मा. उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह नमस्कार.
तुम्ही मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्राचे नागरिक आहात. हिंदू आहात त्यामुळे तुमचा आदर राखणे मी माझे कर्तव्य समजतो. आणि केवळ
या कर्तव्य भावनेतूनच मी आपणास नमस्कार केला आहे. याउपर जनतेने आपला आदर राखावा असे आपण काय केले आहे हे आपणास तरी सांगता येईल काय? कोरोनाग्रस्तांचे रिपोर्ट रुग्णांना द्यायचे नाही, हा आपला निर्णय. हा कसला हो निर्णय? यात जनतेचे हित कसे? तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणून काहीही निर्णय घेणार का?
अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता मुलांना पास करण्याचा आपला निर्णय केवळ मतांचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून घेण्यात येतो आहे. परंतु उद्या उद्योगांनी या मुलांना नौकऱ्या दिल्या नाहीत तर? जी मुले एका सत्राची परीक्षा देणार नाहीत त्यांचे ज्ञान परिपूर्ण कसे म्हणायचे? ऑनलाईन का असेना शाळा सुरु करण्याच्या आपण जो निर्णय घेता आहात तो केवळ शिक्षण सम्राटांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच ना? पहिली ते सातवीच्या शाळा दिवाळीनंतर सुरु केल्या असत्या तर काय बिघडले असते? पण नाही तसे केले असते पालकांनी सहा महिन्याची फी देण्यास नकार दिला असता आणि यात तमाम शिक्षण सम्राटांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असते.
आपण मुख्यमंत्री व्हायला हवे हि आपली इच्छा असेल. शिवसैनिकांची इच्छा असेल. आपण आपल्या पिताश्रींना तसा शब्द दिला असेल परंतु शिवसेनेचा मंत्री हवा हि महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा नव्हती हो. तसे असते तर जनतेने तुमच्या ओंजळीत शंभर जागा घातल्या असत्या. ४० % मते तुम्हालाच दिली असती. पण तसे झाले नाही. २०१४ ला आपले ६३ आमदार होते आणि २०१९ ला तो आकडा ५४ पर्यंत खाली घसरला. २०१४ ची आपली मतांची टक्केवारी १९.८ होती. आणि २०१९ ला आपण केवळ १६. ४ % मते मिळवू शकला आहात. त्यामुळे महाराष्ट्राला तुम्ही नकोच होता हे आधी लक्षात घ्या.
रुग्नांच्या शोकांतिका मीडियावर दिसत नाहीत. त्याविषयीच्या बातम्या वर्तमानपत्रात येत नाहीत. पण फेसबुक, व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेकांनी आपले हाल जनतेसमोर मांडले आहेत. त्यावर तुम्ही काही बोलत नाही. रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले येत आहेत त्यावर आपले सरकार काही बोलत नाही. एका कोरोना टेस्टिंग किट ४५०० रुपयाला मिळते. त्यात दहा टेस्टिंग होतात. म्हणजे एका टेस्टिंगसाठी ४५० रुपये खर्च येतो. असे असताना टेस्टिंग लॅब एका टेस्टिंगचे ४ हजार रुपये का घेतात? ४५० चे हजार, दीड हजार ठीक आहेत ना. पण ४ हजार म्हणजे अतीच होते ना. आपण जनतेकडे न बघता डोळे झाकूनच काम करायचे ठरवले आहे का? नको त्या मंडळींच्या गळ्यात गळे घालून आपण मंत्री झालात पण प्रत्यक्षात मात्र खुर्चीला ओझे झाले हेच खरे.
छान
ReplyDeleteअगदी बरोबर
ReplyDelete