Thursday, 11 June 2020

सायनाईडच्या गोळ्या आणि खिशातले राजीनामे

vijay shendge images

चार दिवस हर्षवर्धन जाधव याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरला. एक दिवस तो बातम्यात झळकला. त्याचे म्हणणे असे कि, 'माझे सासरे माझा मानसिक छळ करीत आहेत. आणि त्याचे स्वरूप इतके भयानक
आहे कि मी खिशात साइनाईडच्या गोळ्या घेऊन फिरतो आहे. मला जर कोणत्याही स्वरूपाचा त्रास झाला तर मी आत्महत्या करीन आणि हा व्हिडीओ त्या आत्महत्येला तुम्ही जबाबदार असल्याचा पुरावा असेल.' 

उद्या दानवे यांना अटक झाली जन्मठेप झाली तरी मला काहीही एक फरक पडणार नाही. तरीही मी हि पोस्ट त्वरित लिहायला घेतली. कारण हर्षवर्धन जाधव सारख्या एका आघाडीच्या नेत्याने असला व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर व्हायरल करणे मला हस्यास्पद वाटते आहे. त्याच्या खिशातल्या साइनाईडच्या गोळ्या मला शिवसेनेच्या आमदारांच्या खिशात असणाऱ्या राजीनाम्यासारख्या वाटत आहेत.   

निवडणुकीपूर्वी असाच त्याच्या घरावर हल्ला झाला होता आणि तो शिवसेनेने घडवून आणला होता असे त्याचे म्हणणे होते. २०१९च्या लोकसभेला यांच्यामुळेच चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला. आणि मुस्लिम उमेदवार विजयी झाला. तेव्हा चंद्रकांत खैरे यांचा पराभव करण्यासाठी दानवे यांनीच त्याला मुद्दाम उभे केले आहे असे मिडिया म्हणत होती. आणि हर्षवर्धन जाधव, दानवेंना जुमानत नाही हे वास्तव आहे. हर्षवर्धन जाधव काही कुणी सोम्यागोम्या नेता नव्हे. त्यांचे वडील तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. आई देखील आमदार राहिलेली आहे. एवढी मोठी राजकीय पार्श्वभूमी असतानाही आज ते मनसेमध्ये आहेत. का? कारण एकच, आपल्या मागे काही लफडे केले तर, खळ्खट्याक करणारा कोणीतरी बाप पाठीशी असायला हवा.  

२०११ ला या गृहस्थांनी मुख्यमंत्री अशोक पाटील यांच्या ताफ्यात घुसखोरी केली, म्हणून त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. त्यांच्यावर आणखीही दोन तीन गुन्हे आहेत. या सगळ्या प्रकरणातील व्हिडीओ मी पाहिले. त्याचे व्हिडीओ पाहिल्यानंतर हा माणूस आत्महत्या करायला निघाला नसून, दानवेंना धमकावतो  देतो आहे असेच दिसले. त्या व्हिडीओमध्ये त्याने अनेक कौटुंबिक चव्हाट्यावर आणल्या आहेत. एकीकडे तोच सांगतो मी माझ्यात आणि माझ्या बायकोमध्ये नवराबायको या नात्याचे कोणतेही संबंध नाही. मग आदित्य जाधव हा कोणाचा मुलगा? पुन्हा म्हणे कि, मी माझी उत्तराधिकारी म्हणून माझ्या पत्नीची नियुक्ती करतो. कधी अपक्ष, कधी मनसे, कधी शिवसेना असं करणारा हा माणूस पक्का संधीसाधू असावा असेच जाणवते. 

शिवसेनेचे नेते पाच वर्षे खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. परंतु त्यांच्या खिशातले राजीनामे कधी कुणाला दिसले नाहीत. शिवसेनेच्या नेत्यांच्या खिशातले राजीनामे जसे होते, तशीच याच्या खिशातली सायनाईडची गोळी असावी असे वाटते. जगात रोज लाखो लोक आत्महत्या करतात ते काही व्हिडीओ बनवून आत्महत्या करणार असल्याचे सांगत नाहीत. कदाचित याचा बोलविता धनी दुसरा कोणी असावा आणि वेगळ्याच हेतूने त्याला बोलते केले असावे अनेकांचे मत आहे. सध्या स्वतः स्वच्छ राहण्यापेक्षा दुसऱ्यावर चिखल फेकणे अधिक सोपे झाले आहे.

No comments:

Post a Comment