं. सगळ्या वारकऱ्यांनी घरात बसून पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेतलात. आपण मात्र सगळे नियम धाब्यावर बसवून पंढरपुरात पोचलात. पूजेचे सोपस्कार केले. टीव्हीवर दिसलात. वर्तमानपत्रात फोटो झळकले. पण देवाच्या गाभाऱ्यात गेल्यावर जी प्रसन्नता माणसाच्या चेहऱ्यावर दिसते ना ती आपल्या चेहऱ्यावर कुठेच दिसली नाही. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचे भाव शोकसभेला उपस्थित असल्यासारखे होते. 

दोन महिन्यायुर्वी तुम्ही महाराष्ट्र जगाला दिशा दाखवेल असं म्हणत होतात. ३१ मेच्या पर्यंत महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार करणार होतात. कोरोनाला आपण हरवणार होतो.आपण जिंकणार होतो. मग काय झालं? जनतेचं काय चुकलं. मुळात कोरोना निर्मूलनासाठी शासन आणि प्रशासन काही करतंय असं दिसत नाही. भ्रष्टाचार होतोय या विषयी जनता उघडपणे बोलते आहे. तसे व्हिडीओ पोस्ट व्हायरल होत आहेत. तशा पोस्ट लिहिल्या जात आहेत. असे असताना आपण विठ्ठलाला साकडं घालता? त्याला चमत्कार दाखवण्याचं आव्हान करता? 

साहेब पांडुरंगाने जनाईचं दळण दळलं, गोऱ्या कुंभारासाठी चिखल तुडवला, सावत्याच्या शेतात राबला, चोखोबांच्या पत्नीची प्रसूती केली, तिचे विटाळाचे कपडे धुतले. पण पांडुरंग तुम्हाला का चमत्कार दाखवेल? देवाच्या देवत्वाचा अनुभव येण्यासाठी जी पुण्याई गाठीला असावी लागते ती पुण्याई तुमच्या गाठीला आहे? देवाप्रती जो भक्तिभाव मनात असावा लागतो पांडुरंगाविषयी तो भक्तिभाव तुमच्या मनात आहे? उगाच कोरोनाचा संसर्ग व्हायला नको म्हणून तुम्ही बुक्का कपाळी लावून घेतला नाहीत. तुळशीहार गळ्यात घातला नाही. सत्तेसाठी तुम्ही मित्राला फसवलं.मुख्यमंत्री होण्यासाठी शत्रूच्या गळ्यात गळा घातलात. आणि आता तुमचं कर्तृत्व उघडं पडल्यावर माउलींना वेठीला धरताय. कोरोनाचा नायनाट कर म्हणून त्यांना साकडं घालताय. कोरोना तर जाईलच साहेब परंतु तो तुम्ही साकडं घातलं म्हणून नव्हे. तर वारकऱ्यांच्या मनातला भक्तिभाव बघून. 

No comments:

Post a Comment