Saturday, 20 June 2020

तर आम्ही कधीही स्वावलंबी होऊ शकणार नाही.

vijay shendge images

मला वाटत २००४-०५ ची घटना असावी. मी अल्फा लाव्हलच्या शिरवळच्या ब्रँचला सर्विसला होतो. मुंबई-बंगलोर रस्त्याच्या कात्रज जवळील बोगद्याचे काम सुरू होते. आम्ही जुन्या घाटातून
प्रवास करायचो. नवीन बोगद्याचे खोदकाम जोरात सुरु होते. जेसीबी, राडा रोडा वाहणाऱ्या हायवा, कामगार यांची लगबग सुरु असायची. काही वर्ष ते काम सुरु होतं. माझ्या डोक्यात एकाबाजूने खोदत, दुसऱ्या बाजूने बाहेर पडणारं मशीन असतं तर? कल्पना चमकून गेली. अर्थात हि डोक्यातली कल्पना ओठावर आणण्याचं माझं धाडस झालं नाही.

कारण अशा प्रकारच्या खोदाई करणाऱ्या मशीनची निर्मिती करणं हे माझ्या कंपनीचं काम नव्हतं. त्यामुळे मी माझी कल्पना कोणाला बोलून दाखवली असती तर ती हवेतच विरून गेली असती.  ऐकणाऱ्यांनी मला वेड्यात काढलं असतं. परंतु स्वारगेट ते शिवाजीनगर या मेट्रोच्या बोगद्याचं काम करण्यासाठी परदेशातून TBM ( टनेल बोरिंग मशीन ) मागवल्या गेल्या तेव्हा माझ्या डोक्यात चमकून गेलेली कल्पना अगदीच चुकीची नव्हती हे नक्की. परंतु आमच्याकडे असा विचार करणाऱ्या माणसाला वेड्यात काढलं जातं. किंवा आपला त्या गोष्टीशी काही संबंध नाही म्हणून ती कल्पना झटकून टाकली जाते. किंवा एवढा मोठा खर्च करण्याची तयारी नसल्यामुळे अशा कल्पना दुर्लक्षित केल्या जातात. 

मुळात आमच्या देशात तुम्ही बुद्धिमान असणे अपेक्षित नाही. तुमची कार्यक्षमता महत्वाची नाही. तुम्हाला वरिष्ठांच्या शब्दात शब्द मिसळता यायला हवा. स्वाभिमान गुंडाळून ठेवता यायला हवा. मान खाली घालून ऐकून घेता यायला हवं. भोवतीच्या माणसांची खुशामत करता यायला हवी. या व्यवस्थे विरोधात माझी काहीही तक्रार नाही. परंतु या अशा वृत्तीमुळेच आमचा देश मागे राहतो आहे. आमच्या कंपनीची उन्नती, आमच्या राज्याचा विकास, आमच्या देशाची प्रगती यात कोणालाही रस नाही. कंपनीचे, राज्याचे, देशाचे दिवाळे निघाले तरी चालेल अशीच वृत्ती सगळीकडे. 

पण परिस्थिती बदलते आहे. आमच्या आधीच्या पिढीने काँग्रेसला आयुष्यभर खांद्यावर घेतले. आमच्या पिढीने ढोंगीपणा ओळखला. आणि नव्या पिढीने त्यात भर घालून भाजपला सतत दोनदा सत्तेत बसवले आहे. परंतु सत्तेत योग्य सरकार असणे जेवढे महत्वाचे तेवढेच कंपन्यांच्या व्यस्थापनात पारदर्शकता असणे महत्वाचे. चीनला आर्थिक आघाडीवर टक्कर द्यायची असेल तर चीनपेक्षा स्वस्त, चीनपेक्षा टिकाऊ, चीनपेक्षा आकर्षक निर्मितीवर भर द्यावा लागेल. आर्थिक आघाडीवर आम्ही जे निर्णय घेतले आहेत त्यामुळे चीनचे धाबे दणाणले आहे. पुढे जाऊन आम्ही चीनच्या तोडीस तोड निर्मिती करू शकलो तर? राफेल आम्हाला इस्त्राईल वरून मागवावे लागते, लढाऊ हेलिकॅप्टर अमेरिकेतून मागवावी लागतात. TBM आम्हाला आयात करावी लागते. आमच्या देशात तयार होणार लॅपटॉप नाही. चायना मेक असणारे ३० मोबाईल आहेत. त्यातले चार पाच आम्हाला तोंडपाठ आहेत. परंतु भारतीय बनावटीचे १५ फोन असताना त्यातला   एकही आम्हाला माहित नाही. आणि तरीही आम्ही स्वतःला स्वावलंबी म्हणतो. आम्हाला कष्टाची तयारी ठेवावी लागेल. आम्हाला देशातल्या गुणवत्तेला योग्य न्याय द्यावा लागेल. तसे केले नाही तर, आम्ही कधीही स्वावलंबी होऊ शकणार नाही.   

उन्नती हवी असेल तर आरक्षणाची झूल फेकून द्यावी लागेल. गुणवत्तेची कास धरावी लागेल. अशी एका सत्राची परीक्षा न घेता मुलांना पास करून चालणार नाही. आठवीपर्यंत सरसकट पास करून चालणार नाही. गाळ खाली बसल्याशिवाय पाणी नितळ दिसत नाही. पिण्यायोग्य होत नाही. हे लक्षात घ्यावं लागेल. 

मोदींनी आत्मनिर्भर भारताची हाक दिली आहे. मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. नव्या पिढीला त्यात सहभागी व्हावं लागेल.

2 comments:

  1. Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

      Delete